क्रोधवृत्तीचे लक्षण

     देवत्व आणि असूरत्व हे मानवी स्वभावाचे दोन पैलू आहेत. एकाचा विकास केलात, तर दुसरा निघून जातो. दैवी गुणसंपत्तीचं वर्णन गेल्या वर्षभरात आपण येथे केलेलं आहे. पुढे असूरी संपत्तीविषयी श्रीमद्भगवद्गीतेच्या सोळाव्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो, दम्भो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च । अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम् ॥ दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, कटू वचन, अज्ञान हे असूरी वृतीच्या लोकांचे जन्मजात गुण आहेत. दंभ, दर्प आणि अभिमानाचं चिंतन या स्तंभातून पूर्वीच मांडलेलं आहे. आज क्रोधाची लक्षणे पाहू.
krodhvruttiche-lakshan,क्रोधवृत्तीचे लक्षण
krodhvruttiche-lakshan

हसायला पैसे लागत नाहीत. तरी काहींचा चेहरा कायमच पडलेला असतो. सगळ्या जगाच्या समस्यांचा भार त्यांच्या डोक्यावर असल्यासारखं त्यांचं वागणं असतं. जगातल्या कोणत्याच यशामुळे त्यांना आनंद होत नाही. फुटकळ कारणांवरून यांची आदळआपट सुरू असते. स्वत:ला शांती नसते, इतरांना अशांत करतात. त्यांना दु:खी व्हायला कोणतंही कारण पुरतं. किंबहुना काही तर विनाकारणच आयुष्यभर रडत राहतात. विश्वाचं वैभव पायाशी आलं, तरी त्यांचं रडू संपत नाही. ते स्वत: रडतात आणि आसपासच्या लोकांनाही रडवतात. रावणाने त्याच्या शत्रूंना रडवलं यात नवल नाही. त्याच्या जवळच्या लोकांच्याही आयुष्याचा नरक बनवून टाकला. जो स्वत: रडतो आणि दुसर्याला रडवतो, त्याला रावण म्हणतात.

समोरच्याला सुख मिळत असेल, तर ते स्वत:ला विषाप्रमाणे आहे, असे मानणारे काही महाभाग समाजात असतात. विषबाधा जशी क्षणार्धात संपूर्ण शरीराला वेढते, तशी त्याची मनोवृत्ती क्रोधाने झाकोळून जाते. तापलेल्या तेलामध्ये शीतल पाणी मिसळलं, तर आगडोंब उसळतो. वास्तविक तेलाच्या शीतलतेने तापलेल्या तेलाचा ताप निवायला हवा. चंद्राला पाहून अवघ्या सृष्टीला आनंद होतो, पण कोल्ह्याच्या पोटात मात्र जाळ होतो. सूर्य विश्वाचं आयुष्य उजळवून टाकतो. पण त्याला पाहून घुबडाचे डोळे फुटतात. चराचराला हवीहवीशी वाटणारी पहाट चोराला भीतीप्रद ठरते. दुधाला अमृतासमान मानलेलं आहे, पण तेच सापाला पाजलं, तर त्याचं विषात रूपांतर होतं. पाण्याने आग विझायला हवी, परंतु समुद्रात जर वडवानळ प्रज्वलित झाला, तर तो पाण्यामुळे अधिकच उसळतो.

अशीच क्रोधवशिष्ट व्यक्तीची लक्षणे असतात. त्याच्यावर चांगल्या गोष्टींचा वाईटच परिणाम होतो. त्याला समोरच्याचं ज्ञान खपत नाही. साधा सरळ विनोद सहन होत नाही. दुसर्याचं वैभव पाहवत नाही. एखाद्याच्या दारिद्रयामुळे मात्र आनंद होतो.  कोणी भाग्यवान, भेटला तर त्याच्या दैवाचा राग येतो. दुर्योधनाला पांडवांचं ऐश्वर्य सहन झालं नाही. द्युतक्रीडेसारख्या कपटमार्गाचा वापर करून पांडवांना त्याने  देशोधडीला लावलं. पांडव वनवासी झाल्यानंतर त्यांच्या दरीद्री जीवनाचा उपहास उडविण्यासाठी त्याने कर्णासह त्या वनात घोषयात्रा काढली. याला क्रोध म्हणतात. माऊली म्हणतात, तैसा विद्याविनोदविभवें । देखे पुढिलांचीं दैवें । तंव तंव रोषु दुणावे । क्रोधु तो जाण ॥

रमेश वाघ, नाशिक

संपर्क - 9921816183

krodhvruttiche-lakshan, क्रोधवृत्तीचे लक्षण
krodhvruttiche-lakshan


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या