सात्विक यज्ञ कसा ओळखावा?

     सुखी समाधानी जीवनसूत्रे मानवी जीवनात पेरणारी श्रीमदभगवदगीता आहे. गेल्या तीन लेखांमधून आहाराच्या तीन प्रकारांवर चिंतन केले. पुढे यज्ञाच्या तीन प्रकारांविषयी मार्गदर्शन आहे. अफलाकांक्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य इज्यते ॥ यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्त्विकः ॥ १७.११ ॥ फळाची अपेक्षा न करता समाधानी मनाने आणि विधीयुक्त केला जातो, त्याला सात्विक यज्ञ म्हणतात. पतिव्रतेच्या मनात फक्त पतीच असतो. समुद्राला मिळाल्यावर गंगेची धाव खुंटते. जे लोक कर्मफळाच्या अपेक्षेशिवाय यज्ञ करतात. कर्तेपणाचा अहंकार काढून टाकतात. जसं झाडाच्या मुळाशी पोहोचल्यावर पाणी मागे सरत नाही, त्याप्रमाणे देह आणि मनाने सत्कार्यात गढून जातात. बदल्यात काहीही मागत नाहीत. फळाची अभिलाषा टाकून, आसक्ती सोडून सर्व अंगांनी परिपूर्ण अशा पध्दतीने केला जातो तोच सात्विक यज्ञ.

यज्ञ म्हणजे काय? संगतिकरण, दैवीकरण आणि मैत्रीकरण. या तीनही बाबी निस्वार्थ भावनेने केल्या जात असतील, तर तो सात्विक यज्ञ होत. तोच परमार्थ. स्वार्थापोटी मैत्री, स्वहितासाठी संगती, काहीतरी मागण्यासाठी देवदेव होत असेल, तर तो यज्ञ नव्हे. तळहातावरचं रत्न, आरशातलं प्रतिबिंब आणि उगवतं सूर्यबिंब जितक्या स्पष्टतेनं नजरेत भरतं, तितकी संकल्पाची स्पष्टता कार्याच्या पायात असावी. संतविचार आणि संतचरित्र हेच सज्जनांच्या कृतीमागचं शास्त्रविधान असलं पाहिजे. विधीविधान आणि संविधानाला विचारूनच कार्य करावे.

नाकातला दागिना कानात आणि कानातला गळ्यात घातला, तर ते शोभत नाही. धर्म, संस्कृती, सभ्यता, न्याय, नीति यांचा विचार  करून स्वार्थरहित मनाने कार्यप्रवृत्त व्हावं. अशा व्यक्तीची चालती पाऊले देखील यज्ञ मानावीत. कृती करताना फायदा आणि वायदा याचा विचार न करता संतविचारांचा कायदा लक्षात घ्यावा. जशी तुमची आमची माय अंगणातल्या तुळशीचं उत्तम लालन-पालन करते, परंतु त्या कृतीमागे फळ, फूल अथवा सावली मिळावी, असा हेतू नसतो. फळाशेशिवाय स्वार्थरहित बध्दीने केलेली प्रत्येक कृती म्हणजे सात्विक यज्ञ होय. देव, देश, धर्म आणि दीनदलितांच्या हितासाठी घराहबाहेर पडलेल्या प्रत्येक पावलागणिक यज्ञ घडेल. अन्यथा स्वार्थासाठी केलेला यज्ञदेखील व्यापार ठरेल. आमच्या संतांनी अवघं जीवन निस्वार्थ सेवेला वाहिलं. त्यांची जीवनसमिधा या संस्कृतीच्या यज्ञकुंडात पडली. तिच्या बळावर ही सनातन संस्कती फुलली, फळली, बहरली आणि टिकलीही. माऊली म्हणतात, किंबहुना फळाशेवीण । ऐसेया निगुती निर्माण । होय तो यागु जाण । सात्त्विकु गा ॥ ज्ञा.१७ १८४ ॥

रमेश वाघ, नाशिक

संपर्क - ९९२१८१६१८३







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या