अज्ञानाचे लक्षण

         सॉक्रेटिसला अथेन्समधला सर्वात शहाणा व्यक्ती मानलं जाई. याचं कारण तो असा एकमेव व्यक्ती होता की, त्याने आपल्या अज्ञानाचा खुलेपणाने स्वीकार केलेला होता. आपल्याला काहीच कळत नाही, हे ज्याला कळतं, तो खरा शहाणा, असं सॉक्रेटिसने म्हटलेलं आहे. आपल्याला काहीच कळत नाही, हे एकदा कळलं की, माणसाला कळायला सुरूवात होते. पण वास्तवात ज्याला काहीच कळत नाही, असेच लोक जास्त खळखळ करताना दिसतात. उथळ पाण्याचा खळखळाट मोठ्याने ऐकायला येतो. पाणी जितकं खोलं, तितकं गंभीर आणि शांत असतं.
adnyanache-lakshan
adnyanache-lakshan

            काहींना ज्ञान नसतंच. आपल्या नसलेल्या ज्ञानाचं प्रदर्शन करण्यातच त्यांना पुरूषार्थ वाटत असतो.  ज्याने आयुष्यात कधी हातात बॅट धरली नाही, तो सचिन कसा चुकीचा शॉट मारून आऊट झाला, याचं वर्णन करीत असतो. ज्याचं शेजार्याशी दिवसातून तीन वेळा भांडण होतं, तो देशाची परराष्ट्रनीति कशी असावी, याच्यावर व्याख्यान देतो. अधिकार नसलेल्या विषयावर अधिकारवाणीने बोलतो.
            लोकांचा अधिकाधिक वेळ ज्ञान मिळवण्यापेक्षा अज्ञान झाकण्यातच जातो. आपण आहोत तसे सादर करण्यापेक्षा आपण जसे नाहीत तसे दाखविण्यातच सारी उर्जा खर्च होते. लोकांना आपण तरूण दिसलो पाहिजे, म्हणून म्हाताराही केस काळे करतो. त्यासाठी तीन-तीन तास न्हाव्याकडे पार्लरमध्ये नंबर लावतो. ज्याच्याकडे कर्तृत्वाचा सुगंध नसतो, तो अंगावर दररोज वेगवेगळ्या कंपन्यांचे सेंट फवारत फिरतो. ज्याचं पोट सुटलेलं असतं, तो विनाकारण पोट मागे खेचून चालत असतो. ज्याचा रंग सावळा असतो, त्याला आपण गोरं दिसावसं वाटतं. त्यासाठी तो दिवसाला चार चार वेळा फिल्टर लावून डीपी बदलतो. लोकांच्या महिन्याच्या किराण्यापेक्षा सौंदर्य प्रसाधनांचा खर्च जास्त असतो. ही सारी कवायत अज्ञानापोटी होत असते.
        काही मरतात, पण अज्ञान सरत नाही. भावार्थदीपिकेत याचं फार तार्किक वर्णन आहे. दगडाला थंड गरम या जाणिवा नसतात. जन्मांधळ्याला दिवस आणि रात्रीतला फरक कळत नाही. भडकलेल्या आगीला काय जाळावे आणि काय राखावे याचा विधीनिषेध नसतो. परिसाला सोनं आणि लोखंड दोन्हीही सारखेच. स्वयंपाकघरातली पळी आमटीच्या कढईतही जाते आणि खिरीच्या पात्रातही जाते. पण तिला चवीची वार्ता नसते. वारा वाहताना राजमार्ग पाहून वाहत नाही. वाटेल तसा धावतो. त्याप्रमाणे कोणतं कार्य करावं, कोणतं टाळावं, याचा विवेक अज्ञान्याला राहत नाही. लहान लेकराला अमूक वस्तू शुध्द आहे की खराब, याच्याशी काही घेणंदेणं नसतं. ते दिसेल ती वस्तू तोंडात घालतं. याप्रमाणे पापकृत्य आणि पुण्यकृत्य यांची खिचडी करणारे लोक असतात. कशाचीच चव त्यांना धडपणे कळत नाही. असली जीवदशा म्हणजे अज्ञान. माऊली अज्ञानाविषयी म्हणतात,  तैसें पापपुण्याचें खिचटें । करोनि खातां बुद्धिचेष्टे । कडु मधुर न वाटे । ऐसी जे दशा ॥
रमेश वाघ, नाशिक
संपर्क - ९९२१८१६१८३
adnyanache-lakshan

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या