समय से पहले और भाग्य से ज्यादा किसीको कुछ नही मिलता, हे वाक्य बर्याच ठिकाणी लिहिलेलं आढळतं. तत्वज्ञान म्हणून त्यात तथ्यांश असेलही. पण बर्याचदा आपलं अपयश लपवण्याची ढाल म्हणूनच या वाक्याचा उपयोग केला जातो. जगातलं सगळंच तत्वज्ञान आपल्या सोयीपुरतं वापरणारी लोक समाजात असतात. आयुष्यात ज्याला धन कमावता येत नाही, तो जगाला गरीबीचं तत्वज्ञान शिकवत असतो. तत्वज्ञान जगण्याला बळ देतं. पण चुकीच्या ठिकाणी चुकीच्या तत्वाची कुबडी घेतलीत की, जीवन पंगू होतं. आपली अकर्मण्यता झाकण्यासाठी कोणी भाग्याआड लपत असेल, तर ते चूक आहे.
samay-se-pahale-aur-bhagya-se-jyada |
वनवास प्राप्त झाल्यावर रामाने
दैवाच्या श्रेष्ठत्वाचा युक्तीवाद
लक्ष्मणासमोर केला होता. तेव्हा लक्ष्मण म्हणतो, विक्लबो वीर्यहीनो यस्स
दैवमनुवर्तते। वीरास्सम्भावितात्मानो न दैवं पर्युपासते।। दुबळे आणि भेकडच
दैवाचा आश्रय घेतात. ज्यांचा स्वाभिमान जिवंत असतो, असे
सामर्थ्यवान पुरूष दैवावर विसंबत नाहीत. कोणत्याही कार्याची सिद्धी करताना, जे जे
आणि जसे करायला हवे, तसे सर्व करूनही अपयश पदरात येतं, तेव्हा जर कोणी अपयशाची
जबाबदारी दैवावर ढकलत असतील, तर ते समजू शकते. परंतु काहीच प्रयत्न न करणारे अपयश
पदरात पडल्यावर राजरोसपणे दैवाच्या नावाने बोटे मोडतात. हा दैववाद नाही, पलायनवाद
आहे. प्रयत्नवाद्यांना प्रयत्न करण्याला बळ मिळावं, म्हणून भाग्य संकल्पना
वापरायला हवी.
0 टिप्पण्या