स्वभाव गुण संपत्ती

             दम्भो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च । अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम् ॥ श्रीमद्भगवद्गीतेच्या सोळाव्या अध्यायाच्या पहिल्या तीन श्लोकांत दैवी गुणांचे वर्णन केल्यानंतर भगवंताने इथे  असूरी वृत्तीच्या लोकांच्या स्वभावात असणार्या प्रमुख सहा दुर्गुणांविषयी चर्चा केलेली आहे. दंभ, उर्मटपणा, गर्व, क्रोध, उग्रपणा आणि अज्ञान हे ते सहा गुण होत. दैवी गुण छत्तीस आणि  असूरी गुण सहाच असले, तरी ते फार बलवान आहेत. आपल्या आयुष्याचा स्वर्ग बनवायचा की नरक ते या गुणांवरच अवलंबून आहे. या सहा दोषांनीच देवमाणसाचा असूर बनतो.
swabhav-gun-sampatti
swabhav-gun-sampatti

            निंदकाजवळ सर्व पापे आपोआप येतात. प्रलयाग्नि, विद्युताग्नि व वडवाग्नि संख्येने तीनच आहेत. पण ते जर खायला निघाले, तर त्यांना प्राणाहुति करण्याला विश्वही पुरत नाही. कफ, वात व पित्त या त्रिदोषांचा क्षोभ झाल्यावर ब्रह्मदेवाला शरण गेलात, तरी मरण चुकत नाही. एखाद्याचं वाईट व्हायचं असेल, तर सर्वच वाईट ग्रह त्याच्या राशीला येतात. ज्याचं मरण जवळ येतं, त्याला सर्व रोग घेरतात. एखादा मुहूर्तच वाईट असेल, तर नेमके तेव्हाच सर्व वाईट योग एकत्र येतात. एखाद्यावर विश्वास ठेवावा आणि तोच चोर निघावा. दमलेल्या मनुष्याला महापुरात ढकलावं, मरणारच! शेळीचं आयुष्य संपत आलं म्हणजे तिला सात नांग्यांच्या इंगळीचा दंश व्हावा! तसा आपला नाश जवळ आला की, व्यक्ती या दोषांच्या आहारी जातो.

                देवत्व आणि असूरत्व दोन्ही आपल्याच ठायी आहेत. जगात संपूर्ण वाईट किंवा संपूर्ण चांगलं असं काही नसतं. या दोन दृष्टीकोनांच्या अधेमधेही भरपूर विश्व आहे. कोणताही व्यक्ती शंभर टक्के सद्गुणी असू शकत नाही. तसा कोणी शंभर टक्के टाकाऊही असू शकत नाही. अमंत्रमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम्‌ । अयोग्य: पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभ:॥ प्रत्येक अक्षराला मंत्राचं सामर्थ्य प्राप्त होऊ शकतं. प्रत्येक वनस्पतीचा औषधी उपयोग होऊ शकतो. कोणतीही व्यक्ती पूर्णत: त्याज्य नसते. फक्त त्यांचा योग्य उपयोग करता आला पाहिजे. स्वभावात सद्गुण जोपासलेत की, देवत्व येतं.

एखाद्या व्हीआयपी ठिकाणी भेटायला जा. दरवाज्यावर सुरक्षा कर्मचारी तुमची तपासणी करतात. तुमच्याकडे घातक काही नसेल, तरच तुम्हाला आत प्रवेश करता येतो. आपलं मनही एक प्रकारचं मंदिरच आहे. आपण जे काही स्वीकारू, त्याची नीट पडताळणी करूनच त्याला आपल्या मन आणि मेंदूमध्ये प्रवेश द्यायला हवा. आपलं मन काही उकीरडा नाही, की कोणी काहीही पुड्या सोडाव्यात आणि आपण त्या आपल्या डोक्यात भरून त्यावर रवंथ करीत बसावं. व्यक्तीने जीवनात सद्गुण धारण करावेत. कारण दुर्गुण म्हणजे मोहाचा साखळदंड असतो. तो तुम्हाला घोर पारतंत्र्यात टाकतो. येरी जे दुसरी । संपत्ति कां आसुरी । ते मोहलोहाची खरी । सांखळी जीवां ॥

रमेश वाघ, नाशिक

संपर्क ९९२१८१६१८३

Swabhav-gun-sampatti
Swabhav-gun-sampatti

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या