डॅनीच्या मिशा: संस्कार पेरणारा बालकथासंग्रह

         आजकाल दिवसेंदिवस भारंभार साहित्याची निर्मिती होत आहे. विरोधाभास म्हणजे वाचन कमी झालंय, अशी हाळी रोज दिली जाते. तरी विविध साहित्य प्रकारांतून जुन्या-नवख्या सर्वच प्रकारच्या लेखकांचे साहित्य दररोज बाजारात दाखल होते आहे. असं असलं  तरी बालसाहित्याचा प्रांत मात्र याला अपवाद आहे, असं जाणकारांचं निरीक्षण आहे. बालकांनी आवर्जुन वाचावं, असं सकस बालसाहित्य मराठीतून येत नाही. हिंदी इंग्रजीच्या तोडीची बालकांसाठीची पुस्तके मराठी साहित्यव्यवहारात आढळत नाहीत, ही सर्वच स्तरांतील लोकांची तक्रार असते. या सर्व वातावरणात बालकथाकार, कवयित्री आणि सिध्दहस्त ललितलेखिका वैशाली सूर्यवंशी यांचा स्वयं प्रकाशनाने प्रकाशित केलेला 'डॅनीच्या मिशा आणि इतर गोष्टी' हा बालकथासंग्रह एक नवा आशेचा किरण दाखवतो.
डॅनीच्या-मिशा
डॅनीच्या-मिशा

                कथासंग्रहात एकंदरीत आठ कथा आहेत. प्रत्येक कथा बालमनाला एक नवा विचार आणि संस्कार देणारी आहे. 'ईदचा चंद्र' या कथेतून श्रमप्रतिष्ठा, मातृपितृभक्ती आणि परधर्मसहिष्णुता ही मूल्ये बालकांच्या मनावर नकळतपणे कोरली जातात. डॅनी नावाच्या झुरळाच्या मिशांवर आधारीत शीर्षक कथा तर फारच गमतीशीर आहे. सोबतच आपल्या वागण्याचा कोणालाही त्रास होऊ नये, प्रत्येकाने वागताना दुसर्याचा विचार करावा, हा विचार ही कथा देते. 'फुलांचे रंग' ही कथा वाचकाला संध्याराणीच्या परिराज्याची सैर घडवते, सोबतच परोपकाराचा पाठही शिकवते. मुक्या प्राण्यांसोबत तसेच आपल्या आईसोबतचा लेकरांचा अनुबंध 'जुई' ही कथा उलगडवून दाखवते. आजकाल जे मागावं ते आपोआप समोर हजर होत असल्यानं लेकरांना आईबापाच्या कष्टांची किंमत कळत नाही. त्यामुळे घराघरात भावाचा अभाव असलेला आपणांस दिसतो. कुटुंबात परस्परांविषयी प्रेम आणि आदरभाव उभा करण्यात 'पाऊलखुणा' ही कथा यशस्वी होते. 'दादूची पेन्सिल' आणि 'चिनूमिनूची फजिती' या कथाही कल्पनेच्या अद्भूत जगाचं दर्शन घडवतात. सिमेंटच्या जंगलात राहणार्या लेकरांचा निसर्गासोबत सांधा जोडण्याचं काम 'चिऊताईंचं झाड' ही कथा करते.

कथा वाचताना वाचकाच्या नकळत तो अंतर्मुख होत जातो. मनात विचार आणि संस्कारांची पेरणी होत जाते. ओघवती शैली, बाळबोध भाषा यामुळे कथासंग्रह वाचनीय झाला आहे. शब्दांचा आकार आणि फॉण्टदेखील बालकांच्या वयानुरूप वापरला आहे. बालभारतीच्या किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांची नेटकी पाठराखण पुस्तकाला लाभलेली आहे. छपाई पूर्णपणे आर्टपेपरवर करण्यात आलेली आहे. प्रत्येक कथेमध्ये कथेच्या आशयाला साजेशी चित्रे गीतांजली भवाळकर यांनी अत्यंत निगुतीने साकारलेली आहेत. पृष्ठसंख्या पन्नास असली तरी आजच्या महागाईच्या तुलनेत एकशे ऐंशी रूपये असे पुस्तकाचे मूल्य मात्र माफक म्हणावे, असेच आहे. आपली मुले वाचत नाहीत अशी ज्यांची तक्रार आहे अशा सर्व पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी हे पुस्तक अत्यंत महत्वाचे आहे.

कथासंग्रह - डॅनीच्या मिशा आणि तर कथा

लेखिका - वैशाली सुर्यवंशी

प्रकाशक - स्वयं प्रकाशन, सासवड, पुणे

पृष्ठे ५०, मूल्य - १८०

पुस्तक परिचय - रमेश वाघ, नाशिक

संपर्क - ९९२१८१६१८३

danchya-misha
danchya-misha


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या