गीता काय आहे?

 

जगामध्ये कोट्यवधी ग्रंथ आहेत. लक्षावधी दररोज निर्माण होतात. त्यामध्ये अत्यंत उत्तमोत्तम ग्रंथ आहेत. अभिजात ग्रंथ आहेत. ज्ञानाने परिपूर्ण ग्रंथ आहेत, परंतु या सर्वांमध्ये ज्याचा जन्मदिवस जगभरामध्ये मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जावा असा एकमेव ग्रंथ आहे भगवद्गीता. सहजच मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की गीतेमध्ये असं नेमकं काय आहे, की तिचा जन्मदिवस एवढ्या उत्साहाने जगभरामध्ये साजरा केला जावा?

what is geeta, what is bhagwadgeeta
what-is-geeta

ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये भगवान ज्ञानेश्वरांनी गीतेचे महात्म्य वर्णन केले आहे. वास्तविक सगळ्याच अध्यायांत गीतेविषयी ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात. पण पहिल्या अध्यायामध्ये एक विशेष गोष्ट अशी आहे की जिथे तिचे महात्म्य वर्णन करताना त्यांनी भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीचा संवाद  दाखवलेला आहे.

या गीतार्थाची थोरी । स्वयें शंभू विवरी ।
जेथ भवानी प्रश्नु करी । चमत्कारोनी ॥ ७०॥

तेथ हरू म्हणे नेणिजे । देवी जैसें का स्वरूप तुझें ।
तैसें नित्यनूतन देखिजे । गीतातत्व ॥ ७१॥ अ.१||

देवी तुझं असे स्वरूप आहे नित्यनवीन तशीच गीता आहे. ती कितीही वेळा वाचली तरी प्रत्येक वेळी तिच्यातून नवा अर्थ प्राप्त होतो. म्हणूनच आजपर्यंत हजारो-लाखो विद्वानांनी गीतेवर टीका लिहिल्या. गीतेचा अभ्यास केला. तरीही प्रत्येकाला त्यात प्रत्येक वेळी काही ना काही नवीन अर्थ प्राप्त झाला.

            धर्मप्रचारासाठी गीतेचे भाषांतर कधीही झालेलं नाही. ज्यांनी-ज्यांनी गीतेचे भाषांतर केलं त्यांनी ते गीते विषयीच्या प्रेमापोटी केलं. व्यासंगापोटी केलं. हजारो इंग्रजी विद्वानांनी गीतेचं भाषांतर केलं. तेव्हा आम्हाला गीतेचे महात्म्य कळायला लागलं. 'तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलाशी'. आम्हाला आमच्या श्रेष्ठ गोष्टी दुसऱ्या कोणीतरी दाखवून द्याव्या लागतात तेव्हा त्यांचं श्रेष्ठत्व आमच्या नजरेत येतं. गीतेच्या बाबतीतही तसंच झालेला आहे.

            गीता हा शब्द उच्चारला तरी गीता हा कुणीतरी साधू संन्यास्यांनी, म्हातार्यांनी, रिटायर लोकांनी वाचण्याचा ग्रंथ आहे. तो धार्मिक ग्रंथ आहे. एखादा रिटायर झाला म्हणजे त्याला गीता भेट द्यावी, अशा प्रकारचा आपला गीतेविषयीचा ग्रह आहे. वास्तविक गीता ही एखादी व्यक्ती रिटायर होताना तिला न देता एखाद्या व्यक्तीने जीवनाच्या संघर्षामध्ये प्रवेश करताना तिला ती भेट म्हणून दिली पाहिजे. संघर्षातून जो व्यक्ती रिटायर होतो त्यासाठी गीतेचा उपयोग नाही असे नाही परंतु गीतेचा खरा उपयोग हा संघर्षरत व्यक्तीसाठी आहे.

