एकादशीचा खरा अर्थ काय?

 

एकादशीचा अर्थ समजून घेताना एकादशी कशासाठी? असा प्रश्न पडला पाहिजे. तेव्हाच त्याचा खरा अर्थ उलगडून समोर येतो. जीवन जगत असताना जीवनामध्ये बाहेरचे अनंत प्रभाव आपल्या मन, बुद्धी, आत्म्यावर पडत असतात. त्यातले नव्वद टक्के प्रभाव नकारात्मक असतात. त्या नकारात्मक प्रभावांचा निरास करून मन, बुद्धी आणि आत्मा सकारात्मक बनवण्याची साधना म्हणजे एकादशी होय. आत्मशुध्दीचा प्रवास म्हणजे एकादशी.

what-is-real-meaning-of-ekadashi
what-is-real-meaning-of-ekadashi

आज एकादशी म्हटले की, लोक फक्त शाबुदाण्याची खिचडी एवढाच विचार करतात. आपला प्रत्येक धार्मिक उपक्रम हा फक्त खाण्यापुरता मर्यादित झाला आहे. लोक फक्त खाण्यासाठीच जगतात. वास्तविक जगण्यासाठी खाणे की खाण्यासाठी जगणे, हा सनातन प्रश्न असला, तरी आज सर्व प्रकारची विपुलता उपलब्ध असताना खाण्यासाठी जगणे हा रानटीपणाच आहे. जगण्यासाठी जितके आवश्यक आहे तितकेच खावे, हा सुसंस्कृतपणा आहे. त्यामुळे एकादशीच्या दिवशी खाण्याचा विचार करण्यापेक्षा त्याच्या पलीकडच्या विचार करणे आवश्यक आहे.

एकादश म्हणजे अकरा. पाच ज्ञानेन्द्रिये, पाच कर्मेंद्रिये आणि अकरावे मन. या अकरा इंद्रियांचा वापर देव, देश, धर्म आणि संस्कृतीसाठी करणे याचे नाव एकादशी. तो तसा करण्यामध्ये खाणे, स्त्रीसंग किंवा अजून कुठल्या गोष्टी अडथळा ठरत असतील, तर त्या दिवसापुरत्या तरी टाळायला हव्यात. म्हणून एकादशीच्या दिवशी या सगळ्या गोष्टी टाळण्याचा सल्ला सर्व संतांनी दिलेला आहे. एकादशीस अन्न पान । जे नर करिती भोजन । श्वानविष्ठे समान । अधम जन तो एक ॥ किंवा सेज बाज विलास भोग । करी कामिनीचा संग । तया जोडे क्षयरोग । जन्मव्याधी बळिवंत ॥ अशा तुकोबारांच्या  वचनांमागचं बौद्धिक कारण हे असं आहे. परंतु ते न समजावून घेता आपण फक्त खाणे आणि एकादशी यांचा संबंध बांधलेला आहे.

स्वामी विवेकानंदही असे म्हणालेले आहेत की, 'आमचा धर्म फक्त स्वयंपाक घरात बंदिस्त झालेला आहे.' प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले म्हणायचे, 'जर शाबुदाण्याला काही अध्यात्मिक मूल्य असेल, तर ते वांग्याच्या भाजीला का नाही?' अमूक एक गोष्ट खाल्ली पाहिजे, असा नियम असता, तर वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे पदार्थ उपवासाला चालतात, असे का? उपवास म्हणजे सद्विचारांच्या सान्निध्यात राहणे. त्यासाठी वेळ जास्त मिळावा म्हणून स्वयंपाकात वेळ न घालवता, जे सहज उपलब्ध असेल, ते खावं हा त्यामागचा साधा अर्थ आहे. फार महत्वाचं काम असेल, आणि जेवायला वेळ नसेल, तर आपण न जेवताही निघतोच की नाही?

