श्री संत भगवानबाबा : एक महासमन्वय

        उन्हाळ्याच्या सुट्टीला घरी गेलो होतो. सकाळी आठ नऊ  चा सुमार असेल.घरातून आईचा आवाज आला," बाळात्या म्हातारीला हाक मार बरे." मला वाटले असेल कोणीतरी. मी हाक मारली आणि गावात निघून गेलो.परत आलो तर मस्त ती म्हातारी आणि माझी आई जेवण करत होत्या.
      मी न रहावून आईला विचारले,"कोण या आजी?"
"अरे भाऊ मी गडावरली दगडाबाई हाई!" म्हतारीनेच उत्तर दिले.
मग माझे विचारचक्र फिरले.मला दगडाबाईच्या वर्तमानपत्रात वाचलेल्या  मुलाखती आठवल्या.भगवान गडाविषयीच्या तिच्या भावना,ऋणानुबंध वगैरे.आज भगवान बाबांच्या पुण्यरीरही निमित्ताने उगीच आपले आठवले.
मनाचा अश्व चौखूर उधळू लागला.मन भगवान गडावरील भगवान बाबांच्या समाधीजवळ गेले.
आज महान भागवत, श्रेष्ठ कीर्तनकार,सामाजप्रबोधनकार,युगप्रवर्तक,युगंधर भगवान बाबांची ५२ वी पुण्यतिथी. त्यानिमित्ताने भगवान बाबांच्या विचार कर्तृत्वावर  टाकलेला एक भाव कटाक्ष.
sant Bhagwanbaba, Bhagwangad
SANT-BHAGWANBABA



