![]() |
आपुली आपण करा सोडवण |
वाचायला कदाचित थोडे विचित्र वाटेल, कारण सतत आपण दुसर्यासाठी त्याग करावा. स्वत:साठी जगलास तर मेलास, दुसर्यासाठी जगलास तरच खरा जगलास. असे आपण ऐकत असतो. वास्तविक स्वत:चा प्रथम विचार करणे याचा अर्थ स्वार्थी होणे असा बिलकुल नाही. ज्यांच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम करता, त्यांची काळजी घेण्यासाठी तुम्ही स्वत: फिट असले पाहिजे. एखादा सैनिक जेव्हा व्यायाम करतो, तेव्हा ती देशसेवाच असते. एखादा शिक्षक जेव्हा दररोज नवीन काही शिकतो, तेव्हा ती समाजसेवाच असते. Charity begins at home असं जे म्हटलं जातं, ते यासाठीच. तुम्ही ठीक नसाल, तर तुम्ही दुसर्याचे काय हित कराल?
देव, देश आणि धर्माचं कार्य करायचं असेल, तर आगोदर त्यासाठी तुम्हाला सक्षम व्हावं लागेल. जेव्हा एक नागरिक निरोगी बनतो, तेव्हा तेवढ्यापुरता देश निरोगी बनतो. प्रत्येक नागरिक हा देशाची छोटी प्रतिकृतीच असते. प्रत्येक नागरिक सुदृढ बनेल, तर राष्ट्र आपोआपच समर्थ बनेल. आमचे संत जेव्हा आपला विचार आपण करावा असे म्हणतात, तेव्हा त्यांच्या म्हणण्याचा व्यापक अर्थ हा राष्ट्रविकासाचाच असतो. त्यासाठी माऊली म्हणतात, आपुली आपण करा सोडवण । संसारबंधन तोडा वेगी ।। इथे संसारबंधन तोडायचे म्हणजे काय? संसारिक गोष्टींच्या मध्ये अडकलेले मन मुक्त करायचे. पारतंत्र्य झुगारून द्यायचे. मानसिक गुलामांना भक्ती करता येत नाही, कारण त्यांचे मन स्वतंत्र नसते. स्वतंत्र विचार करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही स्वतंत्र असायला हवेत.
मंदिरात प्रवेश करताना चपला बाहेर काढण्याचे काय कारण? चप्पल ही संसाराचं प्रतिक आहे. मंदिरामध्येही तुमच्या मनात बाह्य गोष्टी असतील, तर मंदिरात येऊनही काही फायदा नाही. चपला बाहेर सोडणे याचा अर्थ मनावरील सर्व जोखड भिरकावून देवून भाररहित होऊन देवाला भेटायला जाणे. भाररहित असाल तर देवाशी मुक्तसंवाद होईल, तादात्म्य पावता येईल. डोक्यावर गवताचा भारा घेऊन तुम्ही तुमच्या जीवलग मित्राशी पोटभर गप्पा नाही मारू शकत. त्यासाठी मोकळं असणं आवश्यक आहे. त्या मोकळेपणासाठी सर्व बंधने तोडणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला स्वत:चा विचार करायला वेळ मिळेल. मनावर ताण असेल, तर तुमच्या आवडत्या खेळाचाही तुम्हाला आनंद घेता येत नाही. देवकार्य आणि देशकार्य तर दूरचीच गोष्ट!
बर्याच लोकांना स्वत:साठी वेळच नसतो. आपली सनातन संस्कृती गुरूकुलातील विद्यार्थी गृहस्थ जरी बनला तरी त्याला आदेश द्यायची की, स्वाध्याय प्रवचनाभ्यां न प्रमदितव्यम् ।। मानवी जीवनाच्या विकासासाठी निरंतर अभ्यास आवश्यक आहे. स्वाध्याय म्हणजे स्वत:च्या विकासाचा अभ्यास. त्यासाठी आपल्याला वेळच नसतो. चांगलं पुस्तक वाचायला वेळ नाही, चांगलं काही ऐकायला वेळ नाही, कोणाशी चांगलं बोलायला वेळ नाही. मग विकास होणार कसा? गाडीचा आरसा रोज पुसला नाही तर त्यावर जमा होणारी धूळ एक दिवस अपघात घडून आणेल. आपलं मनही आरशाप्रमाणेच आहे. त्यावर दररोज अनंत प्रकारचा कचरा बसतोय. तो साफच केला नाही तर? तो कचरा साफ करण्यासाठी संतांनी भक्तीमार्ग दाखवला.
त्या मार्गावर चालताना मात्र एकट्यालाच चालावे लागते आणि आपली मंजिल मिळवावी लागते. तिथे प्रतिनिधी चालत नाही. एखादी व्यक्ती तुमच्या कितीही प्रेमाची असली, तरीही हा आत्मविकासाचा मार्ग स्वतःलाच चालावा लागतो. कोणीतरी माझ्यासाठी काही करेल ही भ्रामक धारणा आहे. जे देवांचे दलाल आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, मोक्ष देण्याचे दावे करतात, ते सगळे बाजारू समजावेत. भगवान बुद्ध सांगतात, तुच तुझ्या जीवनमार्गावरचा दीप हो. त्यासाठी अहंकाररहीत झाले पाहिजे. बर्याचदा आपण सार्या विश्वाचे टेन्शन आपल्या डोक्यावर घेऊन बसतो. कारण आपण फारच महत्वाचे घटक आहोत, असा वृथा अहंकार आपल्याला असतो. आठ दिवस मोबाईल फेकून एकांतात जा. ना पेपर, ना टीव्ही, ना कोणाची कुरकूर. परत आल्यावर कळेल आपल्यावाचून जगाचं काहीच अडलेलं नसतं. माझ्यावाचून जगाचं अडतं असं जे आपण म्हणतो, ते आपणच आपल्या इगोला कुरवाळणं असतं. इगो सोडला, की सर्वांचे सर्व कल्याण आहे. ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात,
हा विचारुनि अहंकारु सांडिजे । मग असतीच वस्तु होइजे ।
तरी आपली स्वस्ति सहजें । आपण केली ॥
रमेश वाघ, नाशिक
संपर्क - 9921816183
4 टिप्पण्या
Very good and optly written sirji
उत्तर द्याहटवाThank you
हटवासुंदर आणि प्रबोधनात्मक लेख!
उत्तर द्याहटवाThank you sirji
हटवा