अंधार मूळचाच काळाकुट्ट असतो.
त्यावर अजून काजळाचे लेप दिलेत तर काय होईल? तसं आसूरी वृत्तीच्या
लोकांना थोडंसं मोठेपण मिळालं की, त्यांचा गर्व अजूनच फुलतो. मूर्खपणा दृढ होतो. उद्धटपणा
वाढतो. अहंकार आणि अविचारही दुप्पट होतात. मग कोणत्याही बाबतीत, घरात असो की
समाजात आपल्याशिवाय इतर कोणाचे नाव देखील मुळीच निघू नये, एवढ्याकरता
त्यांच्या सामर्थ्यास जास्तच जोर येतो. समुद्र आपली मर्यादा ओलांडित नाही. पण
यांच्या अहंकाराचा आणि बळाचा मिलाफ झाल्यावर त्यांच्या उन्मत्तपणाचा समुद्र आपला
किनारा फोडून बाहेर येतो.
व्यक्तीचा
उन्मत्तपणा अमर्याद वाढल्यावर कामनाही वाढतात. कामाच्या ठिणगीने क्रोधाग्नि एकदम
पेटतो. रखरखीत उन्हाळ्यात तेला-तुपाच्या कोठाराला अग्नि लागावा आणि
त्यात वारा सुटावा, मग कशी परिस्थिता होईल? तशी अवस्था यांच्या शक्तीला अहंकाराची जोड मिळाल्यावर होते. कामक्रोधांना उन्मत्तपणाची जोड मिळाली की, त्यांना
कोणताही धरबंध उरत नाही. मग मिळेल त्या मार्गांनी समाजातील चांगल्या गोष्टींचा नाश
करत सुटतात.
सद्विचारांची
माणसे इतकी कट्टर नसतात. झालं तर पाहू वगैरे, अशी सज्जनांची भाषा असते. किंबहुना कृतिशून्यता
हे सज्जनांचं प्रथम लक्षण असावं, अशीच परिस्थिती आहे. दुर्जन मात्र अत्यंत कर्मठ
आणि कट्टर असतात. ज्या जहाजात बसलात, त्यालाच जर छिद्र पाडत असाल, तर जहाज बुडणार,
हे नक्कीच पण मग तुम्हीही वाचणार नाही. हे माहित असूनही ते त्यासाठी स्वत:चे सामर्थ्य पणाला लावतील. स्वत:च्या नाशाच्या दु:खापेक्षा दुसर्याच्या विनाशाचा आनंद
यांना अधिक होत असतो. सर्व प्रभूची
लेकरे आहेत. सर्वांवर प्रेम करावे. या गोष्टी त्यांच्या संस्कारात नसतातच. प्रत्येकाच्या अंतरात भगवंत
बसलेला आहे. आपण एखाद्याला त्रास देतो, याचा अर्थ त्याच्यातल्या ईश्वराला त्रास
देत असतो, याचा विचारही करीत नाहीत.
यांच्या विनाशकारी कृत्यांच्या तडाख्यातून चुकून कोणी वाचलं
असेलच, तर त्यांनाही सोडीत नाहीत. त्यांच्यावरही खोटी-नाटी
टिका करतीलच. एखाद्याने राष्ट्रसेवेसाठी जर आपल्या संसारिक सुखाचा त्याग केला असेल,
तर ते यांना पाहावणार नाही. स्वत: समाजाला काही देवू शकत
नाहीत. जो देतो त्याने कशी बायका-पोरे वार्यावर सोडली, अशी बोंब ठोकतील. लोकोत्तर पतिव्रता,
सत्पुरुष, दानशील, याज्ञिक,
तपस्वी वा संन्यासी सगळेच यांच्या टिकेच्या रडारवर असतात.
खरंतर असे भक्त आणि महात्मे ही ईश्वरस्वरूप
मानून त्यांना वंदनच करायला हवं. दिव्यत्वाची जिथे प्रचिती येते, तिथे हात जोडले जावेत. पण त्यासाठी मनावर
नम्रतेचे संस्कार हवेत. ते नसतील, तर या समाजद्रोह्यांना सज्जनांची किंमत कधीच
कळणार नाही. उलट द्वेषाचं विष शब्दरूपी बाणांना लावून विखारी टीकेचे जीवघेणे
प्रहार करतील. माऊली म्हणतात, तयां द्वेषाचेनि काळकूटें । बासटोनि तिखटें । कुबोलांचीं
सदटें । सूति कांडें ॥ ज्ञा. १६-४०४ ॥
0 टिप्पण्या