सिकंदर जग जिंकायला निघाला होता.
तो जिंकला की, हारला हा वादाचा विषय आहे. पण सगळ्या जगावर राज्य करण्याची त्याला
हाव होती. त्या होवेपोटी धाव-धाव धावला. शेवटी त्याची आणि त्याच्या रथाच्या
चालकाची गती सारखीच झाली. मग कशाचा इतका तोरा मिरवला आयुष्यभर? एकाच वर्गात शिकणारे दोघे मित्र. एक अधिकारी होतो. दुसरा वडलोपार्जित शेती
करतो. गावात अधिकार्याचा सन्मान होतो. शेतकरी कोपर्यात उभा राहून टाळ्या वाजवतो.
त्याला कोणी विचारत नाही. रिटायरमेंटनंतर दोघांची अवस्था एकच होते. त्याला अन् यालाही
लेकसूना विचारत नाहीत. एकवेळ शेतकर्याची पोरं सांभाळतात तरी, अधिकार्याची वाट बर्याचदा
वृध्दाश्रमाच्या दिशेने जाते. पद, पैसा, प्रतिष्ठा सारे एक दिवस निरूपयोगी ठरते.
पैशाला चलन म्हणतात. च..ल..न.. जे एका जागेवर थांबत नाही.
चालत राहते. ते चलन. भिकारी करोडपती होतात. करोडपती रोडपती होतात. कोणीही कायम
विजेता होऊ शकत नाही. सलग तीनदा महाराष्ट्र केसरी झालेला चौथ्यांदा चितपट होतो.
त्यामुळे विजयाचा गर्व करू नये. पराभवाचं दु:ख असू नये. कॉलेज जीवनात
जिच्याकडे मान मोडेपर्यंत वळून-वळून लोक पाहत असतात, तीच तीस
वर्षांनतर समोर आली तर ओळखायलाही येत नाही. सौंदर्य, सामर्थ्य, पद, पैसा सगळं चल
आहे. ती साधनं आहेत. त्यांचा वापर करावा. साध्य मानू नये. त्यामुळं जगणं हातातून
निसटून जातं. पश्चाताप करावा लागतो. सिकंदर मरताना म्हणाला, "मला तिरडीवरून
नेताना माझे दोन्ही हात लोंबकळते ठेवा. जगाला कळूद्या, जगज्जेता रिकाम्या हाताने
गेला!" |
क्षणिकाचा गर्व कशाला |
भारतीय विचारपरंपरा जगावं कसं, याचं अचूक मार्गदर्शन करते. त्यागाय सम्भृतार्थानां सत्याय
मितभाषिणाम् । यशसे विजिगीषूणां प्रजायै गृहमेधिनाम् ॥रघुवंशम् 1.7॥ योग्यरित्या
खर्च करण्यासाठी पैसा कमवावा. साठविण्यासाठी नव्हे. थोडं, पण सत्य बोलावं. किर्ती
मिळवण्यासाठी जिंकावं. पितृऋणातून उतराई होण्यासाठी गृहस्थाश्रम स्वीकारावा. विद्यार्थी
जीवनात विद्याभ्यास करावा. तारूण्यात विषय भोगावेत. म्हातारपणात चिंतन-मननात वेळ
घालवावा. देह सोडताना योगाचा आश्रय करावा म्हणजे शेवटचा दिस गोड होतो. ज्याच्यासाठी
आटापिटा करतोय, ते नाशवान आहे, ही समज आली
की, आयुष्याचा नाश होत नाही. कापराचा ढीग
रचून पेटवून द्यावा किंवा पक्वान्नाच्या ताटात विष कालवावं, तसं आम्ही जगतो. माऊली
म्हणतात, जैसा कर्पूराचा रासी कीजे । मग अग्नि लाऊन दीजे। कां मिष्टान्नीं
संचरविजे । कालकूट।। ज्ञा.२.२५१।।
रमेश वाघ, नाशिक
संपर्क -९९२१८१६१८३ |
क्षणिकाचा गर्व कशाला |
आमच्या व्हाट्सअप समूहात सामील होण्यासाठी येथेक्लिक करा.
आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी
येथे क्लिक करा. |
क्षणिकाचा गर्व कशाला? |
आमचा हा ग्रंथ घरपोच मागविण्यासाठी लगेच कॉल करा
0 टिप्पण्या