      सप्टेंबर १८९३.विश्वधर्मपरीषद.नरेंद्र दत्त नावाच्या छाव्याने जगाला ओळख करून दिली एका प्राचीन महान तत्वज्ञानाची.स्वतःच्या नशिबाला दोष देणाऱ्या ३० कोटी देशबांधवांची अस्मिता जागी केली.जुलै १८९६ कौतिकाबाइच्या पोटी जन्म घेतला,एका ज्ञानसुर्याने. ‘जन्म कर्मं च में दिव्यं’ या गीतावचनाप्रमाणे जन्मतःच १०८ दिवे अपोआप लागले. कदाचित ती भविष्यवाणी असावी भावी कर्तृत्वाची. सांगत असावी हा मुलगा  भविष्यात लक्ष्यावधी विझलेली मने प्रज्वलित करेल.
‘ज्ञानदेवे रचिला पाया। तुका झालासे कळस।।’ हे खरेच आहे पण त्या कळसावर भागवत धर्माची दिव्य पताका शाश्वतपणे फडकवत ठेवण्याचे कार्य केले भगवानबाबांनी. आजच्या महाराष्ट्राचा वैचारिक पिंड घडवण्याच्या कामात सिंहाचा वाटा आहे भगवानबाबांचा. भागवत धर्माच्या विचारध्वजाची आधारकाठी म्हणजे भगवानबाबा.
बाबांच्या जीवनकार्याचा विचार करता आपल्या असे ध्यानात येईल कि, बाबा ज्ञानेश्वर ते तुकाराम आणि महात्मा फुले ते राजर्षी शाहू या दोनही विचार परंपरांशी नाते सांगणारे होते. ‘जे का रंजले गांजले।त्याशी म्हणे जो आपुले।तोचि साधू ओळखावा।देव तेथेची जाणावा।।’ या संत उक्तीचे मूर्त रूप म्हणजे भगवानबाबा. समाजातल्या अपप्रवृत्ती, देवभोळेपणा, अंधश्रद्धा, बाजारू भक्ती यांवर बाबांनी कठोर प्रहार केले. परोपकार फक्त उपदेश करण्यापुरता नाही तर तो जगण्याची गोष्ट आहे,  ही बाब बाबांनी आपल्या स्वतःच्या आचरणातून दाखवून दिली. कित्येक गरिबांच्या लेकींचे लग्न बाबांनी स्वखर्चाने लाऊन दिलीत. गडावर आलेला मग तो कोणीही असो कधी उपाशी गेला नाही. आजही गडावर अखंडित अन्नदानाची परंपरा आहे. जगात सगळ्याच देवस्थानच्या ठिकाणी भाविकांच्या खिशाला कात्री लाऊन त्यांना बळजबरीने प्रसाद दिला जातो. पण सतत मोफत महाप्रसाद देणारे देवस्थान विरळाच. अर्थात ह्याची पायाभरणी केली भगवानबाबांनी.
महारष्ट्रभर फिरत्या नारळी सप्ताहाची परंपरा सुरु केली बाबांनी. कोणत्याही गावाला मागायला गेले आणि नारळ मिळाला असे घडत नाही. त्यासाठी मोठी प्रतीक्षा यादी असते. भगवान गडाचा सप्ताह म्हणजे भव्यता आणि दिव्यता यांचा सुभग समन्वय. पण याची सुरुवात मात्र शून्यातून करावी लागली. साउंड सिस्टीम कशी आहे, गायक कोण आहेत, पाकीट किती मिळणार, प्रतिसाद किती असतो याचा विचार केला असता तर हा महायज्ञ कधीच सुरु होऊ शकला नसता. सुरुवातीला मिळतील त्या साधनांच्या सहाय्याने, मिळतील त्या साथीदारांच्या संगतीने बाबांनी भागवत विचार विश्वभर पोचवला. अखंडित झिजले. अविरत लोकसंग्रह केला. तेव्हा आजचा हा पसारा उभा राहिला.
बाबांचे सर्वात महत्वाचे काम म्हणजे सामाजिक समन्वयाचे. अठरापगड जाती, गरिब, श्रीमंत, सुशिक्षित अशिक्षित, धर्मकारणी, राजकारणी, समाजसुधारक यांना एका विचारपिठावर आणण्याचे काम बाबांनी केले. 'सकलांशी येथे आहे अधिकार’ या उक्तीप्रमाणे सर्वांना आत्मोद्धाराचा मार्ग दाविला. त्या काळात आणि आजही आपापली संस्थाने सांभाळून असणारी तथाकथित महाराज मंडळी, त्यांचे अंधश्रद्ध चेले पाहिले की बाबांच्या कार्याची महती लक्षात येते. आज एक कीर्तनकार शक्यतो दुसर्या कीर्तनकाराचे कौतुक तर सोडा, पण एकमेकांची उणीदुणी काढण्याचेच काम जास्त करतात. कीर्तन हा धंदा बनवलाय ह्या लोकांनी. त्यामुळे समाज एकसंघ होण्या ऐवजी दुभंगताना दिसतोय.
बाबांनी व्यवसाय म्हणून नाही तर भक्ती म्हणून कीर्तन केले. समाजाकडे कधीही पाकिटाची मागणी केली नाही. 'अनपेक्ष शुचिर्दक्ष:’ या गीतावचनाप्रमाणे काम केले. समाजाचेही एक वैशिष्ट्य आहे, जो मागतो त्याला देत नाही आणि जो कधीही मागत नाही त्याला कधीही काही कमी पडून देत नाही. ‘कथेचा विकारा । मातेचे गमन । भाड खाई धन । चांडाळ तो।’ या तुकोबांच्या उक्तीप्रमाणे बाबांनी भक्तीचा कधीही बाजार मांडला नाही. न कोणाला मांडू दिला.
बाबांनी तत्कालीन समाजाला वैचारिक नेतृत्व दिले. सततचा दुष्काळ, निझामाचे अत्याचार, धर्मांतर, ब्रिटीशांचे राक्षसी सरकार या सगळ्यांच्या विरोधात भक्तीचा शस्त्रासारखा उपयोग केला भगवानबाबांनी. समाजाचे सत्व आणि स्वत्व जागे केले. लाचारांची अस्मिता उभी केली. अकर्मी समाजाला कर्तव्य संमुख बनवले. भक्त बावळट, दुबळा, लाचार, रडका असू शकत नाही. भक्त हाच खरा योद्धा असतो याचा परिचय समाजाला स्वतःच्या उदाहरणातून दिला.
व्यसन करू नका, मुलांना शिकवा, कर्जे काढू नका, हिंसा करू नका, देवभोळेपणा सोडून द्या, मस्त जगा; असा फक्त उपदेश करून बाबा थांबले नाहीत. महाराष्ट्रात ठिकठिकाणी विद्यालये, वसतिगृहे, वैद्यकीय महाविद्यालये बाबांनी स्वखर्चातून सुरु केली. आजकालचे भोंदूबाबा काय करतात? स्वतःसाठी हाय फाय बंगले बांधतात. झालेच तर एखादी संस्था काढून स्वतःसार्ख्याच गल्लाभरू बाबांची फौज तयार करतात. अजून वरतून मागत फिरतात मठाच्या नावाखाली.
आजकाल समाजात अजून हाही एक गैरसमज आहे कि, बाबा म्हणजे तो फक्त स्वतःच्या मस्तीत असला पाहिजे, त्याने फक्त समाजाला लुटले पाहिजे. भगवानबाबा तसे नव्हते. समाजातल्या शेवटच्या घटकाच्या भल्याची काळजी कायम बाबांनी वाहिली. समाजातील जातिभेदाच्या भिंती पाडण्यासाठी स्वतःचा देह झिजवला या महात्म्याने. ‘विष्णुमय जग । वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम । अमंगळ ।।’ पण आज पुन्हा समाज हा जातीपातीच्या भेदांमध्ये वाटण्याचा प्रयत्न होताना दिसतोय.
‘भगवानगड हे वंजारी समाजाचे महाराष्ट्रातील महत्वाचे श्रद्धास्थान आहे’ असा खुळचट प्रचार जाणीवपूर्वक सुरु आहे. महापुरुषांचा पराभव आंधळे अनुयायीच करतात असे जे म्हणतात त्याचा प्रत्यय या ठिकाणी येताना दिसतोय. धौम्य गडाचा भगवान गड होताना त्यासाठी जे हात राबले त्यामध्ये गवंडी, पाथरवट, लमाण, वडारी, टकारी, भिल्ल, पारधी, महार, मांग, कोळी, माळी, साळी, मराठा, धनगर, कुणबी अशा समाजातल्या सर्व घटकांचा समावेश होता. मग भगवानगड फक्त वंजारी समाजाचाच कसा? आणि तसे जर आपण म्हणत असू तर या अठरापगड दीन दलित समाजाच्या श्रद्धास्थानावर आपण बलात्कार करीत आहोत. आपण भगवान बाबांचा केवळ अपमानच नाही करत तर त्यांची सारी तपस्याच विफल ठरवीत आहोत. बाबांनी आयुष्यभर समाजाचा एकेक घटक जोडला. भक्तीचा गड उभा केला तो कश्यासाठी? राजकारणासाठी? समाजामध्ये दुफळी निर्माण करण्यासठी? गडावर पिढ्यानपिढ्या श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांचा भाव कलुषित करण्यासाठी? याचा विचार समाज म्हणून आम्ही केव्हा करणार?
आज आम्ही आमच्या सर्वच महात्म्यांना कुंपणात बद्ध करत आहोत. त्यांनी आयुष्यभर ज्या तत्वांच्या प्रस्थापनेसाठी संघर्ष केला आम्ही ती तत्वेच धुळीस मिळवत आहोत. फुले माळ्यांचे, आंबेडकर बौद्धांचे, टिळक ब्राह्मणांचे, छत्रपती शिवाजी महाराज मराठा-कुणब्यांचे. काय चाललेय काय? आपसात वाटून घ्यायला लाज कशी नाही वाटत आम्हाला समाज म्हणून? जरा विचार करून पहा. ‘जे जे भेटिजे भूत ।ते ते मानिजे भगवंत ।।’ या माऊलींच्या विचारांचे आणि ‘सर्वस्य चाहं हृदिसंनिविष्टो’ या गीतेच्या शाश्वत संदेशाचे आम्हाला स्मरण कधी होणार?
भगवानगडाचे सध्याचे महंत न्यायाचार्य डॉ.नामदेव महाराज शास्त्री  बाबांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. गडावर भव्य दिव्य बांधकाम, आधुनिक सुविधा आहेतच. त्यासाठी ते अखंडित प्रयत्नरत आहेतच. पण त्यांचे सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे भगवान गडावर केलेली ज्ञानेश्वरी विद्यापीठाची स्थापना. अपेक्षा इतकीच आहे कि त्यातून विवेकानन्दासारखे छावे बाहेर पडावेत न कि गल्लाभरू कीर्तनकार. त्यांनी बाबांचे विचार विश्वभर पोचवावेत. समाजातील धुरीण आणि गडाचा आधारस्तंभ वगैरे म्हणवून मिरवनार्यांनी गडाचा वापर आपल्या क्षुद्र राजकीय फायद्यासाठी करू नये. धर्म आणि राजकारण स्वतंत्र असावेत. याचे भान सर्वांनाच येवो. समाजातल्या सर्व विसंगतीचा सुंदर समन्वय होवो. भगवानबाबांच्या सर्व समन्वयाचा वारसा अखंडित राहो. त्यासाठीची शक्ती, बुद्धी, विवेक, बाबा आम्हाला देवोत इतकीच बाबांच्या चरणी प्रार्थना. आपणास भगवानगड भेटीच्या निमंत्रानासह ग्रेगरी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
रमेश वाघ
नाशिक