            गीता काय आहे? गीतेमध्ये काय आहे? गीता कोणासाठी आहे? गीता कोणी वाचावी? गीता कशी वाचावी? आणि गीता का वाचावी? या मुद्द्यांचा उहापोह आम्ही येथे करणार आहोत.

            गीता काय आहे?

            मानवी मनाचा विचार करून त्याला संघर्षांमध्ये दृध पाय रोवून लढायला शिकवणारं जगातलं आद्य तत्वज्ञान म्हणजे गीता. मानवी मानसशास्त्राचा विचार करून सूत्रबद्ध रूपाने मांडलेलं हे पहिलं तत्वज्ञान आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये छोटे-मोठे संघर्ष रोज येत असतात. त्या संघर्षात झगडताना आपली अवस्था डळमळीत होते. अशा डळमळीत व्यक्तीला रडू नकोस, पळू नकोस, तुझा जन्म रडण्यासाठी, वा पळण्यासाठी नाही तर तुझा जन्म हसण्यासाठी आहे, लढण्यासाठी आहे हा विश्वास त्याच्या अंतःकरणात निर्माण करणारे शास्त्र म्हणजे भगवद्गीता.

 गीता कोणासाठी आहे?

 सर्वसाधारणपणे भगवद्गीता हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे असं मानतात. वास्तविक आम्हाला जर विचाराल तर आम्ही असे म्हणू की गीता हा वैश्विक धर्मग्रंथ आहे. वैश्विक धर्मच ग्रंथ नव्हे तर वैश्विक जीवन ग्रंथ आहे. विश्व मानवाला आणि वैश्विक समाजाला एकसंघ करण्याचे सामर्थ्य फक्त भगवद्गीतेतच आहे. गीता फक्त हिंदूंसाठी नाही. ती समग्र मानवासाठी आहे. सर्व धर्मांसाठी आहे. कारण गीतेचा जन्म झाला त्या वेळेला जगातील कोणताही धर्म अस्तित्वातच नव्हता. किंबहुना हिंदू धर्माला हिंदू हे नाव सुद्धा गीतेच्या जन्मानंतर कितीतरी वर्षांनी प्राप्त झालेलं आहे. हिंदूनी तिला प्राणपणाने जपलेलं आहे त्यामुळे ती हिंदूंची आहे असे आपण फार तर म्हणू शकतो. परंतु जितका हिंदूंचा तिच्यावर अधिकार आहे तितका यच्चयावत भूतलावरील प्राणिमात्राचा गीतेवर अधिकार आहे.

गीता कोणी वाचावी?

            गीता ही तरुणांनी वाचली पाहिजे. किंबहुना गीता सांगणारा तरुण होता. गीता ऐकणारा तरुण होता. गीतेच्या तत्त्वज्ञानाच्या आधाराने आतापर्यंतच्या जगाच्या इतिहासामध्ये ज्यांनी आपला ठसा उमटवला ते सर्व महानायक तरूण होते. चंद्रगुप्त मौर्य, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, पृथ्वीराज चव्हाण, महान सम्राट कृष्णदेवराय, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, योगी अरविंद घोष, स्वामी रामानंद तीर्थ, रामकृष्ण परमहंस, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम किती नावे घ्यावीत? ह्या सर्वांनीच गीतेच्या तत्त्वज्ञानाच्या आधारावर आपलं जीवनच घडवलं नाही तर त्यांनी ज्या काळामध्ये जन्म घेतला त्या काळाला आकार दिलेला आहे. हे आकार देण्याचं सामर्थ्य ज्याच्या मनगटात आहे त्याच्यात मेंदूमध्ये गीतेचं तत्वज्ञान असणं हे जास्त महत्त्वाचं आहे. गीता सर्वांनीच वाचली पाहिजे परंतु तरुणांनी ही वाचलीच पाहिजे. तेच श्रेयस्कर आहे.

गीता कशी वाचावी?

