अहंकार नाश कसा करावा?

 

अहंकार नाश कसा करावा?, how to control ego
अहंकार नाश कसा करावा?

अचानक पावसाने गाठल्याने झाडाच्या आडोशाला मोटरसायकल उभी करून थांबलो. इतक्यात समोरून एक चारचाकीवाला आला. तो म्हणाला, "गाडी मागे घे." पाठीमागून चढ असल्याने गाडीवर बसूनच पायाने रेटा देऊन गाडी पाठीमागे घेणं मला अशक्य होतं. त्याने जर थोडी गाडी मागे घेतली असती तर मी सहज पुढे निघून जाऊ शकलो असतो. म्हणून मी म्हणालो, "अहो, तुम्हीच दोन फूट मागे घ्या, मी निघून जातो, मग तुम्ही निघून जा." त्याला आला राग. तो तिथूनच दम द्यायला लागला. मग मीही मुद्दाम दोन्ही हातांची घडी घातली आणि त्याच्याकडे बघत राहीलो. तो तावातावाने गाडीतून खाली उतरत म्हणाला," सांगितलेलं  कळत नाही का?  गाडी मागे घेतोस की, पाहू तुझ्याकडे?"

आता तिथे भांडण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. विनाकारण वाद कशाला? म्हणून मी त्याला स्माईल दिली आणि निघून आलो. माझा इगो मला म्हणायचा, " लोकांना वाटेल एकतर तू घाबरलास किंवा निर्लज्ज तरी आहेस." कोण चूक? कोण बरोबर? कोणाची हार? कोणाची जीत? हे प्रश्न गौण आहेत. त्रास मात्र दोघांनाही झाला असता. तिथे आपल्याला असे किती वेळ थांबायचे होते? पाहणारे लोक, समोरचा भांडणारा तो, आणि माघार घेणारा मी, सर्व क्षणाचेच तर साथीदार होतो. आपलं जीवनही असंच नसतं का?

असले प्रसंग आपल्या दैनंदिन जीवनव्यवहारात वारंवार येत असतात. माझंच कसं बरोबर, या अट्टहासापायी आपण आपली बाजू लावून धरतो. समोरच्याचंही काही योग्य असू शकतं, हे आपण गृहीतच धरत नाही. परिणामी राईचा पर्वत होतो. वर्तमानपत्र उघडलं तर क्षुल्लक कारणावरून हाताबाहेर गेलेली प्रकरणं आपण पाहतो. मी कोणी तरी टिकोजीराव आहे असा आपला अविर्भाव असतो. एरवी आपल्याला गल्लीतलं कुत्रं देखील विचारत नसतं. आपला तोरा मात्र राजासारखा असतो. आपल्या मताला कवडीचीही किंमत नसते, तरीही प्रत्येक गोष्टीवर आपल्याला मत असतं. बुद्धीचा अहंकार असतो. रामायण, महाभारत काल्पनिक गोष्टी आहेत, इथपासून तर संतांनी समाज कसा पंगू बनवला इथपर्यंत, आपल्या खिशातल्या पुड्या आपण सोडत असतो. अरे पण तुझ्या मताला विचारतो कोण? दर पाच वर्षांनी तरी विचारतात का? विचारतात की सांगतात? कुठलाही पुढारी तुमच्या घरी येऊन तुम्हाला विचारत नाही, तुमचं मत काय?  गाजर दाखवून तुमचं मत घेतलं जातं. आपल्याला उगाचच मताचा अहंकार असतो.

आपल्या मताचा दुराग्रह वादाला खतपाणी घालतो. खोट्या अहंकारापायी संसार मोडतात. नांदत्या घराचं वाळवंट बनतं. माझ्या पाहण्यात असे दोन भाऊ असे आहेत की, ज्यांचं भांडण आम्हाला कळत नव्हतं, तेव्हापासून चालूच आहे. बापाने कष्ट करून कमावलेली सगळी शेती पडीक आहे. मुलांची लग्नाची वये उलटून गेलीत. सोयरिकच येत नाही. त्यांना म्हटलं "बस करा, हारलात तर?" त्यांचं उत्तर ठरलेलं. "चाळीस वर्षे याला कोर्टाच्या खेट्या करायला लावल्या हाच आमचा विजय." आपली वाट लागली तरी चालेल, पण दुसर्याचं वाटोळं झालं पाहिजे, ही भावना कशातून येते?

