प्रेरक व्यक्तीचित्रण : नर्मदाकाठची माणसे

         विविध कवींनी नद्यांची स्तोत्रे गायिलेली आहेत. जगन्नाथ पंडिताने गंगालहरीमधून गंगेला आळविले. एकेका श्लोकासोबत गंगा एकेक पायरी वर चढली आणि जगन्नाथाचा उद्धार केला. शंकराचार्यांनी नर्मदाष्टकाच्या माध्यमातून माता नर्मदेबाबातचा भक्तीभाव व्यक्त केलेला आहे. कित्येकांनी आपलं आयुष्य नदीकिनारी घालविलेले आहे. नदीकाठच्या लोकांचं जीवन निर्मळ आणि पवित्र बनविण्यासाठी जीवन वाहून घेतले आहे. अशाच देवी नर्मदेविषयी अपार श्रध्दाभाव बाळगून आपल्या जीवनयज्ञाची समिधा नर्मदेच्या भक्तीकुंडात अर्पण करणार्या नर्मदेच्या लेकरांची व्यक्तीचित्रे प्रतिभावान युवालेखक सुनिल पांडे यांनी 'नर्मदाकाठची माणसे' या ग्रंथात रेखाटली आहेत.
narmadakathachi-manase
narmadakathachi-manase

