त्यांचं बोलणं कधीच आल्हाद देत
नाही. कधी कोणाचा उपमर्द करतील, तर कधी उपहास. धुराड्यातून धुराशिवाय दुसरं काय
निघणार? उंटाचं शरीर सरळ नसतं, तसा
यांच्या चित्तातच कायम वाकडेपणा असतो. जगात आपल्या बळाचा उपयोग करून ओरबाडता येईल
तितकं सुख ओरबाडण्याचा प्रयत्न करावा, हेच पुण्यकर्म अशा प्रकारची यांची मांडणी
असते. जीवो जीवस्य जीवनम्। तुम्ही जगा आणि दुसर्याला जगवा, ही वेदांताची
भाषा त्यांना पटत नाही. सामर्थ्याचा उपयोग लुटण्यासाठी करतात. मोठा मासा छोट्या
माशाला खातो, मग त्याला काय पाप लागतं? आम्ही पण तसेच गरीबांना लूटू. असा यांचा युक्तीवाद!
प्रज्ञा, शील आणि करूणा यांचा
त्रिवेणीसंगम जीवनात असेल, तर जीवनाचं सोनं होतं असा उदात्त विचार डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांनी विश्वाला दिला. परंतु प्रज्ञा जर शीलहीन निपजेल, तर त्यात कारूण्य
कोठून येणार? धर्म, न्याय, सत्य, समता, बंधुता, स्वातंत्र्य, राष्ट्रप्रेम या
गोष्टी फक्त परीक्षेत दोन मार्कांची टीप लिहिण्यापुरत्या असतात. त्यांचा जगण्याशी
काहीही संबंध नसतो. असा विचार जीवनात आला की, ती प्रज्ञा समाजविघातक सिद्ध होते.
जगाचं वाटोळ अशा शीलहीन प्रज्ञावंतांकडून जास्त होत आहे. ज्या संकल्पना उराशी
बाळगुन समाजाने पृथ्वीचा स्वर्ग बनवण्याचं स्वप्न पाहिलं, त्या कल्पनांच्या
विरोधात गरळ ओकण्यातच यांची उभी हयात जाते.
स्व:तसोबत
विश्वाच्या विकासाचा विचार करते, तीच शीलवान प्रज्ञा. चाळीस पंचेचाळीस पलीकडे
तापमानाचा पारा पोचला असतानाही, किमान एकतरी झाड जगवावं असं कोणालाच वाटत नाही.
घरातून जातानाच कापडी पिशवी सोबत नेऊन बाजार करणं शक्य असताना विनाकारण कॅरीबॅगचा
आग्रह का घरतो आपण? सायकलवर किंवा पायी चालत जाऊन काम होणार असेल, तर गाडी
का काढायची? बस मिळत असेल तर स्वत:ची गाडी कशाला न्यायची? केवळ स्वार्थाचा विचार म्हणजे
असूरी विचार. धूमकेतूचा उदय म्हणजे विश्वावर कोसळणार्या संकटाचा पूर्वसंकेत असतो.
माऊली म्हणतात, उदैजणें केतूचें जैसे। विश्वा अनिष्टोद्देशें । जन्मती ते तैसे
। लोकां आटुं ।।
रमेश वाघ, नाशिक
संपर्क ९९२१८१६१८३
1 टिप्पण्या
खूप छान सर
उत्तर द्याहटवा