श्रध्दा
असावी, पण अंधश्रध्दा नसावी, असे म्हणतात. पण श्रध्दा कशी असावी?
यावर मात्र कोणीच बोलत नाही. ज्ञानेश्वरी याबाबात नेमकं मार्गदर्शन करते. सात्विक लोक
देवांची उपासना करतात. ज्यांची श्रध्दा सात्विक असते, ते सर्व विद्यांचे अध्ययन करतात, परिणामी
देवलोकात जातात. ज्यांची श्रद्धा राजसी असते, ते राक्षस व यक्ष
यांचे भजन करतात. तामसी प्रेते, भूते यांची उपासना करतात.
जीवांचा बळी देऊन स्मशानामध्ये संध्याकाळी भुते व प्रेतांच्या अमंगल समुदायांचे
पूजन करतात. हे लोक म्हणजे तमोगुणाचा अर्क. तामसी श्रद्धेचे माहेरघर. जगामधे या तीन
प्रकारची श्रद्धा असणारे लोक असतात.
![]() |
श्रद्धा कशी असावी |
शहाण्याने
सात्विक श्रद्धा जतन करावी. सात्विक श्रद्धा धारण करणार्यांना मोक्ष साधतो. मग भले
त्याला ब्रह्मसूत्रे, शास्त्र, सिद्धांत न का कळेनात. त्याच्या आचरणातूनच श्रुतिस्मृतीचे
अर्थ जगासमोर येतात. फक्त त्यांचं अनुकरण करा. एका दिव्याने पेटवलेला दुसरा दिवाही
तितकाच उजेड देतो. दुसर्याच्या घरात क्षणभर रहाणारा वाटसरू देखील त्या घराचे सुख भोगतोच.
जो तळे बांधतो, त्याचीच तहान भागते आणि इतरांना पाणी मिळत नाही असे होते काय? घरात
स्वयंपाक करणार्यासोबत इतरांनाही जेवायला मिळतेच ना ? गौतमाने
आणलेली गोदावरी ही फक्त गौतमासाठीच गंगा नसते. इतर सर्व जगासाठीही ती गंगाच.
आगोदरच कोणीतरी निर्माण
केलेल्या वाटेने चालले, तर यात्रा सुखद होते. चालण्याचे श्रमही कमी होतात. सज्जनांचंच
अनुगमन करावं. तुकोबाराय म्हणतात, सांडू संतांचे मारग । आडराने भरले जग।।
संतांनी निर्माण केलेल्या मार्गांचा त्याग केला, म्हणून अपसमजांचे आडरान माजले
आहे. आपल्याला एखादी गोष्ट कळत नसेल, तर
ज्याला ते चांगलं कळतं, त्याचं अनुकरण करणं कधीही फायद्याचं. जो शास्त्रानुकुल
वागतो, त्याच्या आचरणाचा कित्ता जो गिरवतो, तो मूर्ख असला तरी उद्धरून
जातो. माऊली म्हणतात, म्हणौनि आपुलियापरी । शास्त्र अनुष्ठीती कुसरी
। जाणे तयांते श्रद्धाळु जो वरी । तो मूर्खुही तरे॥ज्ञा.१७.९२॥
रमेश वाघ,नाशिक
संपर्क ९९२१८१६१८३
0 टिप्पण्या