शांततेच्या काळात घाम गाळा

शांततेच्या काळात घाम गाळला की, युध्दात कमी रक्त सांडावं लागतं. आग्र्याहून सुटल्यानंतर छत्रपती शिवरायांनी सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट ते चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर या चार वर्षांत भावी विजयाची पायाभरणी केली. पुरंदरच्या तहाने नष्टप्राय झालेल्या स्वराज्याचं हिंदवी साम्राज्यात रूपांतर केलं. जगाच्या इतिहासातल्या सर्वसमर्थ सम्राटाला सत्ताविस वर्षे टक्कर घेऊन याच मातीत दफन व्हावं लागलं. शिवरायांच्या विजयांचा इतिहास उच्चरवाने सांगितला जातो. पण विजयाची पार्श्वभूमी कशी तयार केली, याचा अभ्यास कोणालाही करायचा नसतो. कारण त्यात लौकिकार्थाने थ्रिल दिसत नसतं. जीवनाच्या स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर करायचं असेल तर, आत्ताच कामाला लागायला हवं.
sweat-in-piece-bleed-less-in-war,शांततेच्या-काळात-घाम-गाळा
sweat-in-piece-bleed-less-in-war

                सध्या सर्व मुलांच्या शाळा संपल्यात. गल्लीबोळात शेतकर्याची पोरं मोबाईलवर गेम खेळताना दिसतात. आईबाप शेतात घाम गाळतात. मोबाईलवर जर फक्त गेमच खेळत बसलो, तर आपल्या आयुष्याचाच गेम होईल, याची जाणीव लेकरांच्या स्वप्नातही नसते. घरच्यांचं ऐकत नाहीत. बाहेरच्यांनी तर  काही सांगायचीच सोयच उरलेली नाही. 'तरूणांनी रिल पाहून चिल होण्यापेक्षा, काहीतरी हासील करण्याचा प्रयत्न करायला हवा.' रिकाम्या वेळात आयुष्य वाया घालविण्यापेक्षा, आयुष्य घडविण्याचा विचार करावा. आज भारतात ऐंशी टक्के पदवीधर नोकरीच्या योग्यतेचे नाहीत असे सर्वेक्षण आहे. नोकरी नसल्याने गावोगाव अविवाहित बेरोजगारांच्या फौजा मातापित्यांच्या जीवाला घोर लावत आहेत. 'थ्री ईडीयट' सिनेमात एक संवाद आहे, काबील बनो, कामयाबी झक मारकर पीछे भागेगी.
                तरूणांना शेती कमी दर्जची वाटते. आज दोन एकरांत दरमहा एक लाखाचे उत्पन्न घेणारे तरूण महाराष्ट्रात आहेत. त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा. ज्याच्याकडे शेती आहे त्याने सुटीच्या काळात शेतीविषयक  प्रशिक्षण घ्यावं. इतरांनी रोजगाराभिमुख प्रशिक्षण घ्यावं. आज शिकायला फार पैसे लागत नाहीत. अनेक कोर्सेस ऑनलाईन मोफत उपलब्ध आहेत. युट्युबवर व्हिडीओ बनवून लाखो रूपये कमावणारे तरूण महाराष्ट्रात आहेत. सरकारी नोकरीच्या मागे तारूण्य वाया घालविण्यापेक्षा पर्यायी मार्गाचा विचार करावा. दिवसेंदिवस सरकारी क्षेत्र संकुचित होत आहे. याचा पालकांनीही विचार करावा. ज्ञानाधारीत अर्थव्यवस्थेमध्ये वेळ वाया न घालविता नवनवीन ज्ञानकौशल्यांचा शोध तरूणांनी घ्यायला हवा. अन्यथा बंद मुठीतून वाळू  निसटून जावी, तसं तारूण्य एक दिवस निघून जाईल. अखंड साधना करून योग्यता मिळवा. एक कर्मयोगु जाण । जेथ साधकजन निपुण । होवूनिया निर्वाण । पावती वेळे ॥
रमेश वाघ नाशिक

संपर्क ९९२१८१६१८३

sweat-in-piece-bleed-less-in-war, शांततेच्या काळात घाम गाळा
sweat-in-piece-bleed-less-in-war


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या