एका शेतकर्याच्या मुलाची गगनभरारी

         दहावी बारावी झाली की चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे. डॉक्टर किंवा इंजिनियर बनायचे. एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरी पटकवायची, आणि परदेशात जाऊन स्थायिक व्हायचं हा जणू भारतीय मध्यम वर्गात अलिखित नियमच बनला आहे. या नियमाला अपवाद शोधूनही सापडणार नाहीत. यालाच ब्रेन ड्रेन म्हणतात. ते आपल्याकडे चालूच आहे कधीपासून. किंबहूना तोच शिष्टाचार आहे. त्यामुळेच तर आपला देश मागास आहे. कारण जगाला बदलण्याचे सामर्थ्य असणारे मेंदू आकाराला आणतो आपण आणि हेच मेंदू सेवा मात्र करतात परदेशाची. याला अपवादही आहेत कुठेकुठे, पण ते उघड्या डोळ्याने शोधावे लागतात आणि जगासमोर आणावे लागतात.

Success story of farmers son, confio engineering solutions
success-story-of-farmer's-son


अक्षय राजोळे. मुक्काम पोस्ट करंजगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. असाच एक देदिप्यमान अपवाद. न्यायमुर्ती रानडे, गोपालकृष्ण गोखले, तात्या टोपे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याच भूमीत जन्मलेला. आभाळ कवेत घेण्याची जिद्द बाळगणारा. तितकंच अफाट सामर्थ्य असणारा डोळस ध्येयवेडा. उंची सहाफुट. धिप्पाड देह. चेहर्यावर मात्र निरागस हास्य. सकाळच्या कोवळ्या उन्हाप्रमाणे प्रसन्न. विलोभनीय. गोदावरीच्या तीरावर रानमातीमध्ये बालपण गेलेलं. लहानपणापासून हातांना शेतात राबण्याची सवय. मातीशी नाळ घट्ट, यामुळे अहंकाराचा लवलेशही नाही.

प्राथमिक शिक्षण गावातच. मराठी शाळेत. त्या शाळेविषयीचा प्रचंड आदर बोलण्यातूनही डोकावत राहतो. दहावीनंतर नाशिकच्याच के.के. वाघ कॉलेजला अभियांत्रिकी डिप्लोमा केला. डिग्रीसाठी पुणं गाठलं. पुण्याने डिग्री तर दिलीच पण त्यासोबतच खूप काही शिकवलं. समृध्द केलं. शिक्षण पुर्ण झालं,पण मनात वावर पक्कं भिनलेलं. त्यामुळे कोणतीच कॅम्पस् इंटरव्युव्ह दिली नाही. कॉलेज संपलं आणि घर गाठलं.

शेतकामाची मुळातच आवड. त्यामुळे सहा महिने अंग मोडून शेती केली. जीव तोडून काम केलं. मनात मात्र मशिनरी पिंगा घालत होत्या. आपल्याला शेतातच जर काम करायचं होती तर मग शिक्षण कशाला घेतलं? काय उपयोग त्या शिक्षणाचा? जर आपण शिक्षण घेतलंच आहे तर त्याचा उपयोगही करून का पाहू नये? कॅंपस्  मुलाखत नाही दिली आपण. मग का शिकलो आपण?  विचार स्वस्थ बसू देईनात. पुन्हा बिर्हाड उचललं आणि पुणे गाठलं. शिक्षणाचं चीज करण्यासाठी.

नोकरीची शोधाशोध सुरू झाली. एके ठिकाणी मुलाखतीला बोलावण्यात आलं. मुलाखत छान झाली. नोकरी मिळणार हे पक्कं झालं. सगळं झाल्यावर अक्षयने विचारलं, "माझी पोस्ट काय असणार आहे."

मालक म्हणाला, "चपराश्याची."

"मी कोणतंही काम हलकं मानत नाही. मी चपराश्याची सगळी कामे करीन; पण मला माझी पोस्ट कोणती ते सांगा." अक्षयने निरागसपणे विचारले.

"हे पहा, आम्हाला इंजिनियर लोक भरणं परवडत नाही. त्यामळे आम्ही ती पोस्ट भरत नाही. तुम्हाला जमत असेल तर करा." मालक म्हणाले.

"साहेब, मी कामे सर्व करीन पण मी जे शिक्षण घेतलंय, जी माझी पॅशन आहे ती पोस्ट मला मिळणार नसेल तर मग माझ्या डिग्रीचा काय उपयोग आहे?" अक्षयच्या प्रश्नावर काहीच प्रतिसाद आला नाही.

