रामाने सीतेचा त्याग का केला

        बिहारच्या सितामढीतील न्यायालयात सीतेचा त्याग केल्याप्रकरणी रामाविरोधात दाखल केलेल्या एका याचिकेवर सुनावणी झाली. प्राचीन काळात घडलेल्या या घटनेची साक्ष कोण देणार? रामाने सीतेचा त्याग केला असेल, तर त्याची शिक्षा कुणाला द्यायची, असा सवाल करत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.

why ram deserted sita, ramayan
why ram deserted sita

         काल एक मित्राचा फोन आला. म्हणाला,"एका व्यक्तीच्या आक्षेपावरून रामाने सीतेला गर्भवती असताना जंगलात सोडणे अन्याय आहे. रामापासूनच स्त्रीला दुय्यम वागणूक मिळायला सुरूवात झाली."
       त्याचा प्रश्न एकूण जरा वाईटही वाटले आणि आनंदही झाला. वाईट याचे की आपण सुशिक्षित म्हणवतो, पण डोकं मात्र चालवत नाही.  दुसऱ्याच्या तोंडून जे ऐकतो तेच खरे मानतो. आनंद याचा की आजच्या जगात कोणीही कोणाची खबर ठेवत नसताना आरोप करण्यापुरता तरी राम आणि रामायण शब्द लोकांच्या तोंडात तरी येतो.

       आता सरळ मुद्द्यावर येऊया. रामाने सीतेचा त्याग का केला? या प्रश्नाचा विचार करताना 2020 च्या चष्म्यातून एक लाख वर्षापूर्वीचे घटना प्रसंग पहावयाचे झाल्यास आपणास त्याचे व्यवस्थित आकलन होणार नाही.
      रामकालीन राज्यव्यवहाराचे सिद्धांत आणि आपले आजच्या काळातील सिद्धान्त यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. रामकालामध्ये विशुद्ध चारित्र्य अत्यंत महत्वाचे गणले जायचे. ज्याला राजा म्हणून राज्य चालवायचे याचे चरित्र अग्निप्रमाणे शुद्ध असावयास हवे. राजा हा प्रजेची संपत्ती मनाला जाई, त्यामुळे प्रजेचे मत सर्वोच्च महत्वाचे मानले जाई. तत्कालीन शासकाला अखंड प्रजेचा विचार करावा लागे. आजच्यासारखी पाच वर्षांतून एकदा लक्ष्मीदर्शन करवून प्रजा प्रसन्न करावयाचा रिवाज त्याकाळी नव्हता. आणि प्रजाही बावळी नव्हती.   

        एका व्यक्तीच्या आरोपावरून सीतेचा त्याग केला. या म्हणण्यातच मुळात तथ्य नाही. कारण एक परीट सीतेच्या चारित्र्यावर शंका घेतो, याचा अर्थ व्यक्तीशः तो धोबी नव्हे. तर याच लक्षार्थ लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. एक धोबी साम्राज्ञीच्या चारित्र्यावर शंका घेतो याचा अर्थ, सामान्य प्रजा राणीच्या चारित्र्यावर शंका घेते असा होतो.
         याचा लिखित पुरावाच पाहायचा झाला तर वाल्मिकी रामायणात राम ज्यावेळी गुप्तहेरांमार्फत आलेली माहिती लक्ष्मणाला विचारतो त्यावेळी लक्ष्मण सांगतो, "पौरा:चर्र्चनति" सीतेच्या चारित्र्यावर प्रजा खुलेपणाने चर्चा करीत होती.
      तत्कालीन राजकीय संकेतानुसार राजा हा सर्व प्रकारच्या लोकपवादापासून दूर असावा. हा राजधर्म होता. आता रामाचा व्यक्ती म्हणून सर्व प्रकारच्या संकटात सीतेला साथ करणे हा धर्म होता. आणि त्याग करणे हा राजा म्हणून धर्म होता. रामाने राजधर्माचे पालन केले.त्याकाळात "ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत।" हे तत्व होते. आजही आपण पाळतो. राष्ट्राच्या व्यापक हितासाठी व्यक्तीने स्वतःच्या स्वार्थाचे बलिदान दिले पाहिजे असे आपण आजही मानतो. त्यासाठी राजा रामाने राणी सीतेचा त्याग केला. व्यक्ती रामाने सीतेचा त्याग कधीही केलेला नाही.
आपण म्हणाल कशावरून. यालाही पुरावा वाल्मिकी रामायण देते. अश्वमेध यज्ञाच्या वेळी यज्ञातील कर्मकांड पूर्ण करण्यासाठी राजाने दुसरा विवाह करावा असा प्रस्ताव संपूर्ण मंत्रिमंडळ आणि ऋषींनी ठेवला. त्यावेळी राम सांगतोय, "रामाच्या हृदय सिंहासनावर सीतेशिवाय कोणालाही स्थान नाही."

