आनंदाच्या गावाला जाऊया

 
      आपल्याला कोणी आनंदाच्या गावाला जायचा पत्ता सांगितला तर ॲडव्हांस रिझर्व्हेशन साठी झुंबड उडेल. वाटेल तितके पैसे मोजायला लोक तयार होतील. अर्थात असा पत्ता कोणी देणार नाही. दिला तरी ती फसवणूक असेल. कारण आनंद हा बाहेर नाहीच आहे. आनंद ही बाहेर शोधण्याची गोष्टच नाही. त्यामुळे मुदलात आनंदाच्या शोधासाठी बाहेर पडणे, हाच निरर्थक प्रयत्न. आनंदाचा पत्ता आपल्याला आपली ऋषी संतांनी खूप पूर्वीच सांगून ठेवला. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, म्हणून त्यांना सांगावं लागलं, तुझे आहे तुजपाशी परी तु जागा चुकलासी। आपण आपली   गाडी कुठल्या दिशेने  जाते आहे याचा विचारच कधी करीत नाहीत. म्हणून आपला शेवट खड्ड्यात पडण्यात होतो.
path-to-happiness, आनंदाच्या गावाला जाऊया
path-to-happiness


    व्यक्ती मुळात आनंदस्वरुप आहे. आनंद हा आत्म्याचा स्वभाव आहे. त्यामुळे तुम्ही एखाद्या लहान बालकाला पाहिलं, तर तुमच्या लक्षात येईल, ते कायम हसत असतं. त्याला त्यासाठी कारण लागत नाही. ब्रँडेड वस्तू लागत नाहीत. त्याला आनंद व्हावा म्हणून चौकात बॅनर लावावे लागत नाहीत. कोणी त्याचा फोटो स्टेटसला ठेवावा  लागत नाही. कोणत्याही गोष्टीच्या आणि परिस्थीतीच्या निरपेक्ष ते बाळ खुश असतं. हसणं मानवाचा स्वभाव आहे. तसं नसतं तर बाळ कायम हसरं दिसलं नसतं. लहान मूल दिवसाला तीनशे वेळा हसतं. आपण जसजसे मोठे होत जातो तसतसे आपले मन काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, अहंकार आदी विषाणूंनी ग्रासले जाते. मन आजारी पडते. त्यामुळे प्रौढ व्यक्ती दिवसाला सरासरी वीस वेळा हसते. हसण्याने आनंदी संप्रेरकांचा स्त्राव वाढतो. त्यामुळे मूड  फ्रेश होतो. यावर अनेक शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत.
      आपण कायम दुसऱ्याकडून बदलाची अपेक्षा  ठेवतो. स्वतःच्या आत कधी डोकावत नाही. परिणामी आपल्याला निखळ आनंदाचा रस्ता कधी सापडत नाही. आनंदासाठी खूप नाती, पैसा साधने काहीही लागत नाही. आपण गाढ झोपतो तेव्हा आनंदात असतो. झोपेत आपल्या लेखी विश्व नसतंच. तरीही आपण आनंदी असतो. याला कारण काय? आनंद बाह्य गोष्टीत नाहीच, हेच त्याचं उत्तर आहे. किंबहुना आनंद बाहेर शोधणे म्हणजे नशिबाने मिळालेला अमृताचा घडा पायाने लाथाडण्यासरखे आहे. माऊली म्हणतात,   दैवें अमृतकुंभ जोडला । तो पायें हाणोनि उलंडिला । तैसा नासिती धर्मु निपजला । हेतुकपणें ॥
रमेश वाघ, नासिक
संपर्क ९९२१८१६१८३
path-to-happiness, आनंदाच्या गावाला जाऊया
path-to-happiness



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या