अक्षय तिथून बाहेर पडला. आता करायचे काय? काहीच मार्ग दिसत नव्हता. अजून चार ठिकाणी नोकरी करण्याचा प्रयत्न केला. अन्डर एम्प्लॉयमेंट होतीच; पण ती पैशापेक्षा वृत्तीची जास्त होती. तो काळही तसाच होता. आजही त्यात तिळमात्र बदल झालेला नाही. तुटपुंज्या वेतनावर इंजिनियर खर्डेघाशी करतायेत. पोलीस भरती, बस कंडक्टर, बॅंक क्लर्क, पोस्ट यांमध्ये सहज खडा मारला तरी तो इंजिलियरलाच लागावा अशी परिस्थिती आहे. याचाच परिणाम म्हणून एकेकाळी ज्या इंजिनियरिंगची क्रेझ होती. ती कॉलेजं आता बंद पडतायत.

आता नोकरी करायचीच नाही हा निश्चय पक्का झाला. शेतकरी हा अक्षयचा आदर्श होता. भले तो पैसे कमी कमावत असेल पण तो मनाचा राजा असतो. आपणही आत आपलं स्वतंत्र राज्य  उभं करायचं. निर्णय  पक्का झाला. दिशा ठरली. मार्ग निश्चित झाला; पण सामग्री नव्हती. मनात विचार आला जगातल्या सर्वात शक्तीमान राजाला(औरंगजेब) आव्हान देत हिंदवी स्वराज्याचा संसार मांडणार्या शिवछत्रपतींकडे तरी काय होतं? दुर्दम्य ध्येयवाद आणि सृजनशीलता. बस्स ! मार्ग काढायचं ठरवलं.

यासाठी भांडवलाची उभारणी कशी केली? अशी विचारणा केली असता, अक्षयने दिलेलं उत्तर खूप मार्मिक आहे. तो म्हणाला, "भांडवल हा मुद्दा महत्वाचा नाही. भांडवलाच्याही आगोदर तुमच्याकडे एक चांगली कल्पना असावी. त्यानंतर टीम असावी. भांडवलाचा मुद्दा त्यानंतर येतो. तुमची टीम समर्पित असेल तर भांडवल हा अडथळा नाहीच. ते आपोआप उभं राहतं."

अक्षयने सुरूवातीला वीस-वीस हजाराचे नऊ प्रोजेक्ट केले. अर्थात त्यासाठीही पैसे नव्हतेच. मग ज्यांची ऑर्डर घेतली त्यांनाच ऍडव्हान्स मागितला. त्यांनीही तो कोणतेही आढेवेढे न घेता दिला. अक्षय म्हणतो, "तुमचा हेतू शुध्द असेल, काम प्रामाणिक असेल तर लोक चांगल्या कामासाठी पैसे ऍडव्हान्स सुध्दा देतात. त्यातूनच एक लाखाचे भांडवल उभे राहिले. हिच पहिली भांडवल उभरणी." 

यातला गमतीचा भाग असा की ऑर्डर जरी घेऊन पुर्ण केल्या जात असल्या तरीही अक्षयचं कुठेही ऑफीस नव्हतं. मॅनुफॅक्चरिंग प्लॅंट नव्हता. तो ऑर्डर घ्यायचा आणि गरजेप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणांहून ते पार्ट बनवून घ्यायचा. असाच एका ऑर्डरच्या कामासाठी एका कंपनीत गेला असता त्याची आशिष सोबत ओळख झाली. आतापर्यंत कोणाच्या फारशी लक्षात न आलेली गोष्ट आशिषच्या लक्षात आली. त्याने अक्षयसमोर सोबत काम करण्याचा प्रस्ताव ठेवला. अक्षयला तेच हवं होतं. अशाप्रकारे त्यांची पहिली टिम उभी राहिली. यातूनच जन्म झाला एका विश्वासार्ह कंपनीचा. कॉन्फिओ इंजिनियरींग सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड.

त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं  की आपण ज्या क्षेत्रात काम करतोय तिथे किमान दहा हजार लोक काम करतायेत. पण ग्राहकांचा त्यांच्याशी आणि त्यांचा ग्राहकांशी व्यवहार होताना फार अडचणी येत आहेत. त्यासाठी आपण मध्यवर्ती दुव्याची भूमिका का निभावू नये?  या कल्पनेतून एक नवा ब्रॅंड जन्माला आला. इंजिनियरिंग बाजार. काम जोरात सुरू झालं पण काहीच काळानंतर  लक्षात यायला लागलं की लोकांची सोय नक्की होतेय पण गुणवत्तेशी तडजोड होतेय. मग त्यांनी ते काम तिथेच थांबवलं. जर आपल्या कल्पनेप्रमाणे काम करता येत नसेल तर अजून थोडी तयारी करण्यासाठी थांबण्याची दोहोंचीही तयारी होती.

