आनंद की सुख?

            सहज गंगेवर गेलो होतो. एका दृश्याने लक्ष वेधून घेतले. एक ऐंशीच्या वयाचा साधू  दाढी करत होता. एका हातात  तोंड पहायला जेमतेम तीन इंचाची फुटकी काच होती. दुसर्या हातात फक्त ब्लेड. गांधी तलावातल्या पाण्याने दाढीचे केस ओले करून बाबा दाढी करत होते. दाढी करून झाल्यावर त्यांचे माझ्याकडे लक्ष गेले. तसे गोड हसले. मिशीला पिळ भरला आणि आपली धोपटी घेऊन चालायला लागले. त्या क्षणी तो व्यक्ती जगाचा राजा वाटला. एकदम खूश. दाढीला आरसा नाही, वस्तरा नाही, क्रिम नाही, आफ्टरशेव्ह वगैरे गोष्टींचा संबंधच नाही. तरी आनंद मात्र चेहर्यावरून ओसंडून वाहत होता. संथ वाहणाणार्या नितळ गंगामाईसारखा!
anand-ki-sukh,आनंद की सुख
anand-ki-sukh

                आपण सुखाला आनंद आणि आनंदाला सुख समजण्याची गल्लत करीत असतो. सुख परिसिथितीसापेक्ष असतं. आनंद मन:स्थितीसापेक्ष असतो. एखादा वातानुकुलित घरात मऊ मखमली गादीवरही झोपेसाठी तळमळत असतो. साधनांचं सुख आहे, पण झोपेचा आनंद नाही. कोणी बांधाचा दगड उशाला घेऊनही बिनघोर झोपत असतो. सुखाची साधनं नाहीत,पण आनंद सहजसाध्य आहे. मनच थार्यावर नसेल, तर महालही आनंद देत नाही. मन प्रसन्न असेल तर, अरण्यही आनंदवनभुवन होतं. न हि तद्भविता राष्ट्रं यत्र रामो न भूपतिः। तद्वनं भविता राष्ट्रं यत्र रामो निवत्स्यति।। जिथे आपली आवडती व्यक्ती नसते, ते नगर जंगलासमान! जिथे आपला जीवलग, ते वनही स्वर्गमय!  साधनांनी सुख मिळतं, तर साधनेने आनंद.
                शत्रुच्या गोळ्यांनी अंगाची चाळण झालेला वीर प्राण सोडतानाही हसत असतो. का? सुख मिळालंय म्हणून? वेदनांचं दु:ख आहेच, पण एका  उच्च ध्येयासाठी बलिदानाचा आनंद सर्वोच्च आहे. अचानक घरात पाहुणे आले आणि सगळा स्वयंपाक संपला, तर आई फक्त पाणी पिऊन झोपते. तरीही तिच्या चेहर्यावर समाधानाचं स्मित असतं. उपाशी झोपावं लागण्याच्या दु:खापेक्षा सत्कृत्याचा आनंद मोठा असतो. याला साधननिरपेक्ष आनंद म्हणतात. आनंदाला बाह्य उपचारांची कुबडी लागत नाही. आनंद प्रत्येकाच्या अंतरात असतो. फक्त त्या शाश्वत झर्याचा ठाव गवसावा लागतो. पद, पैसा, प्रतिष्ठा मिळो न मिळो, सागराप्रमाणे सदैव आत्मतृप्त बनता यायला हवं. नदी आटली किंवा तिला महापूर आला, तरी सागराला फरक पडत नाही. जरी सरिताओघ समस्त । परिपूर्ण होऊनि मिळत । तरी अधिक नोहे ईषत् । मर्यादा न संडी ॥
रमेश वाघ, नाशिक
संपर्क - ९९२१८१६१८३
आनंद की सुख,ananad-ki-sukh
आनंद की सुख 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या