महाभारतात
श्रीकृष्णानंतर सर्वाधिक आदर जर कोणाला दिला जात असेल, तर तो भीष्माला. त्यामागचे
कारण म्हणजे भीष्मांची व्रतनिष्ठा. कोणेएकेकाळी आपल्या पित्याला सुख लाभावं म्हणून
भीष्म आजन्म अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा करतात. कालांतराने पिता स्वर्गवासी
होतात. त्यानंतरचा राजगादीचा वारसही निपुत्रिक अवस्थेत मरण पावतो. अशावेळी राजमाता
त्याच्यासमोर राजाच्या दोन सुंदर विधवा राजकन्यांशी विवाह करण्याचा प्रस्ताव
ठेवते, तरीही ते आपल्या शब्दांवरून मागे फिरत नाहीत. सौंदर्य आणि सत्ता दोन्ही
नाकारून आपल्या प्रतिज्ञेवर ठाम राहतात. भीष्मांचं मोठेपण या करारामध्ये आहे. एकदा शब्द दिला, तर तो
कोणत्याही परीस्थितीत पाळला गेलाच पाहिजे. याला भीष्मप्रतिज्ञा म्हणतात.apulach-maharaj-aapanasi
राजा दशरथ स्वर्गवासी झाल्यानंतर भरत
आणि अष्टऋषी मंडळाने रामाला समजावलं की, ज्याच्या शब्दासाठी तू वनात आलास, ती व्यक्ती
आता हयात नाही. चल परत. नाही गेला राम. अंगाला इंच इंच जखमा झालेला बाजीप्रभू
आपल्या सैनिकांनी कितीही आग्रह केला, तरी नाही गेला पिछाडीला. कारण जोपर्यंत
तोफेचा आवाज होत नाही, तोपर्यंत खिंड लढवण्याचा शब्द दिला होता महाराजांना. पुरंदरच्या
हातघाईत देह ठेवला मुरारबाजीने; पण दिलेरखानाच्या आमिषांना भूलला नाही. अशी जीवाच्या कराराने शब्दाला
जागणारी माणसं होती म्हणून, स्वराज्य उभं राहिलं. छत्रपती शिवरायांचा निश्चयही
मेरू पर्वताप्रमाणे अढळ होता. म्हणूनच तर समर्थ म्हणालेत, निश्चयाचा महामेरू।
बहुत जनांसी आधारू। अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।
आज आमच्याकडे ना निर्धार आहे, ना
निश्चय, ना करार. लाथ मारीन, तिथून पाणी काढीन, ही धमक तरूणाईत दिसत नाही. तू
भविष्यात काय करणार, असा प्रश्न विचारला तर कोणालाही त्याचं ठाम उत्तर माहित नाही.
बघू, पाहू, करू अशी मोघम भाषा वापरली जाते. कोणत्या शाखेला जायचं, हे मुलाचा कल
पाहून ठरत नाही, कारण त्याला स्वत:चा कलच नसतो. मित्र कलतील तिकडं तो कलत असतो. यालाच
प्रवाहतितता म्हणतात. वाहवत जायचं नसेल, तर जीवनात काही गोष्टी ठरवाव्या लागतील,
प्राणपणाने त्यांचं मोल जपावं लागेल. आपणच आपल्याशी करावा करार आणि जपावा
जीवामोलाने. रोज किमान एक पान वाचल्याशिवाय झोपणार नाही, इतका तरी करार करावाच,
स्वत:ने स्वत:शीच. निश्चय शब्दाला तुमच्या
निश्चयाने अर्थ यावा. माऊली म्हणतात, वाहूनि आपुली आण । धरी जो अंतःकरण ।
निश्चया साचपण । जयाचेनि ॥
रमेश वाघ, नाशिक
संपर्क - ९९२१८१६१८३
0 टिप्पण्या