वारी म्हणजे काय?

 

वारी म्हणजे महाराष्ट्राचं सांस्कृतिक संचित. वारी म्हणजे एखादी क्रिया वारंवार करणे. वाईटाचं निवारण करणे म्हणजे वारी. सर्व चिंता वारणे आणि दु:खातून सावरणे म्हणजे वारी. संसारिक तापातून निवृत्तीचा अनुभव वारीत येतो. लहानथोर सर्व आपलं सर्वस्व विसरून वारीच्या आनंदात सहभागी होतात. अर्थात सर्वस्वाचा विसर पडल्याशिवाय आनंदाचा उपभोगही घेता येत नाही. काळ्या वावरात आपल्या कमरेचा कसा पेरून शेतकरी वारीला निघतो. त्यासाठी त्याला बॉसकडून रजा मंजूर करून घ्यावी लागत नाही. शेतात पेरलेले उगवेल का? पाऊस वेळेवर पडेल का? या सर्व प्रश्नांचा भार विठू माऊलीवर घालून तो पंढरीची वाट चालू लागतो.

what-is-wari, वारी म्हणजे काय?
वारी म्हणजे काय?

  आपल्याला भोजनाचा आनंद असतो तर वारकर्याला आनंदाचे भोजन. आपण आनंद आणि सुख समान अर्थाने वापरतो पण ते तसं नाही. सुखासाठी साधनं लागतात, आनंद अंतरातच असतो. त्या अंतरातल्या आनंदाचा शोध पंढरीच्या वाटेवर लागतो. पांडुरंग व्यावहारीकदृष्ट्या पंढरपुरात असला तरी, वारकर्याचं अंतकरणच पंढरपूर बनून जातं. ग्यानबा-तुकारामच्या नामगजरात मनच पांडुरंगमय होतं. प्रत्येकात पांडुरंग दिसायाला लागतो. प्रत्येकजण एकमेकाला माऊली म्हणत एकमेकांच्या पायावर झुकतो. 'आनंदाचे डोही आनंद तरंग' अशी स्थिती होते.  शंकराचार्य पांडुरंगाला 'आनंदकंद' म्हणतात.  वारकर्याची वाटचालच आनंदाच्या कंदाच्या दिशेने होत असते.

कोणतीही सवय अंगी बाणवायला साधारण एकवीस दिवस लागतात असं आजचं मानसशास्त्र मानतं. त्याच्याही पूर्वी त्याचं व्यावहारिक रूप वारीच्या रूपाने आमच्या वारकरी संतांनी उभं केलं. घरापासून पंढरपुरापर्यंत पंधरा दिवस (कमीत कमी हं!). पुन्हा परतीचा प्रवास एका आठवड्याचा. 'असोनि संसारी जिव्हे वेगु करी' हा शाश्वत सुखाचा रस्ता आहे. त्या रस्त्यावर चालण्याचं प्रॅक्टीकल म्हणजे वारी. संसार करायचा; पण त्याला चिकटून बसायचं नाही. चिखलात उगवूनही कमळाला चिखल जसा चिकटत नाही त्याप्रमाणे!  त्याचं ट्रेनिंग म्हणजे वारी. ते ट्रेनिंग सलग एकवीस दिवस साधूंच्या संगतीत मिळाले, की त्या सवयीचं स्वभावात रूपांतर होतं. असा प्रशिक्षित वारकरी संसारात असूनही संसारातल्या सुखाने फुलत नाही आणि दु:खाने व्यथित होत नाही. हाच भारतीय तत्वज्ञानाचा कळस आहे. हे वरवर रूक्ष भासणारं तत्वज्ञान नकळत अंतरात रूजवते तिचं नाव वारी.