पैसा आज आहे उद्या नसणार. बुद्धी जे दिसतं त्याच्यानुसार समजूत करून देते, पण आपल्या दिसण्या-ऐकण्यापलीकडे  खूप मोठं जग असतं. शक्ती एका टप्प्यानंतर क्षीण होत जाते. रूप कायम टिकणारं नसतं. एकेकाळी ज्या मदनिकांनी लोकांच्या मनावर गारुड केलं, आज त्यांचा चेहरा त्यांचा नातू देखील पाहत नाही. जर या सगळ्या गोष्टी क्षणिक आहेत तर, मग अहंकार कशाचा धरायचा? बर्याचदा जे आपलं नाही त्याचाही आपल्याला अहंकार असतो. भावकीचा पैसा, सासुरवाडीचं सामर्थ्य वगैरे. दुसऱ्याच्या सामर्थ्याचा अहंकार गाजवणार्याला मूर्ख म्हणतात.

ज्याचा आपल्याला अहंकार वाटतो, ते आपल्या कर्तृत्वामुळे मिळालेलं असतं का? बारकाईने विचार केला तर उत्तर नकारार्थी आहे. आपलं कुठलंही यश, बल, संपत्ती, सौंदर्य यात कोणाचं ना कोणाचं योगदान नक्की असतं. ते नाकारणं हा आपला बौद्धिक अप्रमाणिकपणा.  बौद्धिक व्याभिचारातून अहंकार निर्माण होतो. जो बौद्धिकदृष्ट्या प्रामाणिक असेल तो अहंकारी होऊ शकत नाही. जो अहंकारी नाही, तो कधीच कसलाही आग्रह धरीत नाही. अहंकार गेला की, सगळ्या समस्या खलास. आज आमच्या व्यक्तीजीवनातील असो की राष्ट्रजीवनातील सगळ्या समस्यांचे मूळ अहंकार आहे. मग ते भावकीचे भांडण असो, रशिया-युक्रेन युध्द असो की, अमेरिका-चीन तणाव. आमच्या भक्तमंडळीना अहंकाराचा वाराही लागू नये, हा आमच्या संतांचा आग्रह त्यासाठीच.

श्रीमद्भगवद्गीता अहंकारनाश करते. परम पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांनी गीतेचे पंचप्राण सांगताना अहंकारनाश हा गीतेचा प्राण सांगितलेला आहे.  मीच करतो हा अहंकार काढून काम करणं म्हणजे निष्काम कर्म. फळाची इच्छाच नसेल तर यशाने अहंकार वाढणार नाही आणि अपयश आलं म्हणून दुःखही कोसळणार नाही. अहंकार सोडला तर प्रत्येक कृती निर्हेतूक, निस्वार्थी, समाजहितैशी बनते. अहंकार जर गेला तर कोणाकडून कसलाही आग्रह उरत नाही. आग्रह गेला की मन एखाद्या शांत सरोवरासारखं होतं. मन शांत झालं की, प्रसन्नता लाभते. जो प्रसन्न असतो तोच जीवनामध्ये सुखाचा अधिकारी. अहंकार गेला तर माणूस निरपेक्ष होतो. ना स्तुतीची अपेक्षा ना निंदेचा तिटकारा.पाऊस आला न आला तरीही सागराची स्थिती बदलत नाही.  समुद्र पावसावाचून सुकत नाही. काहीही न मिळाले तरी जो खिन्न होत नाही,  मिळाले तरी हर्षित होत नाही, त्यालाच  ध्येय साध्य होते. माऊली म्हणतात, 

तैसें निंदे आणि स्तुति । मानु करूनि एके पांती । विचरे प्राणवृत्ती । जनीं वनीं ॥

रमेश वाघ, नाशिक

संपर्क- ९९२१८१६१८३

अहंकार नाश कसा करावा?,how to control ego
अहंकार नाश कसा करावा?
लेख मनापासून आवडला असल्यास सर्वत्र पाठवा.


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या