पाठबळ
भक्कम असेल, तर वाटचाल सुकर होते. पिछाडी संभाळणारा कोणी नसेल, तर आघाडी घेऊनही
फायदा नसतो. तुमच्या आयुष्याची पिछाडी मजबूत करण्याचं कार्य गुरू करतो. उंच गेलेला
पतंगच तेवढा पाहणार्याला दिसतो. त्याला उंची प्रदान करून त्याचं नियमन करणारा दोरा
कोणाच्याही सहसा लक्षात येत नाही. वास्तविक दोर्याशिवाय पतंगाला आस्तित्वच नाही.
मानवी जीवनातला असा दोरा म्हणजे गुरू. त्याच्याशिवाय तुमचं आस्तित्वच नाही. ज्या
झाडाची मुळं मजबुत आणि खोलवर रूजलेली असतात, त्याचीच पाने हिरवीगार दिसतात. मुळांप्रमाणे
जीवनात हिरवाई आणण्याचं काम गुरू गुप्तरूपाने करीत असतो.
मला कोणीही गुरू नाही. मी कसा
स्वयंभू वगैरे आहे, असं सांगण्याची सध्या
फॅशन आलेली आहे. वास्तवात हा कृतघ्नपणा आहे. जगातल्या सगळ्या जीवांच्या पिलांचा
विचार करता मानवाचं पिल्लू सर्वात दुर्बल असतं. गाईचं वासरू जन्मानंतर लगेच आपल्या
पायावर उभं राहतं. आपले आईबाप गळून जातात, पण माणसाची पिल्लं स्वत:च्या पायावर उभी राहत नाहीत.
कोणतंही पिल्लू जन्मानंतर बरोबरं आईची कास शोधतं. माणासाच्या लेकराला आईचीच मदत
लागते. तोच माणूस पुढे मोठा झाला की, आपल्या मोठेपणात जगाचं योगदान नाकारतो. यालाच
भस्मासुराचा वंशज म्हणतात.
जीवनात ज्याच्या-ज्याच्याकडून
तुम्ही जे जे काही शिकता, तो तुमचा गुरू असतो. अवधूताने भागवतात चोवीस गुरू
सांगितलेले आहेत. पुर्वी आपल्या गुरूचं नावं सांगणं हा गौरव मानला जाई. आजही गायक
त्यांच्या पैतृक नव्हे, तर गुरूंच्या घराण्यावरून ओळखले जातात. अर्जुनासोबत द्रोणाचार्य
आठवतात. सचिनचं नाव घेतलं की आचरेकर सरांचं स्मरण होणारच. सम्राट चंद्रगुप्त,
हर्षवर्धन, पृथ्वीराज, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, माऊली ज्ञानेश्वर,
संत तुकाराम, राम, कृष्ण या प्रत्येकाने आपल्या गुरूचं नाव गौरवाने मिरवलेलं आहे.
माऊलींनी तर भावार्थदीपिकेत इतक्या जागी गुरूमहिमा गायिलेला आहे, की त्याचाच एखादा
महाग्रंथ तयार व्हावा.
तुम्ही जीवनात एखाद्या मोठ्या माणसाला गुरूपद बहाल करता,
म्हणजे तुम्ही लहान होत नसता. तुमची उंची आहे त्यापेक्षा वाढत असते. जो गरूचं
योगदान मानत नाही, तो आपोआपच बुटका ठरत असतो. तुमच्या विकासाची चिंता वाहणारा
मातापित्यानंतर गुरूच असतो. आपल्याकडे ग्रंथ हेच गुरू असं म्हणतात. पण नेमकं
कोणत्या ग्रंथाला गुरू मानायचं, हे सांगणारा कोणीतरी गुरू हवाच असतो. नाहीतर चुकीच्या
ग्रंथांना गुरू मानल्याने जगात कसे उत्पात घडताहेत, ते आपण पाहतोच आहोत. बुध्दीवंताने गुरूला शरण जायला हवं. जीवनात सदैव यश देणारा
चिंतामणी म्हणजे गुरू. समुद्रस्नानाने सगळ्या तीर्थांच्या स्नानाचं पुण्य पदरात
पडतं. गुरू हे असं जंगम तीर्थ आहे. माऊली म्हणतात, म्हणोनि जाणतेनें गुरु भजिजे
। तेणें कृतकार्य होईजे ।जैसें मुळसिंचनें सहजें । शाखापल्लव संतोषती ॥ ज्ञा.१.२५ ।।
worship-your-guru
0 टिप्पण्या