प्रजा, सत्ता आणि प्रजासत्ताक

         संविधानाच्या कलम एकवीस प्रमाणे मिळालेला जीविताचा अधिकार म्हणजे प्रतिष्ठापूर्वक जगण्याचा अधिकार, असा अर्थ माननीय सर्वोच्च न्यायालयाने लावलेला आहे. हा अर्थ शेतकर्यांच्या बाबतीत लावायचा  म्हटलं, तर घोर निराशा पदरात पडते. आमच्या व्यवस्थेनं शेतकर्यांचं जीवन इतकं कष्टप्रद करून ठेवलंय की, चांगल्या बागाईतदार शेतकर्याच्या मुलालाही लग्नाच्या बाजारात किंमत नाही. बटाट्याचे चिप्स बनवणार्याला त्या पाऊचची किंमत ठरवता येते; पण घाम गाळून बटाटा पिकवणार्या बळीराजाला मात्र तो हक्क नाही. रात्रभर विंचू-काट्याची पर्वा न करता पाणी भरलेला शेतमाल, त्याला मिळेल त्या किमतीला व्यापार्याच्या घशात घालावा लागतो. आलेल्या पैशांतून खतांची उधारीही भागत नाही. आपण म्हणतो हा कृषीप्रधान देश आहे. सत्तर टक्के प्रजा शेतीवर अवलंबून आहे. पण शेतकर्यांच्या हिताचा विचारच धोरणनिर्मात्यांच्या डोक्यात येत नसेल, तर हे कोणतं प्रजासत्ताक?

praja-sattak-ani-prajasattak
praja-sattak-ani-prajasattak

            आदर्श राजव्यवस्थेची चर्चा करताना रामराज्याचा विचार पहिल्यांदा डोक्यात येतो. गांधीजींची स्वतंत्र भारताची कल्पना रामराज्याचीच होती. नाल्पसन्निचय: कश्चिदासित तस्मिन् पुरोत्तमे । कुटुम्बी यो न  सिद्धार्थोगवाश्वधनधान्यवान।। रामराज्यात कोणीही दुबळा, पीडीत, दलित नव्हताच. आज आपल्या दारीद्र्य रेषेखालील लोकसंख्येचा विचार केला, तर असं दिसतं की, जगातील कित्येक देशांची एकुण लोकसंख्या नाही, तितके आपले लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगतायेत. रामराज्य असं नसतं. हिंदवी स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकर्यांना बी-बियाणे, पाण्याचे पाट, खते, अवजारे, बैल यांसाठी तगाई कर्ज म्हणून बिनव्याजी सरकारी कर्ज देत. ते शेतक-यांनी पुढच्या पाच वर्षांत फेडायचे असे. म्हणूनच स्वराज्याला रयतेचं राज्य म्हणतात. रयतेचं राज्य तेच गणराज्य.   

लोकशाहीमध्ये समाजाला क्वचितच योग्य नेता लाभतो, असं प्लेटो म्हणतो. समाज परिपक्व असेल, तरच लोकशाही यशस्वी होते. म्हणून सरसकट मताधिकार देण्यापेक्षा शिक्षणाची अट प्लेटोने घातली होती. पण कोणतं शिक्षण? केवळ पुस्तकी शिक्षण देण्यापेक्षा वृत्ती घडवणारं शिक्षण समाजाला आणि राजकर्त्यांना मिळणं आवश्यक आहे. जिथले  सामान्य लोक कोणत्याही प्रलोभनासमोर न झुकता आपलं मत निर्भयपणे व्यक्त करतात, तेच खरं प्रजासत्ताक. स्वत:च्या हक्काचा आग्रह धरताना प्रत्येकाने आपलं कर्तव्य समजून घेतलं आणि त्याचं पालन केलं तर आपोआप रामराज्य उभं राहील. त्यासाठी कोणतंही बाह्य कर्मकांड जरूरी नाही. माऊली म्हणतात,  देवतांतरा न भजावें । हें सर्वथा कांहीं न करावे । तुम्हीं स्वधर्मयज्ञीं यजावें । अनायासें ॥   

रमेश वाघ, नाशिक

संपर्क - ९९२१८१६१८३               

प्रजा, सत्ता आणि प्रजासत्ताक,
प्रजा सत्ता आणि प्रजासत्ताक


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या