कल किसने देखा है?

         जसं वाटतं, तसं जगता येत नाही. जसं नको, तसं मात्र जगावं लागतं. आपण असं केलं, तर  ते बरं दिसेल का? असा विचार करून करून आपण रोजचंच रहाटगाडगं हाकत बसतो. जे करतोय ते रटाळवाणं आहे, आवडत नाही, तरी गाडी रेटतच असतो. आज नाही उद्या करू, म्हणून जीवनगाडा चालूच राहतो. आयुष्य संपतं, पण उद्या काही उजाडत नाही. मनमोकळं हसायला पाहिजे. पण हसलो तर बाजूच्याला काय वाटेल, म्हणून हसत सुध्दा नाहीत लोक. काहींचा चेहरा तर इस्त्री केल्यासारखा एकदम कडक असतो. चेहर्यावरची एकही रेषा कधी हलत नाही

kal-kisane-dekha-hai

            आपण संसार वृक्षावर बसलेली पाखरं आहोत. सगळ्यात वरच्या फांदीवर बसलेल्या कावळ्याला वाटतं मी अधिकारी आहे. चारचौघांपेक्षा वेगळं वागलं पाहिजे. तो स्वत:ला पद, प्रतिष्ठेच्या पिंजर्यात बंद करून घेतो. शिपाई मस्त गप्पा मारत टपरीवर चहा पिऊ शकतो. जजला नाही पिता येत. त्याची खुर्ची आड  येते. तो मनातल्या मनात म्हणत असतो, मी रिटायर झाल्यावर अशी मजा करीन. शेतकर्याचीही तीच गत. अमूक गोष्ट करायचीय, पण आता वेळ नाही. जरा निवांत झाल्यावर करू. मुलं,  त्यांची शिक्षणं, लग्नं सगळं करता करता आयुष्य संपून जातं.

            तुम्हाला मनासारखं जगण्यासाठी मुळातच उशीर झालेला असतो. एखाद्याला एखादं गाणं गुणगुणावंस वाटतं. पण आजूबाजूला लोक आहेत. कसं म्हणायचं?  राहूनच जातं. असू द्या ना. तुम्ही जा मोकळ्या आभाळाखाली. गा मोकळ्या गळ्याने! मला खूपजण असे भेटतात.  तुम्ही लेखाच्या शेवटी  जी माऊलींची ओवी देता, ती अगदी समर्पक असते. मला पण ज्ञानेश्वरी वाचायचीय. पाहू पुढच्या वर्षी. पुढच्या वर्षी तुम्ही राहालच याची काय खातरी? त्यामुळे शुभस्य शीघ्रम्। ज्या गोष्टी आवडतात. कराव्याशा वाटतात, त्या आत्ताच करा. अंगात रग आहे तोपर्यंत फिरून घ्या. वय झाल्यावर मनाला काहीही वाटलं, तरी शरीराला मर्यादा येत असतात. आपल्यावाचून कसं होईल, म्हणून आपण गुंतून पडतो. जगणं टाळतो. पण वास्तवात तसं काही नसतं. जगाचं आपल्यावाचून काही बिघडत नसतं. राजा सुखाने झोपला, तरी देश चालत असतो. लोक आपापल्या इच्छेप्रमाणे वागतच असतात. माऊली म्हणतात, परि रावो पहुडलिया सुखें । जैसा देशींचा व्यापारू न ठके । प्रजा आपुलालेनि अभिलाखें । करितचि असती ॥ज्ञा.८. १८५॥

रमेश वाघ, नाशिक

संपर्क - ९९२१८१६१८३

kal-kisane-dekha-hai
kal-kisane-dekha-hai

आमच्या व्हाट्सअप समूहात सामील होण्यासाठी येथे क्लिक करा. 

आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा.

maharashtrache vichardurg
maharashtrache vichardurg

आमचा हा ग्रंथ घरपोच मागविण्यासाठी लगेच कॉल करा 9921816183


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या