सर्वसामान्य संसारी व्यक्तीला कायम धर्म, संस्कृतीचा विचार करून निस्वार्थपणे त्यासाठी कार्य करणे शक्य नाही. म्हणून तुम्ही महिन्यातून एकादशींचे किमान दोन दिवस ते कार्य करा. ही सूट आपल्याला आपल्या संस्कृतीने दिलेली आहे. ख्रिश्चन दर रविवारी नियमाने चर्चमध्ये जातात. मुसलमान शुक्रवारी एकत्र येतात. हिंदूंनी ते कधी केलं पाहिजे? यासाठी एकादशी. हिंदुंसाठी अशा प्रकारचा कोणताही नियम नाही म्हणणार्यांनी एकादशीचं तत्त्वज्ञान अभ्यासलेलंच नाही.

जे एकादशीला तुम्ही करता, ते रोज करतो त्याला ब्राह्मण म्हणतात. भले त्याचा जन्म कोणत्याही जातीमध्ये झालेला असो. मग तो क्षत्रिय असलेला विश्वामित्र असेल, कोळी असलेला वाल्मिकी असेल, मच्छिमार असलेला व्यास असेल वा भिल्ल असलेली शबरी असेल. त्यांचं कार्य जर समाज उभारणीचं असेल, तर त्यांना संस्कृतीने ब्राह्मण मानलेलं आहे. पूजनीय ठरवलेलं आहे.

जो धर्म आणि संस्कृतीच्या कामासाठी स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता झटतो, त्याच्या वृत्तीचा विचार समाजाने केला पाहिजे. अन्यथा तो समाज कृतघ्न ठरेल. म्हणून ब्राह्मणाला दान देणे, ब्राह्मण भोजन या गोष्टी उदयाला आल्या. जो स्वार्थरहित होऊन भगवत्कार्याचे व्रत घेऊन घरोघरी जातो, त्याच्या वृत्तीचा भार उचललात, तर त्याने केलेल्या कामाचे पुण्य तुम्हाला निश्चितच मिळेल. कारण तुमच्या मदतीमुळे तो स्वतःच्या पोटाची चिंता न करता धर्मकार्यासाठी फिरू  शकतो. उद्या तुम्ही त्याची काळजी घेतली नाहीत, तर तो पोटाच्या मागे लागेल. जेव्हा ब्राह्मण धर्माचा विचार सोडून पोटार्थी बनतो,  तेव्हा त्याचं ब्राह्मणत्व संपतं.

पाश्चिमात्य लोक मिशनर्यांना भरभरून दान देतात. त्या मागची संकल्पना हीच आहे. फक्त त्यांचा हेतू हलका आहे. भारतीय संस्कृतीचा विचार वेगळा आहे. सगळं जग गुणवान बनावं हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून आपल्याकडे आर्यांचा उद्घोष आहे, कृण्वन्तो विश्वम आर्यम्।। सगळं जग आर्य बनलं पाहिजे. गुणवान बनलं पाहिजे. आर्य हा शब्द गुणवाचक आहे. वंश, जाती, वर्ण, धर्म, किंबहुना प्रदेशवाचक देखील नाही. डाव्यांनी किंवा स्वतःचा धर्मप्रचार करण्यासाठी हिंदूंवर टीका करणाऱ्या लोकांनी त्याचा संकुचित अर्थ लावला. ती त्यांची व्यावहारिक गरज होती. परंतु सनातन हिंदू देखील त्यांच्याच ओंजळीने पाणी पिईल, तर ते उचित नाही.