आता आपणच उत्पादन करून पुर्ण क्षमतेने बाजारात उतरायचं हे नक्की झालं. कंपनी तयार झाली होती. डायरेक्टर, सी.ई.ओ., मॅनेजर, डिझायनर, हेल्पर, वर्कर सगळी कामं दोघेच करायची. पण कंपनीचं ऑफीस होतं कुठं. चक्क हाय वे वरच्या ब्रिजखाली. पुणे-नाशिक महामार्गावर नाशिक फाट्याला ब्रिज आहे. हा ब्रिज तसा बर्याच जणांना रात्रीची निवारा पुरवतो. यांचाही निवारा तोच. अर्थातच याविषयी बोलताना मनात कुठेही कटुता नाही. अगदी हसत हसत आपला हा प्रवास ते सांगतात.

दोघेही संध्याकाळ व्हायची वाट पाहायचे. रात्री दोघेही त्या ब्रिजखाली एकत्र यायचे. प्रोजेक्टचं डिझाईन करायचे. कधी कधी संपुर्ण रात्र जायची पण डिझाईन फायनल होत नसायची. रात्रभर काम. झोप नावालाही नाही. कधी दोन तास तर कधी तिन तास. सकाळी उगवत्या सुर्याबरोबर पुन्हा दिवस सुरू. रात्री बनवलेलं डिझाईन दिवसभरात कुठल्यातरी प्लॅंटमध्ये बनवून घ्यायचं आणि ऑर्डर पुर्ण करायची. असं जवळपास सहा महिने चाललं.

सहा महिन्यांनी नविन जागेत अधिकृतपणे कंपनी सुरू झाली. स्टाफमध्ये अजून दोन जणांची वाढ झाली. सध्या कंपनीत पंधरा लोक काम करतात. डायरेक्टर, सी.ई.ओ., मॅनेजर, डिझायनर, हेल्पर, वर्कर सगळ्या पदांवर काम करणारी लोक सध्या कंपनीत आहेत. लॉकडाऊनमध्ये काम बंद असतानाही कंपनीने कोणालाही काढले नाही. सर्वांचा पगार पुर्ववत चालू होता. भले त्यासाठी बजेट कमी पडू लागल्यावर दुसरे काही प्रकल्प कंपनीने स्थगित ठेवले.

आज कंपनीच्या ग्राहकांचा विचार केला तर आपण आश्चर्यचकित होतो.कंपनीचं मूळ कार्यक्षेत्र हे रेसिंग स्पर्धेसाठी गाड्या बनवणे हे आहे. भारतभरातून साडेचारशे कॉलेज रेसिंग स्पर्धेत सहभागी होतात. त्यापैकी दोनशे कॉलेज कॉन्फिओ इंजिनियरिंग सोल्यूशन्स या कंपनीचे नियमित ग्राहक आहेत. यामध्ये आय. आय. टी. आहेत, एन. आय. टी. आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात यांच्या व्यापक पोहोचेविषयी सांगताना अक्षय म्हणतात, "मोठ्या व्यावसायिकांना जितकी प्रेमाची वागणूक देतो तितकीच आदराची वागणूक आम्ही विद्यार्थ्यांना देतो. या स्पर्धांमध्ये सर्वाधिक सहभागी हे विद्यार्थी असतात. जुने विद्यार्थी जरी बाहेर पडत असले तरी त्यांच्याकडून होणारी माऊथ पब्लिसिटी आमचा ब्रॅंड आणि कस्टमर बेस मजबूत करते. त्यामुळे आमचे नियमित ग्राहक टिकूनच आहेत नव्हे तर त्यात वाढही होत आहे."

सर्वाधिक ग्राहक आहेत म्हणजे यांची उत्पादनं स्वस्त आहेत का? या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी आहे. अक्षय सांगतात, त्यांची उत्पादने इतरांच्या तुलनेत दिडपट महाग असतात. तरिही लोक त्यांच्याकडे येतात, कारण हा जीवावरचा खेळ आहे. इथे गुणवत्तेशी तडजोड म्हणजे जीवाशी खेळ. यांची गुणवत्ता आणि विक्री  नंतरची सेवा या दोन्हीही अव्वल दर्जाच्या असल्याने गिर्हाईक दुसरीकडे जात नाही. याचा अर्थ उत्तम गुणवत्तेसाठी लोक अधिक पैसे मोजायला खुशीने तयार असतात.

