खरं प्रेम कोणतं?

 

आई नऊ महिने नऊ दिवस मांसाचा गोळा उदरात वाढवते. त्याच्यावर जीवापाड प्रेम करते. पोटात  गर्भ राहिल्यापासून तो या जगात येईपर्यंत, जी म्हणून काळजी घ्यावी लागते, ती आई घेते. एकदा लेकरांचा दोघांच्या विश्वात प्रवेश झाल्यानंतर आई-बाबांचा प्रत्येक श्वास हा फक्त मुलांसाठी असतो. मुलांचं विकसित होणं, भरारी घेणं, याचीच स्वप्नं त्यांच्या डोळ्यात सजलेली असतात. आपल्या लेकरांची सगळी स्वप्न साकार व्हावीत, म्हणून आईबाप उभ्या आयुष्याचा होम करतात. या प्रेमाला सीमा नाही. त्याला दुसरी कसलीही उपमा देता येत नाही. मातापित्यांच्या प्रेमाला मातापित्यांच्या प्रेमाचीच उपमा दिली जाऊ शकते.

what-is-true-love?,खरं प्रेम कोणतं?
what-is-true-love

वडापाव खायची इच्छा झाली, तरी बाप खात नाही, त्याला लेकराची फी भरायची असते. पायातली चप्पल तुटली असली, तरी आई दुसरी चप्पल घेत नाही. एकच साडी वर्षानुवर्षे वापरते. बापाच्या कोपरीला सतरा ठिगळे असतात. घरच्या घरीच ब्लेडने दाढी करणारा बाप विचार करतो, दोन रुपये वाचले, तर माझ्या लेकरांच्या भविष्यासाठी कामात येतील. वेळेवर पिकासाठी खत घेत नाही, पण लेकराच्या शिक्षणाचा खर्च चुकवत नाही. लेकरांना मायबापांचं प्रेम कधी कळतच नाही. तळाहातावरच्या फोडासारखं बाप आपल्या राजकुमारीला जपतो. तीच लाडकी अचानक गायब होते. लेकीने उशाशी ठेवलेली चिठ्ठी बाप डबडबल्या डोळ्यांनी वाचतो आणि त्याच उशीत तोंड खुपसून रडतो. त्याच्या सार्या आशा आकांक्षांचा चुराडा झालेला असतो.

 तारूण्यात कोणावरही मन येतं. गाढवीही अप्सरेसारखी दिसू लागते. प्राप्तेषु षोडषे वर्षे गर्दभि अपि अप्सरा भवेत्। शारीरिक आकर्षणालाच प्रेम समजून घरट्याला विसरून पाखरं उडून जातात. नंतर आयुष्याचा कचरा होतो. स्वप्नांचा चिखल होतो. जगातलं कोणतंही प्रेम माय-बापांच्या प्रेमापेक्षा मोठं असू शकत नाही. शिवधनुष्याचा भंग केल्यानंतर सीतेसारखं रत्न प्राप्त होत असतानाही राम म्हणाला, "माझ्या वडिलांना विचारल्याशिवाय, मी सीतेशी लग्न करू शकत नाही." रूपावर जडतं ते खरं प्रेम नाही. वाढत्या वयाबरोबर रूपसौंदर्य विरत जातं. ज्याच्या मधला गोडवा कधीही उणावत नाही, तेच खरं प्रेम. पिकलेलं फळ गोड लागतं. काळासोबत प्रेमातला गोडवा वाढत गेला पाहिजे. पोट भरलं तरी आई जवळच असावी, असं वासराला वाटतं. याला अनन्य प्रेम म्हणतात. माऊली म्हणतात, वत्स धालयाही वरी । धेनू न वचावी दुरी ।अनन्य प्रीतीची परी । ऐसी आहे ॥

रमेश वाघ, नाशिक

संपर्क - ९९२१८१६१८३

which-is-true-love, खरं प्रेम कोणतं
which-is-true-love


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या