सगळं पैशात मोजू नका

        माणूस जसजसा श्रीमंत होत गेला, तसा त्याच्यासाठी पैसा महत्वाचा बनत गेला. पैसा मिळत नसेल,  तर तो जागचा हलत नाही. रस्त्यावर काहीतरी चमकताना दिसलं, तर सावलीत बसलेला मनुष्य ती चमकणारी वस्तू उचलायला जातो. जवळ गेल्यावर कळतं, तो पैसा नाही, चॉकलेटचं रॅपर आहे. मग तो पुन्हा सावलीत येऊन बसतो. पुन्हा दिवसभर जरी ते चमकलं, तरी तो जागचा हलत नाही. कारण ते उपयोगाचं नाही,  याचं भान तेव्हा त्याला अनुभवाने आलेलं असतं. माणसाचं सगळं जीवनही याच रूपककथेप्रमाणे आहे. पैशासाठी म्हणून सुखाचा विसावा सोडून त्यामागे धावतो. खूप पैसा कमावला की कळतं, सुख यात नाहीच. मग तो सावली शोधतो. पण तोपर्यंत वेळ निघून जातो.
don't-run-behind-the-money
don't-run-behind-the-money

            जीवनात सगळ्या गोष्टी पैशाच्या मापाने नाही तोलता येत. एकाने मला व्याख्यानाचे मानधन  विचारले. कोणाकडून आणि  किती घ्यायचे, याचेही काही आडाखे असावेत. तो काही  बिस्किट पुडा नाही, उपाशी माणसाला आणि गर्भश्रीमंतालाही एकाच किमतीला मिळेल. हा लेख या रूपात येणासाठी किमान आठ दिवसांची तयारी करावी लागते. तेव्हा त्याला असं  रूपडं प्राप्त होतं. जर तुम्ही म्हणाल, इतकी मेहनत करता, त्याचे किती पैसे मिळतात? असं विचारणं म्हणजे आईने मुलाला घास भरविल्याबद्दल तिला किती पैसे मिळतात, असं विचारण्यासारखं आहे.

            शेठजी कारखाना उघडून बसले, तर लाखोंचा नफा होतो. तेच शेठ ज्ञानेश्वरी पारायणाला बसले, तर त्यांची बीपी, शुगर नॉर्मल होते. घरी बायकोच्या हातचा स्वयंपाक आणि तिच्या तोंडचे शब्द दोन्हीही गोड लागतात. मग दुकान महत्वाचे की ज्ञानेश्वरी? शेवटी धंदा तरी कशासाठी करता तुम्ही? ज्यासाठी करता, ते मिळतं का? जे पैशाशिवाय मिळतं त्याची पैशात किंमत करता येत नाही. जे पैशाने मिळतं ते किंमत करायच्या लायकीचं असतंच असंही नाही. गाथा आणि गीता वाचून एकवेळ नोकरी मिळणार नाही, पण माथा नीट होईल. जीवनाचा चोथा होणार नाही. ज्याच्यातून मला एकही रूपया मिळत नाही, असं एकतरी काम जीवनात करावं माणसानं. बस्स ही समज ली की नैराश्य आणि व्यथा संपते. समाधान मिळतं. पारध्याच्या हातून सुटलेल्या पक्ष्याप्रमाणे स्वातंत्र्य अनुभवता येतं. माऊली म्हणतात, संसारव्यथे फिटला । जो नैराश्यें विनटला ।व्याधाहातोनि सुटला । विहंगु जैसा ॥ ज्ञा.१२. १८१ ॥

रमेश वाघ, नाशिक

संपर्क - ९९२१८१६१८३

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या