व्यसन म्हणू नये धाकुटे

         जीवनात आपण बर्याच वाईट गोष्टी चांगल्या समजून कवटाळलेल्या असतात. त्या वेळीच सोडल्या नाहीत, तर धैर्य खलास होतं. आत्मबळ संपतं. एकदा सवय झाली की, त्याचा प्रतिकार करणं कठीण होऊन बसतं. बाह्य शत्रुंनी आक्रमण केलं, तर त्याचा प्रतिकार करता येतो. पण शत्रु जवळचा असेल, तर तो आपला शत्रु आहे, हे लक्षात यायच्या आत सगळं संपलेलं असतं. बरीचशी व्यसनं सहज सूरू होतात. नंतर डोईजड होतात. सगळे पितात म्हणून सकाळी चहा घेतला जातो. पुढेपुढे चहा पिल्याशिवाय आपली सकाळच सुरू होत नाही. कधीतरी दोस्तांचा आग्रह म्हणून हातात धरलेली सिगारेट जन्माची सोबतीण बनून जाते. कुठल्याही दारूड्याला आनुवांशिकतेने दारूचा वारसा मिळालेला नसतो. नकळत गंमत म्हणून सुरू केलेली गोष्ट, आयुष्याचा सत्यानाश करते.
vyasan-mhanu-naye-dhakute,व्यसन-म्हणू-नये-धाकुटे
vyasan-mhanu-naye-dhakute

            जोपर्यंत व्यसनावर ताबा असतो, तोपर्यंत ते व्यसन नसतं. जेव्हा त्याच्या कह्यात तुम्ही जाता, तेव्हा त्याला व्यसन म्हणतात. व्यसन साधं वाटतं; पण त्यामुळे आयुष्यातलं स्वातंत्र्य हिरावलं जातं. सोईसाठी निर्माण झालेला मोबाईल जीवघेण्या व्यसनात रूपांतरीत होऊ पाहतो आहे. कोणालातरी फोन करण्यासाठी हातात घेतलेला मोबाईल अर्धा तास बोटे फिरवून पुन्हा ठेवून दिला जातो. मग आठवतं, "अरे अमक्याला फोन करायचं राहूनच गेलं!" हा अनुभव लहानमोठ्या सर्वांनाच येतो. काहीही काम नसलं, तरी दिवसभरात आपण कितीवेळा व्हाट्सअप उघडतो, याचा कधीतरी हिशेब करा. ज्यांना आपलं काहीही घेणंदेणं नसतं, त्यांच्या स्टेटस पाहण्यात किती वेळ जातो?
कोणतीही वाईट गोष्ट गोड रूपात समोर येते. हवीशी वाटते. पण तिचा परिणाम घातक होत असतो. ऋण काढून थाटात लग्न करायला मजा वाटते. कर्ज फेडायची वेळ आल्यावर पश्चाताप करून उपयोग नसतो. मधूमेहाच्या रूग्णाला  साखर खायला गोडच लागते, पण परिणाम वाईट होतो. चमचमीत अन्न गरजेपेक्षा जास्त खायला बरं वाटतं, पण तेचं अधिकचं अन्न अनेक व्याधींना निमंत्रण देतं. अनेकांना ऑनलाईन गेम खेळायची मजा वाटते. पैसा येत नाहीच, पण बापदाद्यांनी जीवामोलानं जपलेली जमीन विकायची वेळ नक्कीच येते. चोराची दोस्ती नाशाला कारण. अशा गोष्टी टाळाव्यात. विषाची चव गोड असते, परंतु त्याचा परिणाम जीवघेणा असतो. माऊली म्हणतात,  पैं नामें विष महुरें । परी मारूनि अंतीं खरें । तैसें आदि जें गोडिरें । अंतीं कडू ॥ 
रमेश वाघ, नाशिक
संपर्क - ९९२१८१६१८३

vyasan-mhanu-naye-dhakute


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या