हे सगळं उभं करत असताना अनेकदा अपयश आलं. काही पार्ट चुकीचे बनले. अशा स्क्रॅप मटेरियलचे त्यांनी कंपनासाठी चक्क संग्रहालयच बनवलंय. कारण एक पार्ट  बनवायला पंचेचाळीस दिवस लागतात. त्यामुळे कोणीही सहज या संग्रहालयामधून एखादी चक्कर जरी मारली तरी त्याला आपल्या  जबाबदारीची जाणीव होते. पुन्हा तीच चूक होण्याचा संभव नसतो.

एखादी व्यक्ती अत्यंत प्रतिकुलतेतून असं एखादं स्वप्नं साकार करते. त्यानंतर मात्र ते काम हीच त्या व्यक्तीची चाकोरी बनून जाते. अक्षय त्याला अपवाद आहे. अर्थात हे कामही काही लहान नाही. पण अक्षयने कॉन्फिओची जबाबदारी आपला मित्र आणि भागीदार आशिष वर सोपवून अजून नव्या वाटा चोखाळायला सुरूवात केली. त्याचंच मूर्त स्वरूप म्हणजे बीटहेल्प फाऊंडेशन.

समाजामध्ये सद्हेतूने उत्तम काम करणार्या अनेक समाजसेवी संस्था आहेत. त्या कामासाठी निधी उभा करणे हे त्यांचं नित्याचंच काम असतं. पण या कामामध्ये त्यांची बरीच उर्जा आणि वेळ वायाला  जातो. त्यांचा हा वेळ वाचवता आला तर? याच कल्पनेतून जन्म झाला बिटहेल्प फाऊंडेशनचा. समाजसेवी संस्थांचे गत तीन वर्षांचे लेखापरीक्षणाचे अहवाल तपासून त्यांची कंपनीच्या वेबसाईटवर नोंदणी केली जाते. त्यांच आर्थिक विवरणपत्र उपलब्ध करून दिलं जातं. संस्थेच्या कामामुळे समाजावर पडलेल्या साकारात्मक प्रभावचा आलेख पुरवला जातो. त्यावरून संस्थेचा प्रभाव लक्षात येतो.

याचा दुहेरी फायदा होतो. संस्थेला निधी जमवण्यापायी वेळ घालवण्याची गरज उरत नाही. आर्थिक मदत करणार्याला आपलं दान सत्पात्री पडलंय की नाही याची खात्री करता येते. कारण आपण ज्या कारणासाठी देणगी देतोय त्यासाठीच तो पैसा खर्च होईल याची शाश्वती सध्यातरी देणं कठीण आहे.

महिण्याला शंभर रूपयांपासून तुम्ही देणगी देऊ शकता. देणगी देणे म्हणजे फार मोठी रक्कम वगैरे द्यावी असेही काही नाही. चॅरिटी बिगीन्स् ऍट होम असे म्हणतात. त्याच न्यायाला जागत त्यांच्या कंपनातील प्रत्येक कर्मचारी यामध्ये योगदान देतो आहे. बिटहेल्पच्या मदतीतून उस्मानाबादच्या शिवार फाऊंडेशनने आतापर्यंत पासष्ट शेतकर्यांच्या आत्महत्या होण्यापासून वाचविल्या आहेत. जळगावच्या वर्धिष्णू संस्थेने कचरावेचकांच्या आणि व्यसनाधीन मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणले आहे.

समाजसेवा करणार्यांनी अगदी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून समाजसेवा करावी या मताचे अक्षय नाहीत. समाजसेवेतून त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थदेखील चालावयास हवा अशी त्यांची धारणा आहे.या संकल्पनेला ते सोशल आन्त्रप्रिन्युअरशिप म्हणतात. या बाबतीत ते गोबर गॅसच्या क्षेत्रात काम करणार्या वायू या संस्थेचे उदाहरण देतात. जेणेकरून समाजाला लाभही मिळतो आणि समाजकार्य करणार्याची प्रेरणाही शाबूत राहते.