      राम सीतेची सोन्याची मूर्ती बनवून स्वतःच्या शेजारी ठेवतो आणि अश्वमेध यज्ञ पूर्ण करतो. आजचा आपला समाज पत्नीच्या मृत्यूनंतर दहावा होण्याचा अवकाश की लगेच स्थळं बघायला सुरुवात करतो. चालता बोलता घटस्फोटाची चर्चा करणारांना रामाचे प्रेम दिसणारच नाही. राम अखंड भारताचा चक्रवर्ती सम्राट होता. त्याला काय विवाहासाठी राजकुमारी मिळाली नसती? तरीही राम शेवटपर्यंत सीतेशी एकनिष्ठ राहिला. यावरून हेच सिद्ध होते, की रामाने सीतेचा त्याग केला नव्हता तर राजधर्म स्वतःच्या प्राणापेक्षाही अधिक जपणाऱ्या राजाने राणीचा त्याग केला होता. आणि सर्वात महत्वाचा पुरावा म्हणजे, माझ्यावर अन्याय झाला आहे हे सीता म्हणत नाही. उलट ती म्हणते, "रामाने जे केलेले योग्यच केले".
आतातरी रामावर चिखल उडवणारे कावळे शांत बसतील ही अपेक्षा.
       मुळात ही बांडगुळ वृत्ती काही वाचत नाही आणि दिसेल त्या पवित्र मंगळाचे विकृतीकरण करायला पाहते. आज एखादा सैनिक आपल्या नविन नवरीला घरी सोडून सीमेवर लढायला जातो त्याला आपण बलिदान म्हणतो, आणि रामाचे कृत्य मात्र आपणाला अन्याय दिसते. यातच आपला दुतोंडीपणा उघड होतो.
      रामाचे सितेवर प्रेम नव्हते असा विचार करणार्यांनी देवाने आपल्याला मेंदू दिला आहे याचा विचार करून त्याचा जर वापर करावा. सीतेच्या अपहारणानंतर रामाने केलेला विलाप वाचावा. साधा विचार करावा रामाचे सितेवर प्रेम नसते तर हा माणूस 3000 किलोमीटर लंकेला पायी चालत गेला असता का? तेही सीता नेमकी कुठे आहे, कशी आहे, जिवंत आहे किंवा मृत हेही माहीत नसताना. तत्कालीन जगातील सर्वांत बलाढ्य, प्रगत, श्रीमंत आणि मायावी शत्रूशी लढायला तयार झाला. कशाच्या बळावर, फक्त सीतेवरच्या प्रेमाच्या बळावर. अर्थात हे कळण्यासाठी वाल्मिकी रामायण उघडावे लागेल एवढे मात्र नक्की.
      रामकाळात स्त्रीला दुय्यम स्थान होत्र असे म्हणणारांनी एकदा वाल्मिकी रामायण उघडून वाचावे. रामाला वनवासाला पाठवताना महर्षी वशिष्ठ म्हणतात,
"आत्मा हि दारा सर्वेषाम् दारसंग्रहवर्तिनाम्।
आत्मेयमिति रामस्य पालयिष्यिती मेदिनीम्।।"
 यावरुन काय दिसते. स्त्रीचे स्थान दुय्यम नसून पुरुषाच्या बरोबरीचे आहे, अन्यथा वशिष्ठ असे म्हणालेच नसते की सीता पृथ्वीचे राज्य करील.
       अरण्यकांडात राम आणि सीतेची शास्त्रचर्चा,  दशरथ आणि कौसल्या यांची चर्चा वाचणाऱ्याला कळेल की रामकाळात स्त्रीचा दर्जा हा पुरुषाच्या बरोबरीचा होता.
या रामनवमीच्या मुहूर्तावर सर्व खळांना वाल्मिकी रामायण वाचण्याची सद्बुद्धी होवो आणि त्यांची व्यंकटी सांडो या प्रार्थनेसह थांबतो. जय श्री राम.

टिप्पणी पोस्ट करा

5 टिप्पण्या

  1. अगदी बरोबर जे रामाचे व सीतेचे प्रेम होते ते आजन्म न मरणारे आहे। पण या कलयुगयात असे नितळ प्रेम कराणरे शोधूनही सापडणार नाही. ज्याला प्रेम , मन, विश्वास कळला तोच खरा पुरूष ज्याला स्त्री काय असते हे समजले तोच पुरूष ।
    पण स्त्री चा त्याग करताना तिला समजावून सांगणे हे त्याच्यातला मोठेपणा आहे। आज स्त्री ही खूप पुढे गेली पण तिचं मन मात्र तिच्या प्रेमाजवळ असते ती कितीही पुढे गेली तरी ती तिथेच असते पण या कलयुगातल्या पुरूषांना हजार जन्म घ्यावे लागतील तिला समजून घेण्यासाठी

    उत्तर द्याहटवा
  2. मार्मिक .....
    आपले संदर्भ आणि आशय ओघवता आहे.तुकाराम महाराज म्हणतात येथ पाहिजे जातीचे ....
    जनता काही विचार न करता आपले मत मांडत असते. आपण संदर्भासहित सांगितलंत.मनपूर्वक धन्यवाद....

    उत्तर द्याहटवा
  3. .

    एक लक्षात घेतलं पाहिजे की तो रामायणाचा काल होता, जेव्हा सामान्य जनता पण सत्वशील असायची. तेव्हा त्याकाळी उल्लेखलेल्या परीटासारख्या सामान्य जनाची तुलना आजच्या कलीयुगातील सर्वसामान्य व्यक्ती बरोबर करता येणार नाही.

    आता परीटाचेच उदाहरण कशाला ? लोहार, सुतार का नाहीत, तर साधारणपणे धोबीघाटावर गावगप्पा चालतात, तेव्हा जर धोबी असं म्हणतोय याचा अर्थ एकंदरीत समाजात अशी चर्चा होत असणार हे रामासारखा सुज्ञ राजा नक्कीच जाणत असणार. म्हणून परीटाच्या उद्गारला महत्त्व.

    हे जर लक्षात घेतले तर एखाद्या व्यक्तीच्या मतावर नव्हे तर एकंदरीत समाजात जर आपल्या एखाद्या निर्णयावर प्रवाद होत असतील तर ते जरूर विचारात घेतले पाहिजेत. निदान राजाने तरी....

    प्रदीप देशपांडे, कोथरूड, पुणे

    उत्तर द्याहटवा