भेदाभेद भ्रम अमंगळ

 
        पाच एप्रिल हा दिवस युनोने जागतिक विवेक दिवस म्हणून घोषित केला आहे. त्यामागचा उद्देश जाहीर करताना युनोने असं म्हटलंय की, 'वंश, लिंग, भाषा किंवा धर्म असा भेद न करता सर्वांसाठी मानवी हक्क आणि मुलभूत स्वातंत्र्याच्या आदरावर आधारित स्थिर, कल्याणमय, शांततापूर्ण आणि मैत्रीपूर्ण संबंधांच्या निर्मितीसाठी पाच एप्रिल हा जागतिक विवेक दिवस घोषित केलेला आहे.' अशिक्षितांनी भेदभाव केला, तर समजू शकते, पण शिकलेलेच  भेदांच्या तटबंद्या उभ्या करतात, याची खंत वाटते. ज्याने मानवी शरीररचनाशास्त्राचा थोडाफार अभ्यास केलाय, त्याला माणसामाणसात  भेदच वाटायला नको. सगळ्यांचा मेंदू डोक्याच्या कवटीतच असतो. ज्याचा तिथून सरकतो, तो भेदभाव करायला लागतो.
to-divide-is-impure
to-divide-is-impure
                ज्याची जगाकडे पाहण्याची दृष्टी निर्मळ आहे, त्याला सगळं जग विष्णुमय दिसतं. भेदाची भावना म्हणजे अज्ञानापोटी जन्मलेला भ्रम आहे. तो भ्रम आहे,  म्हणून अमंगळ आहे. अमंगळ आहे म्हणून त्याज्य आहे. जनतेत जनार्दन पाहणारे शांतिब्रह्म एकनाथ महाराज गोदेच्या वाळवंटात रडणार्या अंत्यजाच्या लेकराला कडेवरही घेतात आणि असपृश्यांच्या वस्तीत जेवायलाही जातात. भेटणार्या प्रत्येक व्यक्तीत भगवंताचं रूप पाहणारे ज्ञानोबाराय चोखयाच्या महारीच्या हातची खीर आनंदाने खातात. लेकुरवाळ्या विठोबाची सगळी लेकरं आपल्या जातीच्या ओळखीसकट वाळवंटात प्रेमाचा गोपाळकाला करतात. एकमेकांच्या मुखात जिव्हाळ्याचा घास भरवतात. ना कोणाला कसलं वावडं, ना विटाळ! सर्वस्य चाहं हृदिसन्निविष्टो म्हणत सर्वांच्या हृदयस्थ भगवंतांची जाणीव ठेवून मानव्याला एकत्वाच्या धाग्यात गुंफणारी सनातन भारतीय संस्कृती आहे.
                जो समाजात असलेले भेद मिटवतो तो संत. जो नसलेले भेद उभे करतो, तो जंत. संत विचार निर्माण करतात. जंत विकार निर्माण करतात. स्वार्थ हेतूच्या सिद्धीसाठी लोकांमध्ये नसलेली वेगळेपणाची भावना निर्माण करतात. कोणी जातीने फुटला नाही, तर धर्माने फोडतात. आर्य विरूद्ध द्रविड सारखा कृत्रिम वाद उभा करतात. संवादसेतू बांधण्यासाठी जन्माला आलेली भाषाच भेदाचं अस्त्र म्हणून वापरतात. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया। सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दु:ख भागभवेत। हीच आपली अखंड प्रार्थना आहे. तिच्या विपरीत जे काही असेल, त्याचा पाखंड समजून तिरस्कार करावा. हाच विवेक. आपल्या कालजयी साहित्यात विवेकाची उद्याने आहेत. भावार्थदीपिकेच्या प्रस्तावनेत माऊली म्हणतात, आता अवधारा कथा गहन। जे सकळां कौतुका जन्मस्थान। की अभिनव उद्यान।
विवेकतरूचे।।
रमेश वाघ, नाशिक
संपर्क - ९९२१८१६१८३

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या