एक झाड लावू मित्रा

            लहानपणी कुठल्याशा पुस्तकात एक धडा होता. एक म्हातारे आजोबा रस्त्याच्या बाजूला आंब्याच्या कोया लावत असतात. त्यांना एकजण हटकतो, "बाबा, कुणासाठी ही झाडे लावता?" म्हातारा उत्तरतो, "मला माहित आहे , या झाडांची फळं मी नाही खाऊ शकणार, पण माझे नातू नक्की खातील. माझ्या आजोबांनी लावलेल्या झाडाची फळं मी आयुष्यभर खाल्लीत. आता येणार्या पिढ्यांसाठी मी नको का पेरून ठेवायला?" तपशील इकडे-तिकडे असला, तरी त्याचा आशय नेमका हाच होता. तेव्हा त्याचा अर्थ किती कळला माहित नाही, पण या उन्हाळ्यात त्याचा अर्थ गहिरा होऊन सामोरा येतोय.
please-plant-a-tree, एक झाड लावू मित्रा

            लहानपणी मोठमोठ्या झाडांवर सूरपारंबा खेळायचो. आंबे उतरवल्यावरही महिनाभर चुकार कैर्यांचे पाड खायला मिळायचे. निवांत झोपावं इतका विस्तार असलेल्या झाडांच्या फांद्या होत्या. आज ही महाकाय झाडं शेताच्या बांधाबांधारून नाहीशी झालीत. झाडाचा ओसावा माझ्या पिकावर आणि फळं खायला मात्र भावकीतले पन्नास वाटेकरी? नकोच ती झंझट, म्हणून शतका-शतकांची साक्षीदार असलेली झाडं लोकांनी काढून टाकलीत. आता भर दुपारी उन्हाने तल्खली झालेलं एखादं चुकार वासरू जेव्हा सावली शोधतं, तेव्हा त्याला अख्या शिवारात कुठंच गार निवारा देईल असं झाड दिसत नाही. अख्या गावाला थंडगार ठेवणार्या गावकुसाभवतालच्या चिंचा गायब झाल्यात. ओढ्याचं फक्त नाव जांभूळओढा, प्रत्यक्षात फक्त ओढा. जांभळाची झाडं गायबच.

            येत्या पावसाळ्यात एकच करा, स्वार्थ न पाहता एक झाड लावाच! कुठेही! खरंतर आम्ही नवीन झाडं लावायची गरजच नव्हती. आहेत ती तोडली नसती, तरी ही वेळ आली नसती. जो तुमचं सुखदु:ख वाटून घेतो तो तुमचा सोयरा. आमचे तुकोबा म्हणतात झाडं, वेली, वनात राहणारे वनचर, स्वच्छंदपणे आपल्याच नादात गाणारे पक्षीच आमचे सोयरे. आम्ही रस्ते बनवताना पाच-पाचशे वर्षांचे वड काढलेत. आता हायवे आहे, पण चार मिनिटं गाडी लावायला सावली नाही. झाड कधीही स्वार्थ पाहत नाही. ना आमच्या पूर्वजांनी कधी तो पाहिला. आम्ही वृक्षांत वासूदेव पाहतो. मनोवांछित देणारा कल्पतरू, सुगंध देणारा पारिजात वा चंदनाला आम्ही वंदन केलं नाही, पण फूल, फळ असं काहीही न देणार्या पिंपळाला भगवंताचं रूप मानलं. माऊली म्हणतात, कल्पद्रुम हन पारिजातु । गुणें चंदनुही वाड विख्यातु । तरि ययां वृक्षजातां आंतु । अश्वत्थु तो मी ॥

रमेश वाघ, नाशिक

संपर्क - ९९२१८१६१८३

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या