टिप्पणी पोस्ट करा

13 टिप्पण्या

  1. महापुरुषांचा पराभव कलुषित अनुयायी करतात.
    पवित्र अनुयायी तर सर्वांना हवेसे वाटतात.
    खुप छान पद्धतीने अनुभव आणि विचार शब्दबद्ध केलेत.

    उत्तर द्याहटवा
  2. जबरदस्त

    विचार पुर्वक वाचार मांडलेत सर जी
    विचार करायला लावणारा लेख
    विचार कल्याने विचार प्रकट होत असतात आणि असे चांगले विचारच विचारवंत घडवत असतात
    जय शिवराय

    उत्तर द्याहटवा
  3. सर , चांगल्या विचारांना अतिशय छान पद्धतीने शब्दबंध केलेत .अनुयायींनी अंध्दश्रध्देने व जातीयवादाच्या चौकटित न अटकता सतसत विवेकबुध्दिचा वापर करुन गडाचे महत्त्व व सत्व टिकवावे व पूर्वी पासुन असलेले ध्येय गाठाण्यास कटिबध्द रहावे..............
    आणि यासाठी देव सर्वांना चांगली बुद्धी देवो हीच भगवान गड चरणी प्रार्थना व मागणी.........

    उत्तर द्याहटवा
  4. वाह दादा अप्रतिम विचारसरणी

    उत्तर द्याहटवा