खरी संपत्ती कोणती?

         मूढैः पाषाणखंडेषु रत्नसंज्ञा विधीयते॥ मूर्ख दगडाला रत्न समजतात. तुम्ही-आम्ही ज्याला धन समजतो, त्याला विद्वान लोक धन समजत नाहीत. ज्या गोष्टींची आपल्याला खूप किंमत वाटते, त्या गोष्टी खर्या ज्ञानी पुरूषांच्या दृष्टीने कवडीमोल असतात. 'सोने रूपे आम्हा मृत्तिकेसमान' हे  तुकोबांचं वचन सर्वोतोमुखी आहे. गीतेने दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती असे गुणसंपत्तीचे दोन भाग केलेले आहेत. गेल्या वर्षभरापासून आपण या स्तंभात गीतेने सांगितलेल्या सव्वीस दैवी गुणांविषयी चिंतन करीत आहोत. ज्ञानेश्वरीतील ज्ञानामृताचे कण वेचीत आहोत.
what-is-real-wealth
what-is-real-wealth

देव आणि असूर दोघेही माणसेच. असूर म्हणजे चित्रात दाखवितात तसे मोठेमोठे दात, नखे आणि शिंगे वगैरे असणारे विचित्र प्राणी नव्हेत. ज्यांच्या स्वभावात असूरी गुण आहेत, ते असूर. ज्यांच्या चरित्रात दिव्यत्वाचे निदर्शक गुण आहेत ते देव. गीता सांगते तुमच्या मनामध्ये एकाच वेळी देव आणि असूर दोघेही असतात. ज्याला तुम्ही वाव देता, तसं तुमचं चरीत्र बनत जातं. गीता नियतीशरण नाही. मानवाला इच्छास्वातंत्र्य आणि निवडस्वातंत्र्य आहे. आपल्या जीवनाचं सोनं करायचं की, माती, हे ठरवण्याचा अधिकार  व्यक्तीला आहे. त्याची निवड त्याला देव किंवा असूर बनवित असते. जीवनाच्या विविध टप्प्यावर तुम्ही घेतलेले बरेवाईट निर्णय तुमची नियती घडवीत असतात.

                व्यक्ती निर्भय, मनाने निर्मळ, ज्ञानयोगात दृढ, दानी, संयमी, प्रयत्नवादी, अभ्यासू, तपस्वी आणि सरळ स्वभावाची असावी. अहिंसा, सत्य, क्रोधहीनता, त्याग, शांती, अनिंदा, दया, अलोलुपता, मार्दव, लज्जाशीलता आणि स्वस्थ मन हेच खरे सद्गुणरूप अलंकार होत. तेजस्विता, क्षमाशीलता, धैर्य, संपूर्ण शुचिता, अजातशत्रुत्व आणि विनम्रता हे सव्वीस गुण चरित्रात धारण करणं म्हणजे खर्या ऐश्वर्याची प्राप्ती होय. हे गुण जीवनात आले, तर मानवी जीवन तेजानं झळाळून उठतं. अशा गुणांनी युक्त लोक जेव्हा तुमच्या आसपास वावरत असतात, तेव्हा तुमचं विश्व आपोआप दैवी बनतं. जिथं नागरिक अशा गुणांनी संपन्न असतात तिथं रामराज्य अवतरतं.

                या गुणमोत्यांची माळा चरित्रकंठात धारण करणार्याच्या वैभवाचं काय वर्णन करावं? ही सव्वीस गुणांची ब्रह्मसंपदा म्हणजे मुक्तीच्या सिंहासनावर विराजमान असलेल्या चकवर्ती सम्राटाचं जणू वतनच. जिच्या तीरावर हे सव्वीस गुणांचे तीर्थ आहेत, ती दैवी गंगा म्हणजे ही गुणसंपत्ती. मुक्तीरूपी राजकुमारी या सव्वीस गुणरूपी कमलपुष्पांची माळा घेऊन आपल्यासाठी योग्य विरक्त पुरूषाचा गळा शोधतेय जणू. निरांजनात या सव्वीस गुणांच्या वाती पेटवून गीता आपल्या आत्मरूपी पतीला ओवाळायला निघाली आहे. ही संपत्तीची महान राशी आहे. हा दैवी गुणांचा समुच्चय म्हणजे श्रीमद्भगवद्गीतारूपी ज्ञानसमुद्रातील शिंपला आहे. त्या शिंपल्यामधून हे सव्वीस गुणरूपी मोती बाहेर पडलेले आहेत. माऊली म्हणतात, उगळितें निर्मळें । गुण इयेंचि मुक्ताफळें । दैवी शुक्तिकळें । गीतार्णवींची ॥

रमेश वाघ, नाशिक

संपर्क - ९९२१८१६१८३

what-is-real-wealth
what-is-real-wealth


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या