स्वच्छता मनाची

        'श्यामची आई' ग्रंथात एक मनाला भावणारा प्रसंग गुरूजींनी चितारलेला आहे. धुतलेल्या पायाला माती लागू नये, म्हणून श्याम आईला आपल्या पायाखाली तिच्या लुगड्याचा पदर पसरवायला सांगतो. आई पदर पसरते; पण त्याच वेळी श्यामच्या चरित्राला आकार देणारं एक वाक्य बोलते, 'श्याम! पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस! तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. देवाला सांग शुध्द बुध्दी दे म्हणून.' हा धडा श्यामने आयुष्यभर उराशी जपला. श्यामचा साने गुरूजी झाला. शरीरासोबत मनाची स्वच्छता फार महत्वाची आहे.
स्वच्छता मनाची
स्वच्छता मनाची

        आज बाह्य स्वच्छता फार वाढली आहे. सरकारी अनुदानातून बांधलेल्या शौचालयात कित्येकांनी सरपण भरून ठेवलेलं असलं, तरी स्वच्छतेविषयी बर्यापैकी जागरूकता निर्माण झालेली आहे, हे खरेच. परंतु आपले कपडे झकपक दिसावेत, याची जितकी दक्षता घेतात, तितकी काळजी मनाच्या स्वच्छतेची घेतात का? कपड्याच्या दुर्गंधीसाठी स्प्रे मारतात, मनाला सुगंध येण्यासाठी आहे का कुठला स्प्रे? दारातला कचरा रोज काढतात, पण मनातला? किंबहुना आपल्या मनावर कचरा जमा होतोय याची, आपल्याला जाणीव तरी असते का? जंक फूड खाऊन शरीर खराब होतं, हे कळतं; पण मनात किती जंक विचार दररोज घुसतात, याचा विचार कधी केलाय का? चित्र विचित्र जाहिराती, कपोलकल्पित मालिका, समाजात तेढ निर्माण करणारी भाषणं, इतिहास आणि संस्कृतीचं विकृतीकरण करणार्या समाजमाध्यमातल्या पोस्ट आणि अतिरंजित बातम्या यातून मनं घडतात की, बिघडतात? मनावर बुध्दीचं फिल्टर बसवणं आवश्यक आहे.
        आयुष्याच्या अंतिम श्वासापर्यंत स्वच्छतेचा वसा जपलेल्या संतश्रेष्ठ गाडगेबाबांची आज जयंती. गावात गेल्यावर प्रथम हातात खराटा घेऊन गाव स्वच्छ करावा आणि संध्याकाळी 'गोपाला गोपाला देवकीनंन गोपाला'च्या गजरात लोकांच्या डोक्यातला कचरा साफ करावा, हा त्यांचा नित्यक्रम. त्यांच्या स्मृती जागवताना त्यांच्या कृतींचं स्मरण व्हावं. शरीर स्नानाने, पैसा दानाने आणि मन वाचनाने निर्मळ होतं. शास्त्रकारांनी सद्ग्रंथांच्या वाचनाला दिनचर्येचा अनिवार्य भाग मानलेलं आहे. स्वाध्यायान्मा प्रमद:। छत्रपती शिवरायांचा दिवस ग्रंथश्रवणानेच सुरू व्हायचा. ज्ञानच तुमचं मन स्वच्छ करू शकतं. ज्याने सकारात्मक भाव उत्पन्न होतात, तेच ज्ञान. बाकी सगळा कचराच! मोराच्या पिसार्यातल्या डोळ्यांप्रमाणे. डोळे आहेत, पण दृष्टी नाही. माऊली म्हणतात, मोराआंगी अशेषें । पिसें असती डोळसें । परी एकली दृष्टी नसे । तैंसें तें गा ।।
रमेश वाघ नाशिक
संपर्क - 9921816183
स्वच्छता मनाची, swachhata manachi
swachhata manachi


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या