ज्ञानेश्वरी कशी वाचावी?

 

ज्ञानेश्वरी वाचण्याचे नियम काय आहेत? ज्ञानेश्वरी आम्हाला समजत नाही, ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी वेळ नाही, वाचण्याची खूप इच्छा आहे पण कोणती वाचावी ते कळत नाही, कोणी समजावून सांगणारा भेटत नाही, मग ज्ञानेश्वरी नेमकी कशी वाचावी? अशा शंका बर्याच जणांनी उपस्थित केल्या. त्यासाठी मागच्याच विषयाचा पदर धरून पुढे जाणारा हा लेख.

how-to-read-dnyaneshwari, ज्ञानेश्वरी कशी वाचावी
how-to-read-dnyaneshwari

 ज्ञानेश्वरी म्हणजे देवाविषयी काहीतरी भानगड आहे आणि त्यात जर काही तांत्रिक चूक झाली तर आपल्याला दुष्परिणाम भोगायला लागतील या भीतीने आपण तिच्या जवळ जातच नाही. ज्ञानेश्वरी हा बुवाबाबांनी किंवा रिकामटेकड्या म्हातार्यांनी वाचण्याचा प्रकार आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे काहीतरी धार्मिक अध्यात्मिक वगैरे आहे, असाही आपला समज. ज्ञानेश्वरी ही आई आहे. आईशी व्यवहार करताना काही औपचारिक नियम असतात का? लेकरू बोबडं बोललं तरी आईचा आनंद गगनात मावत नाही. ती त्याच्या उष्ट्या खरकट्या मुखाचा मुका घेते. हा आईचा स्वभावच असतो. बाळानं दोन पावलं आईच्या दिशेने टाकली तरी ती धावत  येते आणि त्याला कडेवर उचलून घेते. तिथे कोणताही नियम नसतो. एकच नियम निखळ प्रेमभाव. लौकिक आई जर स्वत:कडे येणार्या लेकराला पडू देत नसेल, तर ज्ञानेश्वरीसारखी माऊली आपल्याला पडू देईल?

ज्ञानेश्वरी वाचण्याचा ग्रंथ नाही तर तो अनुभवण्याचा ग्रंथ आहे. ती कशी वाचावी याचे नियम  स्वत: माऊलींच सांगतात. ज्याप्रमाणे शरद ऋतूच्या चंद्रकिरणातील अमृताचे कोमल कण चकोराची पिले मृदुल मनाने वेचतात तसे चित्त हलके करून ही कथा अनुभवावी. हिची चर्चा शब्दावाचून करावी. इंद्रियांच्या नकळत हिचा उपभोग घ्यावा. कमलदलातील पराग भुंगे घेऊन जातात, परंतु कमळाच्या पाकळ्यांना त्याची खबरही नसते, त्याप्रमाणेच या ग्रंथातील तत्वांचे सेवन करावे. चंद्र दिसू लागताच चंद्रविकासी कमलिनी प्रफुल्लित होऊन आपली जागा न सोडताच त्याला आलिंगन देते, असं हे कैवल्याचं प्रेमसौख्य भोगावं. गंभीर व शांत अंत:करणाने संपन्न असणाराच हिचे रहस्य जाणू शकतो. अर्जुनासारखी ज्यांची योग्यता असेल तेच ज्ञानेश्वरीचे अधिकारी होत. बस इतकी तयारी असेल तर कोणीही, कुठेही, कशीही ज्ञानेश्वरी वाचू शकतो. त्यासाठी कपडे कोणते घालावेत, दिवा कसा लावावा, आसन कसं घालावं, आहार कोणता घ्यावा, स्नान करावं की नाही अशी कोणतीही तांत्रिक बंधन आवश्यक नाहीत.

मग हे नियम कशासाठी? आपली मनस्थिती तयार होण्यासाठी. उदाहरणार्थ वाचन करताना आंतर्बाह्य शुचिता आवश्यक. बाह्य शुचिता नसेल तर आंतरिक शुचिता कठीण. म्हणून स्नान आवश्यक. बाकीची साधनंही वातावरण निर्माण करण्यासाठी साह्यभूत होतात म्हणून आवश्यक. ते नियम अनिवार्य आहेत का? आजिबात नाही. पण पाळले  तर  फायदाच होतो. पण जर समजा पाळताच येत नसतील तर? ज्ञानेश्वरी वाचन बंद करून चालेल का? नियम ज्ञानेश्वरी चांगल्या पद्धतीने वाचण्यासाठी म्हणून आहेत. नियमांसाठी ज्ञानेश्वरी नाही. आर्य चाणक्य म्हणतात, श्लोकेन वा तदर्धेन तदर्धार्धाक्षरेण वा । अबन्ध्यं दिवसं कुर्याद्दानाध्ययनकर्मभिः॥ ज्या दिवशी तुम्ही एक ओवी, अर्धा ओवी, पाव ओवी,किंवा ओवीचं एक अक्षर शिकला नाहीत तो दिवस व्यर्थ. कोणत्याही परिस्थितीत अमूक नियम पाळता येत नाहीत म्हणून वाचनात खंड पडू नये.

