ऐसी वाणी बोलिये

 
        माणूस दोन वर्षांत बोलायला शिकतो. पण कसं, कुठे आणि काय बोलावं, याची समज आयुष्य गेलं, तरी येते की नाही, हा प्रश्नच आहे. बोलताना कसं बोलावं, याविषयी आमच्या विद्वानांनी खूप उहापोह केलेला आहे.  वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया। लक्ष्मी: दानवती यस्य सफलं तस्य जीवितं।। ज्याची वाणी रसाळ असते, कृती श्रमप्रधान असते, ज्याचं धन दानशील असतं, त्याचंच जीवन सफल असतं. लोकांच्या जीवनच निरस असतं, त्यामुळे वाणीत रस असेलच याची खातरी देता येत नाही.
eisi-wani-boliye,ऐसी वाणी बोलिये
eisi-wani-boliye


        श्रीमद्भगवद्गीता वाचेचं तप समजावताना म्हणते, अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत्। स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते।। असं बोला की, ज्या बोलण्याचा पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये. सत्य बोलावं, प्रिय बोलावं, हिताचं बोलावं. नियमित स्वाध्याय करावा आणि अभ्यास करावा, याला वाणीचं तप म्हणतात. आपण बोलतो त्यात बहुधा सत्य नसतंच. कारण आपण सर्वच अशा समाजात वावरतोय की, इथे सत्य ऐकणारा कान दुरापास्त आहे. त्यामुळे आपल्या सत्य बोलण्याने व्यवहार फिस्कटत असेल, तर असत्य बोललेलं काय वाईट, असाच विचार सर्वजण करतात. असत्य ऐकणाराला प्रिय वाटतं, पण त्याने हित होईलच, याची काडीमात्र शक्यता नसते.
        जी समोरच्याला आधार देते, ती वाणी गोड. बोलताना इतकं रसाळ बोलावं की, ऐकणार्याला तुमच्या शब्दांच्या शिडकाव्यानं शांत, प्रसन्न वाटायला  हवं. भाषा अशी असावी, ज्याने ऐकणार्याचा संताप नाहिसा व्हावा आणि बोलणार्याला अनुताप करण्याची वेळ येऊ नये. ऐसी वाणी बोलीये मन का आप खोए। औरन को शीतल करे आपहु शीतल होए।। तुमच्या बोलण्याने समोरचा सुखावत असेल, तर तुम्हाला सुख होणारच, यात तिळमात्र संशय नाही. तुम्ही एखाद्याला वाईट बोला, तुमच्या चित्ताची शांती ढळल्याशिवाय राहणार नाही. न्युटनचा तिसरा गतीविषयक नियम.
        काहींचं मन म्हणजे सापाचं वारूळच असतं. जिथं सकारात्मक विचारांचा उगमच होत नाही. विचार निर्माण झाला की, तो विष घेऊनच जन्माला येणार. नजर अशी असते की, जणू एखादा टोकदार बाणच असावा. तो दृष्टीक्षेप तीक्ष्ण बाणाच्या अग्राप्रमाणे टोचतो समोरच्याला. तो बोलायला लागला की, इतकं कटू बोलतो की, जणू विस्तवाचा वर्षाव व्हावा. त्याची प्रत्येक क्रिया चांगल्या गोष्टीचा नाश करणारी असते. लोखंडाची करवत जशी निघृणपणे कापते ना, तशी ह्याची वर्तणूक समाजाला कापत जाते. दोन भावांत गेले की, त्यांची एकी तोडतील. साधे गल्लीतल्या गणपती मंडळात जरी गेले, तरी एका मंडळाचे दोन मंडळं केल्याशिवाय यांना चैन पडत नाही. अशा कठोर वृत्तीच्या व्यक्तीला अधम म्हणतात. माऊली म्हणतात, तो मनष्यांत अधमु जाण। पारूष्याचे अवतरण। आतां आईक खूण। अज्ञानाची।।
रमेश वाघ, नाशिक
संपर्क ९९२१८१६१८३
ऐसी-वाणी-बोलिये, eisi-wani-boliye
 eisi-wani-boliye


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या