निसर्ग हाच गुरू

 
        शहराच्या आजूबाजूच्या टेकड्यांवर फिरायला जाताना बर्याचवेळा एक दृश्य पहायला मिळतं. टेकडीच्या पायथ्याशी किंवा दुसर्या चढावाजवळ लोक गोल करून बसलेले असतात. घरातून येताना आणलेले चिप्स, चिवडा, वडे वगैरे पोष्टीक(?) पदार्थ खात बसलेले असतात. त्यानंतर त्याची पाऊच, रॅपर्स वगैरे प्लॅस्टिक कचरा निसर्गाला दान करतात. दोनचार फोटो काढून घरी येतात. तेच फोटो आठवडाभर स्टेट्सला ठेवून आपल्या निसर्गप्रेमाचा डांगोरा गावभर पिटतात. जिथे गेल्यावर तुमच्या दु:खाचा विसर्ग होतो त्याला निसर्ग म्हणतात. पण जर लोक अशाप्रकारे निसर्गालाच उपसर्ग करतील, तर तो निसर्ग, निसर्ग कसा उरेल? निसर्गाकडून प्रफुल्ल जीवन कसं जगावं, हे शिकावं. त्याचा उकीरडा बनवू नये.
nature-is-guru
निसर्ग-हाच-गुरू

            परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय वहन्ति नद्यः । परोपकाराय दुहन्ति गावः परोपकारार्थमिदं शरीरम् ॥ वृक्ष स्वत:चं फळ स्वत: खात नाही. नदी स्वतं:चं जल स्वत: पीत नाही. गाय आयुष्यभर दुसर्यालाच दुध देते. तद्वत आपलं शरीरही परोपकारासाठीच आहे, हा संस्कार निसर्गाकडून घ्यावयास हवा. तरच निसर्ग तुम्हाला लाभदायक ठरेल. निसर्गात गेलं की, मनावरचे मालिन्याचे मळभ नाहिसे होतात. तणाव दूर होतो. रक्तदाब कमी होतो. चित्त प्रसन्न होतं. शरीरामध्ये हॅपी हार्मोनचा स्त्राव वाढतो. सहज जरी मोकळ्या हवेत गेलं, तरी थकलेल्या माणसाला फ्रेश वाटायला लागतं. कुसुमाग्रजांसारख्या श्रेष्ठ कवींना निसर्गाच्या कणाकणात ईश्वराचं दर्शन घडलं. कालीदासाला श्रावणमेघाकडे पाहून मेघदूत सुचलं.
            निसर्ग ही जगातली सर्वात मोठी मोफत शाळा आहे. डोळे उघडे ठेवून नीट बघणार्याला निसर्ग ज्ञानी बनवतो. निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या लोकांनी वेद उपनिषदांसारखे अक्षर वाङमय निर्माण केले. एका घायाळ क्रौंच पक्ष्याच्या दुखा:शी समरूप झाल्यामुळे वाल्मिकींना रामायणासारखं महाकाव्य स्फुरलं. दुर्दैवाने आपण ट्रिपच्या नावाखाली निसर्गात कचरा करून येतो. त्यामुळे फिरून आलेले लोक उत्साही दिसण्याऐवजी थकलेले दिसतात. आमच्या आदिवासी माणसाच्या खिशात शहरी लोकांइतके पैसे नसतात, पण ते कायम उल्हासित दिसतात, कारण ते निसर्गाशी एकरूप असतात. पर्यावरणाविषयीचा भक्तीभाव अंत:करणात जागा झाला पाहिजे. चराचर विश्व भगवंताने व्यापलेलं आहे, हे गीतेत पदोपदी सांगितलेलं आहे. ही
जाणीव जागी झाली की, व्यक्ती जबाबदारीने वागते. मग गंगा असो की हिमालय, तोही भगवंताचीच विभूती वाटायला लागतो. माऊली म्हणतात, स्थावरां गिरीवरां आंतु । पुण्यपुंज जो हिमवंतु । तो मी म्हणे कांतु । लक्ष्मियेचा ॥
रमेश वाघ, नाशिक
संपर्क - ९९२१८१६१८३
natute-is-guru,निसर्ग हाच गुरू
natute-is-guru


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या