रामराज्याचं वर्णन करताना वाल्मिकी लिहितात, न मे स्तेनो जनपदे न कदर्यो न मद्यपो । नाना हिताग्निर्नाविद्वान्‌ न स्वैरी स्वैरिणी कुत:।। रामराज्यात एकही चोर नव्हता. कंजूष, बेवडा, स्वैराचारी असा कोणीही नव्हता. सर्व लोक विद्वान, यज्ञ करणारे, एकमेकांच्या हिताचा विचार करणारे होते. तुम्ही किहीही गुणवान असा, तुमचा शेजारी दहशतवादी असेल, तर तुम्हाला सुखाने जगता येणार नाही. त्यामुळे त्याच्यामध्येही गुणांची पेरणी करणे, हे तुमचे आवश्यक कर्तव्य बनते. ते कार्य बारमाही नाही करता आले,  तरी एक दिवसतरी करावं. त्याचं नाव एकादशी.

आज या गोष्टी तर्काच्या आधारे समजून घेण्याची आवश्यकता आहे. कारण तुमच्या सनातन धर्मश्रद्धा कलुषित करून उध्वस्त करण्याचे नियोजनबद्ध प्रयत्न अनेक शतकांपासून सुरू आहेत. कोणत्याही कृतीमागचं शास्त्रीय कारण तुम्हाला माहीत नसेल, तर तुमची श्रद्धा डळमळीत होणार, हे नक्की. तुमची श्रद्धा पक्की ठेवायची असेल, तर प्रत्येक सण-उत्सव, परंपरा या मागचं शास्त्रीय कारण समजून घेणं आवश्यक आहे.

सगळं जग गुणवान होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. असा प्रयत्न रोज केला नाही तरी चालेल, महिन्यातून किमान दोन दिवस करा. तीच एकादशी. तुमच्या कोशातून बाहेर या. आज लोक असा विचार करतात की, मी भलं आणि माझं काम भलं. यावरून असंही म्हणता येईल की, यांच्यात आणि दारुड्यामध्ये काहीच बदल नाही. दारुड्यादेखील स्वतःच्या कोशातच राहतो. तोही एकदा पिला की, गटरात पडून राहतो. तोही समाजाचं काही भलं करीत नाही. तुम्हीही नाही. दोघांची किंमत एकच. जो कधीही स्वार्थाशिवाय घर सोडत नाही, अशा घरघुशांना मग समाजाला नावे ठेवण्याचाही अधिकार उरत नाही.

आज वारी असो वा अजून कुठल्याही विषय असो, रील्स काढून समाजमाध्यमात व्हायरल करण्याचा तरुणांमध्ये ट्रेंड आहे. परंतु ते फक्त 'रील' पुरतं मर्यादित न राहता 'रियल लाईफ' मध्ये प्रतिबिंब झालं पाहिजे. तर त्या गोष्टी करण्याला अर्थ आहे. अर्थाशिवाय जर तुम्ही गोष्टी करत असाल, तर त्या केवळ निरर्थक कर्मकांड ठरतात.

 एकादशीचे व्रत करताना एकादशी का? कशासाठी? असा विचार जर कराल, तर हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपोआप तुम्हाला मिळत जातील. भारतीय परंपरेमध्ये कोणतीही गोष्ट विनाकारण नाही. कोणतीही गोष्ट फक्त स्वतःला आनंद मिळावा म्हणून नाही. प्रत्येक गोष्टीमागे व्यक्ती सोबतच देव, देश, धर्म आणि संस्कृती यांचा विचार गुंफलेला आहे. तो तसा विचार एकादशीच्या विचारामागे सर्वाधिक गुंफलेला असल्यामुळे एकादशीला सर्वश्रेष्ठ व्रत मानलेलं आहे. हे समजून उमजून जो अंगीकारेल तोच खरा एकादशी व्रताचा अधिकारी ठरेल. मग तो बटाटे खातो की वांगी खातो याला फारसं महत्त्व उरत नाही.

लेखक - रमेश वाघ, नाशिक

संपर्क - ९९२१८१६१८३

what-is-real-meaning-of-ekadashi, एकादशीचा खरा अर्थ काय
what-is-real-meaning-of-ekadashi



एकादशीचा खरा अर्थ काय
what-is-real-meaning-of-ekadashi

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या