गीता हे वेदांचं सार आहे. माऊली म्हणतात,

हा वेदार्थसागरू । जया निद्रिताचा घोरू ।
तो स्वयें सर्वेश्वरू । प्रत्यक्ष अनुवादला ॥ 

वेदांमध्ये संपूर्ण विश्वाला तारुण्याचं सामर्थ्य आहे. कालांतराने वेद हे त्रिवार्णिकांच्या  हातात गेल्याने त्या ज्ञानापासून समाजाचा फार मोठा घटक वंचित राहिला. त्या मध्ये स्त्रिया असतील शूद्र असतील. या सर्वांसाठी या वेदांचे सार, उपनिषदांचे सार, किंबहुना जगातील सगळ्यात ज्ञानाचं सार कुरूक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुनाच्या निमित्ताने उपलब्ध झालं. अंतःकरणामध्ये भाव असेल तर तुम्ही कुठेही, कधीही गीतेचं चिंतन करू शकता. गीता वाचू शकता. भावपूर्ण अंतकरणाने आई समजून जर गीतेला पण शरण गेलो तर त्यासाठी तुम्हाला कुठलेही बाह्य अवडंबर करण्याची आवश्यकता नाही. कारण आईसमोर लेकरू शेंबडं गेलं वा भोंगळ गेलं तरीही त्याला ती पटकन कडेवर घेते आणि त्याचे दोन पापे घेते. हा आईचा स्वभाव आहे. तसाच गीतेचा स्वभाव आहे. गीता ही माऊली आहे. अनन्य भावाने तिच्या कडे गेलेल्याला ती कधीही दूर लोटत नाही.

            गीता का वाचावी?

            ज्याला जीवनाच्या संग्रामामध्ये विजय प्राप्त करायचा आहे, ज्याला जीवनामध्ये काहीतरी मिळवायचं आहे, त्या व्यक्तीसाठी सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे त्याचं मन. कुठलंही काम प्रत्यक्षात होण्याच्या अगोदर ते मनात उभं राहतं. ते मन जर सामर्थ्यशाली नसेल तर त्याचं काम उभा राहणार नाही. या मनाला सामर्थ्यशाली बनवण्याचा उपाय महणजे भगवद्गीता आहे. मन एवं मनुष्याणां  कारणं बंधमोक्षयो असं सांगणारी भगवद्गीता मानवी मनाचं सामर्थ्य हजार पटीने वाढवते. निर्भय बनवते. किंबहुना निर्भयता हीच गीतेची खरी फलश्रुती आहे. गीता वाचूनही जर कोणी भेकड राहत असेल तर त्याच्या वाचनात नक्कीच काहीतरी गडबड आहे असे म्हणावे लागेल.

            उदाहरणादाखल फक्त दोनच उदाहरणे या ठिकाणी घेऊन या. युद्धाच्या सुरुवातीला सगळ्या महान लोकांना मी मारीन आणि त्यामुळे अनर्थ होईल अशा प्रकारची भीती बाळगणारा अर्जुन जेव्हा अठरावा अध्याय पूर्ण झाला त्यावेळेला भगवंताला म्हणतो नष्टो मोह:  स्मृर्तीलब्धा करिष्ये वचनं तव  माझा मोह नष्ट झालेला आहे. मला योग्य ते ज्ञान मिळालेले आहे. त्यामुळे आता तू सांगशील तसे मी करीन. तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा क्षणिक मोहन क्षणिक भीती दूर करून आम्हाला ध्येयाच्या मार्गावर प्रेरित करण्याचे सामर्थ्य फक्त गीतेतच आहे.

