कोणतीही परीक्षा अंतिम नसते

     परीक्षेचा मौसम सुरू आहे. दहावी-बारावी परीक्षांना जनमाणसात आतोनात महत्व प्राप्त झालेलं आहे. उत्तम गुणांनी दहावी-बारावी पास झालं की, आयुष्यात कोणंतीच उणीव उरत नाही, असाच लोकांचा अविर्भाव असतो. परंतु तसं काही नसतं. यानंतरही जीवन अनंत प्रकारच्या संघर्षांनी व्याप्त असतं. जग खुप विशाल आहे. यात प्रत्येकाला प्रतिदिन विविध अनुभव येत असतात. दररोज नवी आव्हानांना समोरं जावं लागतं. पावलोपावली नवा परीक्षक, नवी प्रश्नपत्रिका घेऊन सामोरा उभा असतो. त्यात तुम्ही उत्तीर्ण व्हा अथवा अनुत्तीर्ण, धडा मिळाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे तसाही तोटा हा नसतोच.

konatihi-pariksha-antim-nasate
konatihi-pariksha-antim-nasate

            एकदा हारलात म्हणजे सगळं संपलं, असं नसतं. एकदा जिंकलात म्हणजे चिरविजयी झालात, असंही नसतं. तुकोबा म्हणतात, रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग। दिवस-रात्र संघर्ष चालूच असतो. परीक्षेपेक्षा वास्तव आयुष्यातला संघर्ष जास्त खराखुरा असतो. पुस्तकात वाचलेलं पेपरात उतरवून पास व्हा, अशी लूटूपुटूची लढाई नसते जीवनात. दहावीत बोर्डात पहिली आलेली मुलं, आयुष्याच्या चाचणीत नापास झालेली दिसतात. बारावी नापास झालेली, खर्या आयुष्यात यशस्वी होतात. त्यांच्या जीवनावर सिनेमे बनतात. चौथी पास यशस्वी मुख्यमंत्री बनतात अन् उच्चशिक्षित त्यांच्या फायली सांभाळतात. ज्यांना मंदबुध्दी म्हणून शाळेतून काढून टाकलं जातं, ते एडीसनसारखे लोक जग बदलवून टाकतात. ज्यांना वर्गाबाहेर बसून शिकावं लागतं, ते देशाच्या संविधानाला आकार देतात. याचा अर्थ यशस्वी होण्यासाठी शाळा, शिक्षण, परिक्षा आवश्यक नाही, असा नाही. प्रश्न आहे, त्याचा किती बाऊ करायचा?

            परीक्षा मुलांची असते. टेन्शन आईबाप घेतात. मुलांचं जगणं-वागणं सारं परिक्षेतल्या गुणांशी बांधलं जातं. त्यांची प्रतिष्ठा आणि मानसन्मानदेखील तो कागदाचा चिठोरा ठरवतो. परीक्षेतले गुण एक महत्वाचा घटक असतीलही; पण एकमेव नाहीत. मानवी व्यक्तीमत्वाचे इतरही अनेक कंगोरे आहेत. ते प्रश्नपत्रिकेच्या मापाने नाही मोजता येत. शेजारणीच्या लेकराला आपल्या मूलापेक्षा अधिक मार्क्स मिळाले, तर नाराज होणार्या आईबाबांनी हे लक्षात घ्यायला हवं. दुर्दैवाने सुशिक्षित पालकांच्याच मनात असल्या भ्रामक समजुती जास्त आहेत. मुलांना फक्त मनापासून अभ्यास करण्याला प्रेरीत करा. गुणांच्या अपेक्षांचं ओझं त्यांच्या मानगुटीवर देऊ नका. अपेक्षारहीत भावनेने त्यांना अभ्यास करायला शिकवा, यश मिळेलच. माऊली म्हणतात, परी कर्मफळीं आस न करावी । आणि कुकर्मी संगति न व्हावी । हे सत्क्रियाचि आचरावी । हेतूविण ॥

 रमेश वाघ, नाशिक

संपर्क - ९९२१८१६१८३

konatihi-pariksah-antim-nasate
konatihi-pariksah-antim-nasate


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या