            लिहिणारा कोणी त्रयस्थ व्यक्ती असेल, तर त्या लिखाणात एक प्रकारचा कोरडेपणा  येतो. परंतु सुनील पांडे स्वत:ला नर्मदेचा पुत्र म्हणवतात. त्यामुळे पुस्तक वाचताना त्यांच्या शब्दांत स्वाभाविक आपुलकीचा जिव्हाळा जाणवतो. एका आंतरिक ओलाव्याने भरलेलं आणि भारलेलं व्यक्तीचित्रण म्हणजे सुनिल पांडे लिखित 'नर्मदाकाठची माणसे' हा ग्रंथ.  आदि शंकराचार्यांपासून ते एका बस स्टॅंडवर एका अनोळखी प्रवाशाला मदत करणार्या दिलखुलास अल्लड नर्मदेच्या लेकीपर्यंत असणारा विविधरंगी नर्मदा भक्तांचा जीवनपट या ग्रंथातून उलगडत जातो.
            भक्त म्हटले की, आपल्या डोक्यात एक ठराविक कल्पना असते. तशी ही व्यक्तीचित्रणे नाहीत. सुरूवातीलाच 'सौंदर्यवती नर्मदा' या जगद्विख्यात ग्रंथांचे लेखक अमृतलाल वेगड यांचे चरित्रदर्शन होते. अमृतलाल वेगड पेशाने शिक्षक. त्यांच्या लिखाणाविषयी लेखक सुनील पांडे लिहितात, "चांगल्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे ती पुस्तके आपल्याला विचार करायला भाग पाडतात. आपला दृष्टीकोन बदलतात. आपण वाचन का करतो? फक्त मनोरंजन म्हणून?... तर ह्याचं उत्तर म्हणजे जे पुस्तक आपल्याला एक नवी दृष्टी देते. आपल्या अनुभवाच्या कक्षा रूंदावते. आपल्या मनात एक चिमुकली पणती तेववून जाते... अशी पुस्तके हे खरे साहित्य."
अमृतलाल वेगड यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे मराठी अनुवाद करणार्या मिनल फडणीस यांचे व्यक्तीचित्रही मोठे मनोहारी पद्धतीने रेखाटलेले आहे. मुळात लेखिका किंवा अनुवादक नसणार्या मिनल यांना 'सौंदर्य की नदी नर्मदा' हे पुस्तक इतके आवडले की, त्यांनी थेट अमृतलाल वेगड यांना पत्र पाठवून  त्याचा मराठी अनुवाद करण्याची परवानगी मागितली. ती अर्थातच मिळाली आणि मराठी साहित्यात एका महत्वाच्या विषयावरच्या उत्तम पुस्तकाची भर पडली. 'नर्मदा परिक्रमा एक अंतर्यात्रा' या ग्रंथाच्या लेखिका महाराष्ट्रकन्या भारती ठाकूर यांचे चरित्रचित्रणही प्रेरणादायी आहे. नर्मदेच्या किनाच्याचे सौंदर्य आणि संस्कृती पाहण्यासाठी गेलेल्या भारती ठाकूर आपली केंद्र सरकारची नोकरी आणि घरदार सोडून नर्मदाकिनारी मंडलेश्वर येथेच राहिल्या. तिथे आज १४०० शालाबाह्य मुलांसाठी 'नर्मदालय' नावाने शाळा चालवतात. आपल्याच स्वार्थाच्या वर्तुळात जीवनभर फिरणार्या तुम्हा-आम्हा वाचकांसाठी हे विलक्षण प्रेरणादायी आहे.
            दिवसातून तीन वेळा फक्त तीन ओंजळी पाणी घेऊन, अनवाणी पायाने तीन-तीन नर्मदा परिक्रमा करणार्या माई कुंटेंबद्दल वाचताना आपल्याला आपल्या खुजेपणाची प्रकर्षाने जाणीव होते. त्यांना अश्वत्थाम्याचे दर्शन झाल्याचेही सुनील पांडे लिहितात. बडोद्याजवळच्या चंदनाचा पाऊस पडणार्या जागेविषयी  वाचताना आपली मती गुंग होते. तेरा कोटी जपानुष्ठान करणार्या सद्गुरू श्री श्रीराम महाराजांविषयाचा लेखही वाचनीय आहे. सद्गुरूंच्या आज्ञेशिवाय मी काही लिहिणार नाही, असे म्हणणारे प्रतापे महाराज मनाला भावतात. सुरूवातीला परिक्रमावासियांना लुटण्यासाठी भिल्लांना मदत करणारे हिरालाल रावत, आता  नर्मदा परिक्रमा करणार्यांची सेवा करताहेत. त्यांचे मन:परिवर्तन वाचायला मजा येते.
            अन्नपुर्णा प्रसन्न असतानाही आपल्या सिद्धी जनलोकांपासून झाकून ठेवणारे लखनगिरी महाराज आभाळाएवढ्या उंचीचे वाटतात. प्रतिभा चितळे आणि सुधीर चितळे हे दांपत्य वर्षाला किमान तीन हजार परिक्रमावासियांच्या भोजन आणि मुक्कामाची व्यवस्था करतात. हे सगळं कुठपर्यंत चालणार असं विचारल्यावर ते म्हणतात, "जवळचा पैसा आणि अंगातलं बळ यापैकी काहीही संपलं की, तिथं थांबायचं." तुम्ही कितीही पैसे दिलेत, तरी फक्त दहाच रूपये घेणारे सियाराम बाबा मनात घर करतात. सरकारने दिलेले दोन कोटी पंचावन्न लाख रूपये आदिवासींच्या विकासासाठी दान करणारे सियाराम बाबा जगातले सर्वांत श्रीमंत व्यक्ती वाटतात.
            इव्हेंट मॅनेजमेंटच्या क्षेत्रात विश्वभर 'बिझनेस वुमन' म्हणून लौकिक असताना, नदी स्वच्छतेबद्दल लोकांना जागरूक करणार्या वॉटर वूमन क्षिप्रा पाठक. त्यांच्यावरील लेखातील दोनतीन वाक्ये देण्याचा मोह होतो आहे. "दिवसातील २४ तासांपैकी एक तास  तरी आपण देवासाठी द्यायला हवा. तरूण पिढी आपल्या फॅशन, करियर आणि कपड्यांबद्दल जितकी जागरूक आहे, तेवढीच जागरूकता आपल्या धर्माबद्दाल आणि संस्कृतीबद्दल त्यांनी दाखवली पाहिजे. आपण खूप भाग्यवान आहोत की, आपण भारत देशात जन्म घेतला आहे. अध्यात्म हा केवळ एक विचार नसून, ती एक जीवनशैली आहे."
            श्रीरंग अवधूत स्वामी महाराज, टेंबे स्वामी महाराज, राणी रूपमती, अहिल्याबाई होळकर, आद्य शंकराचार्य, चित्रकार विजय काणे, मेधा पाटकर, अश्वत्थामा, सुमन किराणे, ज्योतीबेन-बोनीबेन, सुहास लिमये, पायल तडवी, रामराव गायकवाड, मंगेश ढमाळ, सनईवादक मधुकर सोनवणे, बडोद्याची ऐश्वर्या अशी एकंदर अठ्ठावीस चरीत्रे सुनील पांडे यांनी या ग्रंथात वर्णिलेली आहेत. लेखकाची भाषा प्रवाही आणि साधी असल्याने एका बैठकीत पुस्तक वाचून होते. अध्यात्म, ज्ञान, भक्ती, वैराग्य, मनोरंजन आदि साहित्यातले सगळे भाव पुस्तक वाचताना अनुभवाला येतात. संतोष धोंगडे सरांनी मुखपृष्ठही उत्तम केले आहे. एका वेगळ्या विषयावरचे आणि माहितीपूर्ण व प्रेरणादायी पुस्तक म्हणून हे पुस्तक प्रत्येकाने वाचायलाच हवे. आपल्या आप्तस्वकियांनाही नक्की भेट द्यायला हवे.
narmadakathachi-manase
narmadakathachi-manase


            पुस्तक परिचय - रमेश वाघ, नाशिक.
संपर्क - ९९२१८१६१८३
पुस्तक - नर्मदाकाठची माणसे
लेखक - सुनील पांडे
प्रकाशक - स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे
पृष्ठसंख्या - १०८
मूल्य - २००

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या