'देव घ्या
फुका न लगे रूका' म्हणणारे आमचे जगद्गुरू तुकोबाराय आणि गुटख्याची पिचकारी मारत where
is god म्हणणारी इंग्रजांची
पिलावळ ही श्रध्देच्या प्रांताताली दोन टोके झाली. बाकी आपण पंच्यान्नव टक्के समाज
हा या दोघांच्या मध्ये आहे. कन्फ्युज्ड. त्या मानाने ह्या दोन्हीही कॅटेगरी तशा
भाग्यवान. कारण त्यांच्या दृष्टीने प्रश्न संपलेला आहे. तुका म्हणे घालू तयावरी
भार म्हणणारे संत निश्चिंत आहेत. कारण ते भाररहीत आहेत. गुटखावीरही निश्चिंत
आहेत कारण ते बारयुक्त आहेत.(कळलं का?). आम्ही मात्र
दोलायमान. व्हाटस्अपला जशी पोस्ट येईल तशी आपली मते बदलतात. आपला गोंधळ तसाच
राहतो. देव म्हणजे नेमके काय? नेमका जगात देव आहे का?
असला तर तो कोठे आहे? तो कसा दिसतो? मग
तो भेटत का नाही? आमचे प्रश्न सरतच नाहीत.
![]() |
where-is-god |
अर्थात हे प्रश्न
अर्धवट लोकांनाच पडतात. कारण ज्याला देव मिळालाय, त्याला या प्रश्नांशी काहीही
देणंघेणं नसतं. ज्याला देव कशाशी खातात हेच माहीत नाही, त्यालाही प्रश्न पडायचं
कारणच नाही. असला प्रश्न पडतो आपल्यासारख्या रिकामटेकड्या लोकांना. अर्थात या आणि
अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे भगवंताने गीतेत देऊन ठेवली आहेत. पण गीता
वाचण्याइतकी आमची दानत आहे कुठे? सामान्यांना गीता वाचता येत
नाही म्हणून माऊलींनी मराठीत ज्ञानेश्वरीच्या रूपाने ती ज्ञानगंगा आणली. पण आम्ही
ठरलो नर्मदेतले गोटे. अशा कितीही गंगांचे पूर अंगावरून गेले तरी आमचे अत:करण मात्र कोरडेठाक.
मल निर्मोचनं पुंसां जलस्नानं दिने दिने
सकृत् गीताम्भसि स्नानं संसारमल नाशनम्
शरीराचा
मळ साध्या पाण्याच्या आंघोळीने दूर होतो.
गीताविचारांच्या स्नानाने संसाराचा असला नसला सगळा मळ नाहीसा होतो. असो.
देव नेमका काय प्रकार आहे? या बाबतीत स्वत: देव काय म्हणतात? त्याचीच चर्चा आपण येथे करणार
आहोत.
देव म्हणजे नमके काय ?
देव
म्हणजे नेमके काय? हा प्रश्न जर आपण कोणालाही विचारला तर जवळपास सर्वच जण
त्याचं उत्तर देण्याची शक्यता आहे. कारण आता टी.व्ही.वर इतक्या भाराभर पौराणिक
मालिका दाखवितात, की त्यातून सर्वांना माहित झालंय देव कसा
असतो ते. किंबहूना कसा दिसतो, ते तरी नक्कीच कळलं असणार. पण
हे देवाचं खरं चित्र आहे का? या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी
आहे. इंद्राच्या सभेत कामधाम सोडून नाचगाण्यात धुंद असतो त्याला देव म्हणायचे का? आणि देव जर असेच असताल तर मग देवपण या शब्दाला अर्थच काय उरला?
देव
कोणाला म्हणायचं? याच्या शास्त्राने काही कसोट्या ठरवून
दिलेल्या आहेत त्या कसोट्या जो पार करतो तो देवपदाला प्राप्त होतो. मग तो माणूस,
राक्षस, यक्ष, किन्नर वा गंधर्व कोणीही असला तरी.
सोळाव्या अध्यायातील
या तीन श्लोकांमध्ये भगवंताने देवांची
लक्षणे सांगितलेली आहेत. शब्दांवरून अर्थ लक्षात येईलच. कारण त्यावर चर्चा करायला
घेतली, तर आपला मूळ विषय बाजूला राहिल. तो विषय पुढच्या खेपेला घेऊ. इथे हे तीनही
श्लोक एकत्रित देण्यामागचा एकमेव हेतू हा की, देव होण्यासाठी इतके गुण अंगात असावे
लागतात. तेव्हाच देवपण येते. त्यालाच देवमाणूस म्हणतात. नाहीतर आपण कशातही देव
शोधायला जातो. जिथे वरीलपैकी गुण आहेत ती व्यक्ती कोणत्याही जातिधर्माची असली तरी
देव आहे. अशी गीतेची भूमिका आहे.
जगात देव आहे का?
हाच प्रश्न स्वामी विवेकानंदांना पडला
होता. त्या प्रश्नाचं व्यावहारिक उत्तरही श्रीरामकृष्णांनी त्यांना दिलं होतं. आता
तुम्ही म्हणाल आम्हाला कुठे सांगितले? वास्तविक ही भूमिका
घातक आहे. ज्या क्षेत्रात आपला अधिकार नाही, त्या बाबतीत जे कोणी अधिकारी असतील
त्यांचा शब्द प्रमाण मानावा, असा शास्त्रांचा आदेश आहे. करंट असलेल्या तारेला हात
लावू नये, कारण त्यात करंट आहे असे कोणी म्हणाला आणि आपण प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा
आग्रह धरला तर काय होईल? अशा बाबतीत शास्त्रांना प्रमाण
मानलं पाहिजे.