वाचावी हे खरे पण भाषा कळत नाही. आता? बहूजन समाजासाठी माऊलींनी संस्कृतातली गीता ज्ञानेश्वरीच्या रूपाने देशी भाषेत आणली. कालांतराने भाषा बदलत गेली. आज आम्ही शिकलेले आंग्लमिश्रीत मराठी इतकी बोलतोय की काही काळाने एखाद्या शब्दाला मूळ मराठी शब्द कोणता हेही आम्हाला आठवणार नाही. आदिवासी भागातील बरीचशी बोलीभाषा ज्ञानेश्वरीच्या भाषेशी मेळ खाते. कारण ती भाषा भेसळ न करता ते आजही वापरतात. Use it or loose it  हा नियमच आहे. भाषा वापरातून गेल्याने कठीण वाटते. वाचायला सुरूवात करा. सोपी वाटेल. अनोळखी घरात पाणी मागायलाही संकोच वाटतो, पण एकदा सलगी वाढली, मैत्री झाली की, आपण आपल्या हाताने घरात जाऊन पाणी घेतो. हेही तसंच. शब्दांशी सलगी करा. शब्द ओळखीचे होतील. पूर्णांशाने कळण्यासाठी कृपा आवश्यक. पण सुरूवातच केली नाही, तर कृपा कशी होणार. मला ज्ञानेश्वरी पूर्ण कळलीय असं म्हणणारा मायेचा पूत अजून जन्मायचाय, पण एक ओवी जरी कळली तरी आयुष्याचं सोनं होतं हे नक्की.

नवीन वाचकांसाठी मामासाहेब दांडेकर किंवा साखरे महाराजांची सार्थ ज्ञानेश्वरी उत्तम. कामाच्या धावपळीत पुस्तकातून वाचणे शक्य नसेल तर लॅपटॉप, मोबाईल, ई बुक रिडर अशा अन्य पर्यायांचा देखील उपयोग करता येईल. वेळ मिळत नाही, प्रवासात वाचा. कित्येक ऍप्स, ब्लॉग्स, युट्युब चॅनेल्स उपलब्ध  आहेत. फेसबुक, व्हाट्सअपचे गृप आहेत. गृप उपलब्ध नसला तर तुम्ही बनवा. इच्छा असेल तर हजारो वाटा खुणावतात. जशी कळेल तशी वाचायला सुरूवात करा. यश देणारी माऊली थोर आहे. एकमेकांना गिफ्ट म्हणून ज्ञानेश्वरीच द्या.  एका शेतकर्याचा फोन आला. "मी आहेर म्हणून फक्त ज्ञानेश्वरीच देतो. माझी आर्थिक परिस्थिती तितकीशी बरी नाही, पण भक्ती म्हणून मी हे कार्य करतो आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत  करीत राहणार. माझ्यानंतर हा वसा चालू ठेवण्याचं वचन मी माझ्या मुलांकडून घेतलं आहे."  कळत नाही म्हणून वाचनाचा वसा सोडू नका. सुरूवातीला इंग्रजीही कुठं कळतं? ज्ञानेश्वरीचा अधिकारी विद्वान आणि अडखळत वाचणारा वाचक दोघांनाही फळ सारखंच मिळतं. ज्ञानेश्वरी आई आहे, तिच्याकडे जाणतं आणि तान्हं असा भेद नाही. माऊली म्हणतात,

गीता पाठकासि असे । फळ अर्थज्ञाचि सरिसें ।गीता माउलियेसि नसे । जाणें तान्हें ॥

रमेश वाघ, नासिक

संपर्क  ९९२१८१६१८३



ज्ञानेश्वरी कशी वाचावी, how to read dnyaneshwari
 ज्ञानेश्वरी कशी  वाचावी

आमच्या व्हाट्सअप समूहात सामील होण्यासाठी येथे क्लिक करा. 



टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या