अभावातला भाव खरा असतो आणि त्या भावाचा देव भुकेला असतो. आपल्याकडे कशाचाच अभाव नसतो तरी कायम तक्रारी करण्याचा आपला स्वभाव असतो. आपणाला सर्व गोष्टीचे भाव ठाऊक असतात; पण आपला भाव गायब असतो. त्यामुळे आपल्या जीवनात सुखाचा अभाव असतो. कित्येक वारकर्यांच्या पायात चपला नसतात, तरीही त्यांच्या मुखावरचं स्मित कधीही मालवत नाही. त्यांचा आत्मभाव जागृत झाल्यामुळे त्यांना देहभावाचं भान राहत नाही. आपला देहाभिमान कधी जातच नाही. त्यामुळेच आपल्या घरातल्या किराण्याइतका खर्च दरमहा पार्लर, ब्युटी क्रिम, कॉस्मेटिक्स, मेकअप यांवर होतो. एखाद्या रोगाचे लक्षण वाचले, तरी तो रोग आपल्याला झालाय की काय, असे आपल्याला वाटायला लागते. माणसाचे नव्वद टक्के रोग सायकोसोमॅटिक असतात, असे तज्ज्ञ महणतात. कारण? अतिरिक्त देहभाव. या देहातच विठ्ठलाला काठोकाठ भरून कामक्रोधादी निगेटिव्ह गोष्टींना वारकरी हुसकावतो. त्याच्या हृदयाच्या बंदिखान्यात पांडुरंगच कोंडलेला असतो.

जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत भेद विसरून सर्व स्तरातील लोक एका पंक्तीला बसतात. जे कोणत्याही कायद्याने कधी साध्य होत नाही; ते साध्य करण्याची ताकद भक्तीमध्ये आहे. समाजाला भक्तीची बैठक मिळाली; की जगातल्या सर्व समस्या चुटकीसरशी सुटू शकतात. फायदा असेल तोपर्यंत कायदा पाळण्याचा वायदा देतात लोक. कायद्याने अस्पृश्यता खरेच दूर झाली का? प्रश्नच आहे. पण पांडुरंगाच्या वात्सल्यरंगात सगळे एक होऊन जातात. तिथे जातिभेद उरतच नाही. ब्राह्मणांचा ज्ञानेशवर पुढे चाललाय आणि महाराचा बंका कडेवर बसलाय; असं गोंडस वर्णन जनाईने लेकुरवाळ्या विठ्ठलाचं केलं आहे. सामाजिक समता, समरसता, एकता, एकात्मता, बंधुभाव, परस्पर प्रेम याचं यापेक्षा गोमटं चित्रं कोणतं असू शकेल? भक्तीची दृष्टी असेल तर, समाजातल्या कठीणातल्या कठीण समस्यांची सुट्टी होऊ शकते.

वारी भक्तीचा डोळा देते. समाजाकडे भक्तीच्या नजरेने पहायला शिकले, की कोणी परका उरतच नाही. सर्व जगच विष्णुमय. जर कोणी परका नाहीच; तर भेद तरी कशाचा? जर भेदच मिटला, तर दु:ख कुठून येणार? कारण दुसरा आला की भेद उत्पन्न होतो. भेदातून भय, ईर्षा, द्वेष, मद, मत्सर, उद्वेग आदि भाव उदयाला येतात. हा भेदाचा भावच दु:खाला कारण होतो. तो समूळ नष्ट करण्याचं काम वारी करते. सर्वांच्या हृदयात देवच आहे; हा तत्वज्ञानाचा गाभा प्रत्येकाच्या अंत:करणात वारी उभी करते. माऊली म्हणतात ना,

एऱ्हवीं सर्वांच्या हृदयदेशीं । मी अमुका आहें ऐसी ।

जे बुद्धि स्फुरे अहर्निशीं । ते वस्तु गा मी ॥

रमेश वाघ, नाशिक.

संपर्क - ९९२१८१६१८३

वारी म्हणजे काय?, what is wari?
वारी म्हणजे काय?

लेख आवडला असेल तर दणक्यात सर्वत्र शेयर करा. रामकृष्ण हरी.

 आमच्या व्हाट्सअप समूहात सामील होण्यासाठी येथेक्लिक करा. 

 आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा. 



 हा ग्रंथ घरपोच मागविण्यासाठी येथे  क्लिक करा. 

किंवा ७०५७२९२०९२ या क्रमांकावर संपर्क साधा.

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

  1. खूपच छान, अभ्यासपूर्ण, वास्तवादर्शी ,मानवि जीवनाशी सांगळ घालणारे लेखन आहे सर आपले....

    उत्तर द्याहटवा
  2. खूप सुंदर भक्तीमय लेख माऊली! 🙏🙏

    उत्तर द्याहटवा