स्वत:वर विश्वास ठेवा

 

                नकारात्मकता जाणीवपूर्वक जोपासावी लागत नाही. ती आपोआप उगवते, फोफावते. गवत कोणी पेरत नाही. ते आपोआप उगवतं. त्याला खता-पाण्याची  गरज नसते. उत्तम पीक जाणीवपूर्वक पेरावं लागतं. निगुतीनं जपावं लागतं. मानवी मनाचंही तसंच आहे. सद्विचार जाणीवपूर्वक पेरावे लागतात. कुविचार आपोआप प्रवेश करतात. नर्सरीपासून पदवीर्यंत निव्वळ इंग्रजी शाळेत शिकलेली लेकरं अस्सल गावरान मराठी शिव्या एकमेकांना देतात. तेही सहज! भांडणात वगैरे नव्हे! भ , मा, ल, अशा व्यंजनांनी सुरू होणारे शब्द तर मंत्रांप्रमाणे त्यांच्या मुखात असतात. नकारात्मकता न शिकवता वागण्या बोलण्यात उतरते.
believe-in-yourself
believe-in-yourself

                माणूस जन्मतच वाईट नसतो. चोर असो की सज्जन, हा नंतर त्यावर होणार्या संस्कारांनी आकाराला येतो. कोणाताही मानव जन्मत वाईट नसतो. “Man is born free, and everywhere he is in chains.” व्यक्ती जन्मतच स्वतंत्र असतो, असं थोर फ्रेंच विचारवंत रूसो म्हणतो. नंतर त्यावर विविध बंधनं येतात. काही समाजाकडून येतात.  बरीचशी तो स्वत:च स्वत:वर लादून घेत असतो. आपुली आपण करा सोडवण। अशी समाजहृदयाला साद घालणारे संत हे जाणून आहेत. प्रत्येक आजाराचं औषध वेगळं असतं. भारतीय परंपरेत बहूदेवतावाद येण्याचं कारण हेच आहे. ज्याची आवड जशी त्याने तशा प्रकारची उपासना करावी. अमूकच एक देवता पवित्र वा सर्वश्रेष्ठ असा आग्रह नाही. कारण एकाच मापाचा सदरा सगळ्यांना येत नसतो. एकाच देवाला सर्वांनी मानावं ही अपेक्षा करणं, हे तसं असतं. या कोड्याची सोडवणूक करण्यासाठीच जगातल्या सर्व धर्म आणि तत्वज्ञानाचा जन्म झालेला आहे.
                तरीही उदार, सहिष्णू लोकांपेक्षा हेकेखोर लोकच समाजात जास्त भेटतात. नकारात्मकता कायमच वरचढ ठरत असते. म्हणून सकारात्मकता जाणीवपूर्वक उभी करावी लागते. सत्संग हेतूपूर्वक करावा लागतो. कुसंग आपोआप होतो. एखाद्याने एखाद्या रोगाची लक्षणे सांगितली की, आपल्याला तो रोग झाला की काय, अशी शंका माणसाच्या मनात उभी राहते. पहिलवानाचं वर्णन ऐकून आपण पहिलवान झालो, असं मात्र कोणालाच वाटत नाही. हे तुमच्या आमच्या बाबतीतच नव्हे, तर अर्जुनासारख्या महारथी, भक्त आणि योग्याच्या बाबतीतही घडलेलं आहे.
     सोळाव्या अध्यायात भगवंत असूरांची लक्षणे सांगत असताना आपणही त्यातच मोडतोय का?  असा प्रश्न अर्जुनाच्याही मनात निर्माण झाला. तेव्हा तुमची आमची काय कथा? तुम्ही-आम्ही देखील अर्जुनच. म्हणूनच श्रीमद्भगवद्गीता फक्त अर्जुनालाच प्रेरणा देण्यासाठी नाही, तर तुम्हा-आम्हाला प्रेरीत करण्यासाठीही आहे. जेव्हा जेव्हा स्वत:विषयी. समाज, धर्म, राष्ट्र आणि संस्कृतीविषयी नकारात्मक विचार मनात येतील तेव्हा आपल्या जन्मजात दैवीपणाचं स्मरण प्रत्येकानं करणं आवश्यक आहे. वयम् अमृतस्य पुत्रा: माऊली म्हणतात,
म्हणौनि पार्था तूं या । दैवी संपत्ती स्वामिया ।होऊनि यावें उवाया । कैवल्याचिया ॥
रमेश वाघ नाशिक
संपर्क ९९२१८१६१८३

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या