काही स्वत:ला उगाचच आपले नगरशेट समजत असतात. हा समोर आला तर लोक बोलतही नाहीत. तरीही
स्वत:ला मोठे
मानित असतात. गर्वाने फुगून जातात. फुगले की विनय संपतो. नम्रता उरत नाही. असले
लोक लोखंडाचे खांब असावेत, तसे असतात. आभाळाला भिडणार्या दगडांच्या ढिगार्याप्रमाणे त्यांना
कोणासमोर लवणं ठाऊकच नसतं. लोकांनी कौतुक केलं नाही, तर स्वत:च स्वतचं कौतुक करतात. आपलं भागलं, की जगाचं वाटेल ते
होवो, यांना
त्याच्याशी कर्तव्य नसतं. मी तेवढा श्रेष्ठ. इतरांना गवताच्या काडीइतकीही किंमत
देत नाहीत.hyppocracy-of-social-work
पैसा अकलेपेक्षा जास्त मिळाला, की त्याचीच नशा चढते. त्या नशेमध्ये काय केलं पाहिजे आणि काय
टाळलं पाहिजे, याचाही विवेक त्यांना राहत नाही. जगातल्या कोणत्याही मांगलिक
गोष्टींशी कसलंही नातं उरत नाही. स्वत:चा तोरा मिरवण्यासाठी नको ती नाटकं करतात. पिसाळलेल्या
कुत्र्याची जशी दिशाहिन वर्तणूक, तशी त्यांची कार्याकार्याची दिशा हरवते. जगात जे
जे उत्तम, त्याची भ्रष्ट नक्कल करण्याचा प्रयत्न करतात. लोक भक्ताला मान देतात हे
लक्षात आलं, की भक्तपणाची झूल पांघरतात.
जी भक्ती मनाचा आजार दूर करते, तिचाच बाजार मांडतात. हे सार्वजनीन आणि सार्वकालिक
सत्य आहे. केवळ अमूक एका धर्मात, देशात वा काळात असं घडतंय, असं मानण्याचं काहीच
कारण नाही.
वासरू मेलं, की गाय दूध काढून देत नसते. तिला फसवून दूध काढण्यासाठी
भुशाचं वासरू बनवून हुशार शेतकरी दूध
मिळवतो. तसं हे लोक सामान्य लोकांना बावळट बनवून त्यांचा फायदा घेत असतात.
यज्ञाविषयी मनात मुळीच श्रध्दा नसते. तरीही यज्ञ करतील. अर्थात त्यात विधीवत
गोष्टींची टिंगलच असणार यात वाद नाही. विद्वानांचा यांना मनापासून तिटकारा असतो.
तरी लोकांसमोर आपण कसे विद्वानांचा सन्मान करतो, ही गोष्ट मिरवतात. लोकांना मूर्ख बनवून त्यांची नागवणूक
करण्याची यांची पद्धतच वेगळी असते.
दैवी गुणांच्या लोकांचं वर्णन करण्यासाठी माऊलींनी जितक्या ओव्या खर्च
केल्या असतील, त्यापेक्षा अधिक ओव्या असूरी लोकांची लक्षणे सांगण्यासाठी खर्च केलेल्या
आहेत. एकवेळ समाजाला संत कोण आहे, हे नाही समजलं तरी चालेल, पण भोंदू ओळखता यायला
हवा. मानवी जीवनात एकदा गेलेला क्षण पुन्हा कधीही येत नाही. अनमोल आयुष्यातला
दुर्मिळ क्षण चुकीच्या लोकांच्या सावलीत घालवलात, तर आयुष्याची माती होते. हे
ढोंगी लोक गरीबांची गरीबी दूर करण्याच्या नावाखाली स्वत:चीच गरीबी हटवतात. कोणांचं हित
करावं अशी यांची मनातून धारणाच नसते. लोकांचं हित करतात असं जरी बाहेरून वाटत असलं,
तरी त्यातून अंतत: सामान्य लोकांचा सर्वनाशच ओढवतो. माऊली म्हणतात, ऐशा कांहीं
आपुलिया । होमिती जे उजरिया । तेणें कामिती प्राणिया । सर्वनाशु ॥ज्ञा.१६. ३८८ ॥
रमेश वाघ, नाशिक
संपर्क -९९२१८१६१८३
आमच्या व्हाट्सअप समूहात सामील होण्यासाठी येथे क्लिक करा.
|
महाराष्ट्राचे विचारदुर्ग |
0 टिप्पण्या