राजाच्या आश्रयाने आयुष्यभर नोकरी करणारा, राजाचा रथ चालवणारा संजय तोसुद्धा राजाच्या तोंडावर त्याच्या नाकावर टिच्चून गीतेचं तत्वज्ञान ऐकल्यानंतर सांगतो आहे की, 'हे राजा, जिथे अर्जुन आहे जिथे कृष्ण आहे तिथेच विजय आहे. असं माझं स्पष्ट मत आहे.'  अशा प्रकारची निर्भयता ही गीतेच्या श्रवणाने जर ड्रायव्हर मध्ये निर्माण होत असेल तर समाजातला कोणताही दुबळा माणूस निश्चितच स्वाभिमानाने उभा राहू शकतो.

            गीतेचा अभ्यास करणारा व्यक्ती कधीही ही दुराग्रही असू शकत नाही. किंबहुनां अनाग्रह हेच गीतेचं वैशिष्ट्य आहे. त्या त्यादृष्टीने पाहता धर्मनिरपेक्षतेचं प्रतिपादन करणारा आद्य ग्रंथ म्हणजे भगवद्गीता. गीतेमध्ये कोणत्याही धर्माचा आग्रह नाही. अशीच माळ घाला, असा टिळा लावा, असे कपडे घाला, या दिशेला तोंड करून प्रार्थना म्हणा किंवा अमुकच देवाला भजा अशा प्रकारचा आग्रह गीता धरत नाही. जगातले सर्व धर्मग्रंथ हे अमुकच देवाला भजा, अमुकच देवाची प्रार्थना करा, अशाच पद्धतीचे कपडे घाला अशा प्रकारचा आग्रह धरताना दिसतात. किंबहुना त्याच आग्रहामुळे जगामध्ये हिंसेचा तांडव मातलेला आपल्याला दिसतो आहे. गीता ही एकमेव अशी आहे की जी उच्चरवाने सांगते,  

यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा ।
  तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसंभवम् ॥ 

जिथे-जिथे उदात्तता आहे, निर्मळता आहे, भव्यता आहे, दिव्यता आहे तिथे तू माझा अंश आहे समज. एवढा उदार दृष्टिकोन ठेवणारं तत्वज्ञान जगात फक्त गीतेतच आहे. औदार्य हे सामर्थ्यातून येत असतं. गीता समर्थ आहेच परंतु असमर्थांना समर्थ बनवणारी आहे. गीतेच्या अध्ययनाने ते औदार्य सर्व विश्व मानवामध्ये यावे हीच गीता जयंतीच्या निमित्ताने प्रार्थना. संत नामदेव म्हणतात,
एक एक श्लोक ॥  कोटि अश्वमेध ॥

पुण्य हे अगाध ॥  मानिता गीता ॥

गीता  जयंतीचा उत्सव फक्त उत्सव म्हणून न मिरवता गीतेचा एक तरी श्लोक आमच्या जीवनात यावा हाच खरा गीता जयंतीचा उत्सव.  सर्वांना पुनश्च एकदा गीता जयंतीच्या खुप खुप शुभेच्छा.

    अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओला नक्की क्लिक करा.

प्रा.श्री. रमेश वाघ,

नाशिक. ९९२१८१६१८३



टिप्पणी पोस्ट करा

18 टिप्पण्या

  1. खूपच अभ्यासपूर्ण आणि चिंतनीय लेख!

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच छान विवेचन रमेशसर. गीता प्रत्येकाने वाचायलाच हवी.

    उत्तर द्याहटवा
  3. सुंदर विवेचन. सर, तुम्ही गीतारहस्य, गीता महात्म्य छान उलगडले . मला वाटते, हा फक्त एका लेखाचा विषय नाही, तर ग्रंथाचा विषय आहे.
    अशाप्रकारची ग्रंथनिर्मिती आपल्या हातून घडावी, अशी प्रार्थना.
    तसेच या सरस्वती पुजनाच्या कार्यास शुभेच्छा .

    उत्तर द्याहटवा
  4. गीता वाचणारा निर्भयपणे संकटांना सामोरं जाऊ शकतो... हे एकच उदाहरण पुरेसे आहे.

    उत्तर द्याहटवा