दंभ, दर्प, अभिमान, क्रोध,
कठोर वर्तन आणि अज्ञान हे असूरी वृत्तीच्या लोकांचे जन्मजात गुण असतात. हे गुण असणारे
असूर कसे वागतात? या विषयी आपण चिंतन करीत आहोत. या
लोकांच्या अशा वागण्याचे काय परिणाम होतात? नियती त्यांना
काय शिक्षा देते? याविषयी माऊलींची नेमकी भूमिका काय? याचा मागोवा प्रस्तुत लेखात घेऊयात.
मनुष्यदेहाचा आश्रय घेऊन जे
जगाचा नाश करतात, ईश्वर त्यांचं माणूसपण हिरावून घेतो.
त्यांच जीवन क्लेशाचा उकीरडा बनतं. लोकांना वाटतं ते खूश असतील, कारण त्यांच्याकडे
प्रॉपर्टी आहे; पण तो भ्रम आहे. त्यांच आयुष्य विंचवासारखं
बनतं. भूक लागली की, विंचू आपणच आपल्याला तोडून खातो. साप आपल्याच विषाने आपली
त्वाचा जाळून घेतो. श्वास बाहेर सोडायला जितका वेळ लागतो, तितकाही
विसावा मिळत नाही. असं दु:ख पदरात पडतं, जे कल्पांतीही सरत
नाही.
आयुष्याची दुपार वाईट
मार्गाने जगणार्यांना आयुष्याच्या संध्याकाळी वाईटच फळ मिळतं. पाप हे पाप आहे, हे
कळूनही त्यापासून परावृत्त होत नाहीत. दुर्योधन म्हणायचा, जानामि धर्मं न च
मे प्रवृत्ति। जानामि अधर्मं न च मे
निवृत्ति।। अधर्म कळतोय पण, सुटत नाही. हातावर पोट असणार्या गरीबाकडून लाच
खाणार्याला आपण करतोय ते पाप आहे, हे कळत असतं. तरीही रिटायर होईपर्यंत तो
हरामखोरी करीतच असतो. समाजातही त्यालाच मान मिळतो. इमानदारीने नोकरी करणारा फक्त
घर सांभाळू शकतो. बेईमानाचे इमले होतात. लोकही त्याच्याच बंगल्यांच कौतुक करतात.
यांचा बाह्य देखावा छान
दिसतो, पण सुख मिळत नाही. यांच्या जीवनात दु:खाचा काळोख इतका असतो की, अंधारही
त्यांच्या जवळ गेल्यावर काळा पडावा. पाप इतकं करतात की,
पापालाही त्यांची किळस यावी. लोकांना नरकाची भीती असते. नरक यांना भीतो. लोक मळाने
मळतात. पण यांच्यामुळे मळच मलीन होतो. यांना पाहिलं की, तापालाही ताप येतो. भयाला
भीती वाटते.
अमंगळापासून विटाळ निर्माण होतो. तो विटाळ
सुद्धा असल्या असूरांना भितो. किती वाईट अवस्था आहे? यांचे शेवटचे हाल सांगताना
वाचा रडते. विचारानेच मन पांगळं होतं. इतकी भयंकर अधोगती ज्यामुळे होते, ती वाईट आसुरी गुणसंपत्ती ते कशाकरता वाढवतात ? आत्मनाश.
दुसरं काय? ज्या सहा दोषांनी हे सगळं किडाळ जीवनात निर्माण
होतं, ते दोष टाळावेत. जे लोक अशा प्रकारचं असूरी जीवन जगतात, त्यांच्या सावलीलाही
थांबू नये. असले लोक दिसले की, आपण मार्ग बदलावा. माऊली म्हणतात, म्हणौनि तुवां
धनुर्धरा । नोहावें गा तिया मोहरा । जेउता वासु आसुरा । संपत्तिवंता ॥ ज्ञा.१६.
४२३ ॥
संपर्क - ९९२१८१६१८३
आमच्या व्हाट्सअप समूहात सामील होण्यासाठी येथेक्लिक करा.
आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा.
महाराष्ट्राचे विचारदुर्ग |
आमचा हा ग्रंथ घरपोच मागविण्यासाठी लगेच कॉल करा
0 टिप्पण्या