यूं कोई बेवफ़ा नहीं होता।

         बर्याचदा ट्रक ड्रायव्हर लोकांच्या समजूतदारपणाचा हेवा वाटावा इतपत सारगर्भ वाक्ये ट्रकच्या मागच्या बाजूला लिहिलेली असतात. त्यांच्या वाक्यांवरून खूप काही शिकायला मिळतं. बर्याचदा काहीच लक्षात येत नाही, असंही लक्षात येतं. कालपरवा  एका ट्रकच्या पाठीमागे दोन ओळी लिहिलेल्या होत्या. जिवाचं पाखरू आणि आपलेच गद्दार. खूप खल करूनही दोन ओळींची संगती लागेना. जीवाचा  तो आपला! आपलाच गद्दार! मग गद्दार जीवाचा कसा? आपलं जीवनच विसंगतीपूर्ण आहे. विसंगतपणा गेला की, सुसंगतपणा निर्माण होतो. संगती साधली की, दुर्गती होण्याचा संभव नसतो.
yu-koi-bewafa-nahi-hota
yu-koi-bewafa-nahi-hota

            तुमच्या आप्ताला तुम्ही जीवाभावाचं समजता. पण यातही बर्याचदा आपण आपल्याच चष्म्यातून जगाकडे पाहत असतो. प्रत्येकाच्या चष्म्याचा नंबर वेगळा असतो. त्यामुळे एकाच्या चष्म्यातून दुसर्याने पाहिलं, तर खाचखळगे दिसतात. नात्यांच्या बाबतीतही प्रत्येक वेळी आपण आपल्या बाजूने विचार करतो. समोरची बाजू पाहतच नाहीत. त्यामुळे कायम आपण तेवढे बरोबर आणि समोरचा चूक, अशी आपली समजूत होते. प्रत्येकाची काहीतरी बाजू असू शकते. बशीर बद्र म्हणतात, कुछ तो मजबूरियां रही होंगी, यूं कोई बेवफ़ा नहीं होता। या बाबीकडे आपलं दुर्लक्ष झालं की, जिवाचं पाखरू गद्दार वाटायला लागतं. आपण पसंत केलेला जोडीदार नाकारणारे आईबाप अमरीशपुरीपेक्षा भयानक खलनायक वाटायला लागतात. ज्याच्या सोबत एका ताटात चटणीभाकरी आनंदाने खाल्ली, तो दोस्त शत्रु वाटायला लागतो.
            काहीवेळा आपली निवडही चुकलेली असते. ज्यांची ज्या ठिकाणी बसायची लायकी नाही, त्यांना आपण त्या जागेवर बसवतो. शास्त्रकारांनी जीवलगाची सहा लक्षणे सांगितलेली आहेत. ददाति प्रतिगृण्हाति गुह्यमाख्याति पृच्छति। भुङक्ते भोजयते चैव षडविधं प्रीतिलक्षणम्। जो देतो आणि घेतो, मनातलं गुज सांगतो आणि विचारतो, जेवतो आणि जेवू घालतो तोच तुमच्या प्रेमाला पात्र. तुम्हाला जीव लावणारी व्यक्ती सहज बोलली, तरी त्यातून तुमच्या हिताचेच शब्द बाहेर पडत असतात. बर्याचदा तोंडावर सत्य बोलणारे वाईट वाटतात. पण त्यांना आपल्या हिताची कळकळ असते, म्हणून प्रसंगी स्वत:
कडे वाईटपणा घेऊन ते कठोर बोलत असतात. हे जर लक्षात आलं नाही, तर जन्मांध व्यक्तीला वेड लागल्यावर ती जशी सैरावैरा धावते, तशी मानवी मनाची अवस्था होते. माऊली म्हणतात, जात्यंधा लागे पिसे । मग ते सैरा धावें जैसें । तुझे शहाणपण तैसें । दिसतसे ॥
रमेश वाघ, नाशिक
संपर्क - ९९२१८१६१८३
yu-koi-bewafa-nahi-hota.
yu-koi-bewafa-nahi-hota.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या