शेतकरी घरातच बालपण गेल्याने शेतीक्षेत्रात काहीतरी करावे ही भावना उपजतच होती. ती वेळ आणि संधी मात्र लॉकडाऊनने दिली. काम बंद. हाताशी मुबलक वेळ. यातूनच  आकाराला आली ऍग्रोशिफ्टस् ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड. जागतिक दर्जाचं उत्पादन घेऊनही आपल्या शेतकर्याला निर्यातीविषयी काहीच माहीत नाही.आपणच या क्षेत्रात काम करायचं हे नक्की केलं. लॉकडाऊन नंतरच्या काळामध्ये शेतकर्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना या विषयाची माहिती दिली. त्यासाठी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. निर्यात करताना साधारणपणे सात टक्के  माल हा नाकारला जातो. त्या नाकारलेल्या मालावर उत्तर म्हणजे ही कंपनी.

निर्यात करताना नाकारला गेलेला माल स्थानिक बाजारपेठेत विकण्यासाठी एक साखळी बनवायची. कारण हा माल फक्त काही मानकांत बसत नाही म्हणून नाकारला जातो. त्याची गुणवत्ता कुठेही कमी नसते. त्यातून नुकसान मात्र शेतकर्यांचेच होते. हे टाळण्यासाठी काही अन्नप्रक्रिया करणार्या कंपन्यांसोबत करार करून ही साखळी विकसित करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामधून एक बी टू सी प्लॅटफॉर्म आकाराला येईल. त्यामुळे भविष्यात यातून शेतकर्याला खूप मोठा फायदा मिळेल. त्यांचं कृषी क्षेत्रातील हे काम पाहता अभियांत्रिकी क्षेत्रातील व्यक्तीला शेतीत रस नसतो असे कोण म्हणेल.

महाराष्ट्र आणि एकंदरीतच देशाच्या औद्योगिक क्षेत्राविषयी अक्षय अत्यंत आशावादी आहेत. ते म्हणतात आपण कोणत्याही वस्तूला सहजपणे मेड इन चायना म्हणून हिणवतो पण ते स्थान प्राप्त करण्यासाठी त्यांनी जे तप केले त्याकडे मात्र सहज दुर्लक्ष करतो. आपल्या देशाची क्षमता इतकी अफाट आहे की येत्या दहा वर्षात जर आपण नियोजनबध्द प्रयत्न केले तर या क्षेत्रात चीन नंतर आपण असू.

इतक्या व्यापातूनही ते वाचनासाठी वेळ काढतात. संगीत ऐकतात. प्रत्येक आठवड्याला सुट्टीच्या दिवशी मित्रांना भेटतात. फोन करतात. तुम्हाला वेळ कसा मिळतो असं विचारल्यावर, प्रत्येकाला वेळ असतो पण माणसं विनाकारण खोट्या सबबी सांगतात, असं ते आवर्जून नमूद करतात. या सगळ्या व्यापामध्ये आपल्या कुटुंबाचे विशेषत: आपल्या भावाचे योगदान अत्यंत प्रांजळपणे ते कबूल करतात. इतकं काम उभं करूनही कुठेही अहंकाराचा लवलेशही नाही. अजूनही नवनव्या दिशा त्यांना साद घालतात.

आजच्या तरूणांना काय संदेश द्याल से विचारले असता ते म्हणतात, "स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत. स्वप्न बघणं फुकट आहे. त्यामळे बिनधास्त स्वप्न पहा . त्यांना सत्यात उतरवण्यासाठी मेहनत घ्या. तुम्हाला यशापासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही." वयाच्या पंचविशीतच विचार आणि कार्याची इतकी उत्तुंग भरारी मारणार्या या चिरयुवान उद्योजकाशी बोलताना आपणही काहीतरी केलं पाहिजे अशी प्रेरणा माझ्या मनात निर्माण झालीय. तुमच्या मनात काय चाललय?

 

टिप्पणी पोस्ट करा

15 टिप्पण्या


  1. अप्रतिम लेखन
    प्रेरणादायी लेख

    उत्तर द्याहटवा
  2. प्रेरणदायी, अक्षय आणि आशिष सरांना खूप खूप शुभेच्छा त्यांच्या प्रयत्नांना सलाम, आई तुळजाभवानी त्यांच्या मनोकामना पूर्ण करो 👏👏

    उत्तर द्याहटवा
  3. जबरदस्त...
    खूप प्रेरणादायी लेख!

    उत्तर द्याहटवा
  4. अत्यंत प्रेरणादायी, उर्जात्मक, सृजनशीलता वाढविणारे... प्रतिकुलतेला अनुकूलतेत कसे बदलायचे याचे ज्वलंत उदाहरण.... ग्रेट अक्षय सरजी... धन्यवाद रमेश भाऊ... 👌👍👌😊

    उत्तर द्याहटवा