तामस आहार

             आपण म्हणतो पोटासाठी सर्वकाही. काहींचं खाणं एकदम म्हशीसारखं असतं. म्हैस कुजलेले उष्टे न म्हणता आंबोण खाते. गीता सांगते, यातयामं गतरसं पूति पर्युषितं च यत् । उच्छिष्टमपि चामेध्यम् भोजनं तामसप्रियम् ॥१७.१०॥ शिळे, अर्धवट शिजवलेले, ज्यामधील रस गेला आहे, दुर्गंधयुक्त, आदल्या दिवसाचे, उष्टे आणि सदोष, असे भोजन तमोवृत्तीच्या लोकांना प्रिय असते. सकाळी शिजवलेले अन्न दोन प्रहरी अथवा तो दिवस गेल्यावर दुसर्या दिवशी तमोगुणी खातो. अर्धवट शिजलेले, करपून गेलेले, ज्यात गोडी आलेली नाही, असे पदार्थ तमोगुणी खातो. वास्तविक चांगल्या सात्विक अन्नाला, तो अन्नच समजत नाही.

तामस-आहार
तामस-आहार

तामस आहाराचं वाचवत नाही, असं वर्णन ज्ञानेश्वरी करते. पक्वान्न खाण्याचा योग आला, तरी घाण सुटेपर्यंत ते खात नाही. जे अन्न तयार होऊन पुष्कळ दिवस झाले आहेत, ज्याचा रुचकरपणा निघून गेला आहे, जे वाळलेले अथवा, सडलेले आहे अथवा जे अन्न फदफदले असून त्यात किडेही पडलेले, घाण सुटलेले अन्न चिवडून राड करतो, बायकोबरोबर परिवारासह एका ताटात जेवतो. अशा घाणेरडेपणाने तामसी खातो.

 पिण्यास, खाण्यास योग्य नाहीत अशा पदार्थांच्या बाबतीत, तर त्याला विशेष रूची असते. या आहाराचे फल ताबडतोब मिळते. तोंड जेव्हा या अपवित्र अन्नाला शिवते, तेव्हाच तो पापाला पात्र होतो. तुम्ही आम्ही ह्याला जेवण्याची रीत म्हणू नये. हे जेवण नव्हे, तर ही पोटात भरविली जाणारी यातना समजावी. शिरच्छेदाने काय होते? अग्नीत प्रवेश केल्यावर काय होते? मृत्यूच! या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो का ? परंतु अशा प्रकारचा आहार घेणारे लोक मात्र असेच करतात, असे म्हणावे लागेल.

खाण्यासाठी जगायचं की जगण्यासाठी खायचं?  ज्याचं तोंड हातात आहे, त्याच्या मुठीत जग येतं. सैन्य पोटावर चालतं, असं नेपोलियन म्हणायचा. त्यापेक्षा मानवी जीवनव्यवहार हा सर्वस्वी पोटावरच चालतो. आज जो तो धावताना दिसतो. त्याला तुम्ही त्याच्या धावण्याचं कारण विचारा, तो सांगेल, पोटासाठी करावे लागते. असे माणसाचे पोट कधी भरतच नाही. ते भरण्यासाठीच प्रत्येकाची धडपड असते. पण ते योग्य पध्दतीने भरले जाणे गरजेचे आहे. विनाकारण चोचले म्हणून विकतच्या यातना पोटात ढकलू नका. माऊली म्हणतात, यावरतें जें जेवीं । ते जेविती वोज न म्हणावी । पोटभरती जाणावी । यातना ते ॥ १६६ ॥

रमेश वाघ

संपर्क ९९२१८१६१८३

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या