शास्त्राने प्रत्यक्ष
, अनुमान , उपमान आणि शब्द हे चार
प्रमाण मानलेले आहेत. आपणही त्याच्याच आधारे वाटचाल करावी. सगळ्या जगात, सगळ्याच
धर्मपंथातील संतांनी जे ओरडून सांगितले ते खोटे का असेल?
महान सम्राट चंद्रगुप्तांपासून ते छत्रपती शिवरायंपर्यंत सगळ्याच युगंधरांनी जे
ईशतत्व अंत:करणात धारण केलं ते आपण नेमकं कशाच्या बळावर
नाकारू शकतो?
देव कोठे आहे?
माणसाचा
स्वभावच प्रश्नवेल्हाळ आहे. अर्थात प्रश्न पडायलाच हवेत. कारण जगाच्या सगळ्या
ज्ञानाची निर्मिती ही कोणत्या ना काणत्या प्रश्नापासून झालेली आहे. किंबहूना
गीतेचा जन्मदेखील पुत्रप्रेमाने आंधळ्या झालेल्या बापाच्या प्रश्नातून झालेला आहे.
अर्थात या आणि वरच्याही प्रश्नात देव हा शब्द परमात्मा या अर्थाने घ्यायचा आहे.
देवाला माहित होतं देव आणि धर्म माणसाच्या हितासाठी जरी निर्माण झालेले असले, तरी
एक दिवस तेच त्याच्या नाशाचेही कारण ठरेल. म्हणून ह्या प्रश्नाचेही उत्तर देवाने
गीतेत देऊन ठेवले आहे.
चिलट
असो की हत्ती, ब्राह्मण असो की अंत्यज, आपला असो की परका, गाय असो की कुत्रा
सर्वांच्या ठिकाणी त्याच परमात्म्याचा वास असल्याने बुध्दिमान पुरूष कधीही भेदभाव
करीत नाहीत. जे भेदभाव करतात ते नि:संशय मूर्ख समजावेत.
असल्या मुर्खांमुळेच समाजात भेदाभेदांच्या भिंती निर्माण झाल्या.
विद्वानांसाठी
सर्व जगच विष्णूमय आहे. विष्णूमय जग । वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम । अमंगळ
।। किती मोठी वैचारिक झेप आहे जगद्गुरू तुकोबारायांची. विश्वधर्म हाच
वैष्णवांचा धर्म आहे आहे. तोच सगळीकडे व्यापून उरला म्हटल्यावर भेदाला थारा कुठे
उरला?
मी
मंदिरात राहतो असं कधीही देवानं म्हटलेलं नाही. तरीही इतकी मंदिरं का? या हा प्रश्नाचा विचार आपण येणार्या लेखातून करू. देव तुमच्या आमच्या
शुध्द अंत:करणात राहतो. अर्थात त्याला राहण्यासाठी आमच्या
अंतकरणात रिकामी जागा मात्र हवी. तरच तो येतो. 'तुका
म्हणे देह भरिला विठ्ठले । काम क्रोध केले घर रिते ।।'
काम , क्रोध यांसारख्या नकारात्मक भावना जेव्हा निघून जातील तेव्हाच देव अत:करणात येवू राहीन. अन्यथा आमच्या घरात आगोदरच राडा दिसत असेल तर घरी आलेला
पाहुणा देखील पळ काढतो तिथे देव काय राहणार?
आपल्याला देव भेटेल का?
संपुर्ण
भारतीय तत्वज्ञानाची रचना हीच मुळात जीवा शिवाच्या मीलनाच्या मूळ संकल्पनेभोवती
गुंफलेली आहे. धर्मशास्त्र, भक्तीशास्त्र अशा प्रकारच्या संज्ञा भक्तीच्या
शास्त्रीयत्वावर शिक्कामेर्तब करतात. त्यामुळे प्रत्येक शास्त्राची काही ठराविक
कार्यप्रणाली असते. तिचा मागोवा घेतला तर काहीच अशक्य नाही. माऊली म्हणतात, 'व्यासांचा
मागोवा घेतू । भाष्यकारें वाट पुसतु ।।' व्यासांसारखे या
क्षेत्रातील अधिकारी पुरूष आणि भाष्यकार यांनी दाखविलेल्या वाटेने गेले तर देव
नक्की भेटायलाच हवा.
'बोलिले जे ऋषी। साच भावे वर्ताया ।।' असे
जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात. फक्त त्या मार्गावरून शुध्द भावाने मार्गक्रमण घडणं
गरजेचं आहे. 'भावेविण देव । न कळे नि:संदेह ।।'
आमच्या व्हाट्सअप समूहात सामील होण्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा.
8 टिप्पण्या
Nakkich... Khup chhan..
उत्तर द्याहटवामनःपूर्वक धन्यवाद
हटवापुढच्या लेखाची प्रतिक्षा🙏😊
उत्तर द्याहटवामनःपूर्वक धन्यवाद सर
हटवाखूप अप्रतिम लिहलंय. ...
उत्तर द्याहटवाआवडला लेख!
अप्रतिम
उत्तर द्याहटवाखूपच छान
उत्तर द्याहटवाफारच छान विवेचन केलेत रमेश सर. ह्याला समर्पक अशी माझी "प्रांजळ" ह्या काव्यसंग्रहातील कविता आहे ती अशी की;
उत्तर द्याहटवादगडास देव कधी मानला नाही,
मंदिरात देव कधी दिसला |
कुठे कुठे शोधिले मी देवास असे,
चरणी आईच्या कधी शोधला नाही ||