सद्वर्तनाचं बीज

सकाळी उठल्यावर पहिल्यांदा हात फोनवर जातो. व्हाट्सअपला कोणी काय पाठवलंय ते चेक करतो. चहूकडून प्रेरणादायी संदेशांचा पाऊसच पडतो. लोकांचं आपल्यावरचं प्रेम पाहून गुदमरायला होतं. काही मेसेज इतके जीवनाला लागू होणारे असतात की, समोरच्याला मनातल्या मनात अलिंगन द्यायची इच्छा होते. लोक कसे असतात, आपण कसे वागावे, कोणत्या गोष्टीवर लक्ष द्यावे, कोणत्या सोडून द्याव्यात...इतके मेसेज येतात की, त्यातला कोणताही दुर्लक्ष करावा असा नसतो. वाचताना इतकं प्रसन्न वाटतं की, वाटतं मनात प्रेरणेचा निर्झरच खळखळ वाहतो आहे. थोड्या वेळाने सगळं सपाट. ज्याने आपल्याला शांत कसं राहावं, असा संदेश पाठवलेला असतो, तोच चौकात रिक्षावाल्याशी भांडताना दिसतो.
seed-of-good-behaviour
seed-of-good-behaviour
        असं का होतं? मग जे भारंभार सुविचार आपण रोज फोनवर वाचतो ते निरर्थक असतात का? शोधून शोधून स्टेटसला इतके अमूल्य विचार ठेवले जातात, ते वायफळच असतात का? तर तसं नाही. ते उपयुक्तच असतात. परंतु ते वाचून त्यावर मनन करायचं असतं, हे मात्र आपल्या गावीही नसतं. कितीही उत्तम दर्जाचं बी आणलंत, दररोज त्या बियाणाच्या पिशवीकडे पाहिलंत, पण ते जर पेरलंच नाही, तर त्याचा उपयोग शून्य आहे. एखादा कोणी भाग्यवान त्या विचारांची मनात पेरणीही करतो, पण मशागत करीत नाही. पिकाला वेळच्या वेळी खतपाणी, खुरपणी मिळाली नाही, तर त्यातून अपेक्षित फळ येणारच नाही. आपण संदेश पाठवतो-वाचतो म्हणजे फक्त बीजाकडे पाहतो. ना पेरतो, ना  वाढवतो.
        सद्विचार हे बीजरूप असतात, तर सद्वर्तन हे त्याचं फळ. सगळ्याच विचारांना वर्तनाचं फळ लागत नाही. म्हणून विचार वारंवार सांगावे लागतात. त्यासाठीच आपल्याकडे ज्ञानदेवे रचिला पाया पासून तुका झालासे कळस पर्यंत ईश्वरनिष्ठांची मांदियाळी आयुष्यभर झटलेली आहे. तरीही लोक वेळेवर जागे होत नाहीत. क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे. वेळीच क्रिया घडायला हवी. यावत्स्वस्थमिदं शरीरमरूजं  यावज्जरा दूरतो यावच्चेन्दियशक्तिरप्रतिहता यावत्क्षयो नायुषा:। आत्मश्रेयसि तावदेव विदुषा कार्य: प्रयत्नो महान सन्दीप्ते भवने  तु कूपखननं प्रत्युद्यम: कीदृश:।। जोपर्यंत शरीरस्वास्थ मजबूत आहे तोपर्यंतच आत्महितासाठी प्रयत्न करावेत. घराला आग लागल्यावर विहीर खणून काय फायदा? कोणतीही गोष्ट अवधानपूर्क केलीत, तर आनंद प्राप्त होतो. माऊली म्हणतात, अहो अळुमाळु अवधान देयावें। येतुलेनि आनंदाचे राशीवरी बैसावें। बाप श्रवणेंद्रिया दैवें। घातली माळ।।
रमेश वाघ, नाशिक
संपर्क ९९२१८१६१८३
seed-of-good-behaviour,सद्वर्तनाचं बीज
seed-of-good-behaviour


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या