द्वेष कसा घालवावा?

 

माझे एक परिचित गृहस्थ होते. तसा त्यांचा माझा काही प्रत्यक्ष संबंध नव्हता. पण तरीही ती व्यक्ती समोर आली की विनाकारण मला राग यायचा. मनामध्ये तिरस्कार उभा राहायचा. असं वाटायचं याच्या दोन ठेवून द्याव्यात. अर्थात ठेवल्या नाहीत कधी, पण ही भावना निर्माण व्हायची हे मात्र खरं. अर्थात त्या व्यक्तीचं दिसणं, वागणं, बोलणं सारंच अंमळ तिरस्करणीय होतं हेही खरं. पण मग त्याच्या नुसत्या दर्शनानेही माझा मूड ऑफ व्हायचा. एका अर्थाने त्या विवक्षित क्षणापुरता माझ्या वागण्याचा रिमोट मी त्या व्यक्तीच्या हातात देत होतो. मला वाटतं तपशीलाच्या थोड्याफार फरकाने आपल्या प्रत्येकाचाच हा अनुभव असावा.

द्वेष कसा घालवावा?, how to stop hatred
द्वेष कसा घालवावा?
            बर्याचदा आपण एखाद्या व्यक्तीचा द्वेष करतो त्याला तसं काहीच कारण नसतं. आपण ऐकीव माहितीवर आधारित आपलं मत बनवत असतो. बहुधा ते चुकीचंच असण्याचा संभव असतो. कारण कानाचं आणि डोळ्यांचं चार बोटांचं अंतर असतं, अशी आपली फार पुरातन म्हण आहे. मिळालेल्या माहितीची पुष्टी करण्यासाठीचा वेळ आणि इच्छाही आपल्याकडे नसते.  एखाद्याने आपल्याला अपेक्षित वर्तन केलं नाही की आपल्या मनात त्याच्याविषयी आकसाची भावना निर्माण होते. मनासारखी वस्तू वा व्यक्ती भेटली की त्याविषयी अनुराग उत्पन्न होतो. तिचा विरह झाला की त्याच्या विपरित भावना निर्माण होते. सूडभावना जन्म घेते. एकदा हे चक्र सुरू झालं की, त्याला अंत नसतो. त्यामध्ये चांगल्या नात्यांचीही होळी होते. जेव्हा जाग येते, तेव्हा वेळ हातातून निघून गेलेली असते. वैयक्तिक जीवनात जे घडतं, तेच थोड्याबहुत फरकाने राष्ट्रजीवनातही पहायला मिळतं. त्याचा परिणाम मात्र भयानक असतो. दुर्योधनाच्या  पांडवांविषयीच्या द्वेषापोटी अठरा अक्षौहिणी सैन्य महाभारताच्या युध्दात मारलं गेलं. सम्राट पृथ्वीराजाच्या द्वेषापोटी जयचंद राठोडने महंमद घोरीशी हातमिळवणी केली आणि राष्ट्राच्या पायात शेकडो वर्षांसाठी गुलामीच्या शृंखला बांधल्या. तात्कालिक द्वेषापोटी देशाच्या भाळी दुर्भाग्य लिहिणारे अनेक क्षण इतिहासात सापडतात.

            आपण एखाद्याचा द्वेष करतो म्हणजे त्याचं वाईट व्हावं हीच भावना त्यामागे असते. पण द्वेष केल्याने समोरच्याचंही फारसं काही बिघडत नाही. कावळ्याच्या शापाने गाई थोड्याच मरतात. आपला इगो कुरवाळण्यासाठी ते ओझं मात्र आपण आपल्या मनावर कायम वागवत असतो. तो मनोविकार कायम मनात बाळगल्याने आपलं स्वत:चं मात्र प्रचंड नुकसान होतं. द्वेषाचा अग्नी मनात कायम प्रज्वलित ठेवल्याने आपण भाजून निघतो. ताण, तणाव, चिंता, नैराश्य, औदासिन्य या नकारात्मक भावना मनात जन्म घेतात. आत्महत्येसारखे टोकाचे विचार निर्माण होतात. समोरच्यावर परिणाम होवो न होवो, जो द्वेषाला धारण करतो त्याच्यावर मात्र निश्चितच दुष्परिणाम होतो, हे आधुनिक मानसशास्त्राने सिद्ध केलंय. नकारात्मक विचारांचं ओझं कायम बाळगल्याने अनेक व्याधी बळावतात. द्वेष दुसर्याचा पण शिक्षा मात्र आपल्याला होत असते. कोणाही जीवाचा न घडो मत्सर। हा संतांचा आग्रह आपल्या स्वास्थ्यासाठीच होता हे आधुनिक मानसशास्त्राच्या अभ्यासाने आता कळतंय. ऋषी खरे वैज्ञानिक होते. ऋषींनी दिलेली प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक पायावर आधारलेली आहे. जोपर्यंत आपल्याला त्यातले विज्ञान समजत नाही तोपर्यंत आपण ती गोष्ट नाकारत असतो. दीडदमडीच्या लोकांवर आपला विश्वास बसतो, पण ज्यांनी अनमोल सांस्कृतिक संचित आपल्या हातात दिलं त्यांच्यावर मात्र अविश्वास! हा आपलाच करंटेपणा.

            श्रीमद्भगवद्गीतेत भगवान म्हणतात, जो कोणाचा द्वेष करीत नाही आणि कशाची अपेक्षाही करीत नाही तो खरा संन्यासी. द्वेषरहित भावनेन कर्म केल्याने मनावरील मालिन्याची पुटं नाहीशी होतात. बुध्दी पवित्र होते. मन आणि बुध्दी पवित्र झाली की ज्ञानप्राप्ती होते. ज्ञानप्राप्ती झाली की भेद खलास होतो. जात, धर्म, पंथ हे सर्व कृत्रिम भेद आहेत हे लक्षात येतं. संपुर्ण चराचरामध्ये भगवंताचा वास याहे याची अनुभूती येते. ममैवांशो जीवलोके जीवभूत: सनातन: हा गीतेचा शाश्वत उद्घोष आहे. गीतेच्या दृष्टीने कोणी परका नाहीच. परकेपणा आला की भेद उत्पन्न होतो. जगातील सर्व जटील समस्या याच भेदभावनेतून जन्माला आलेल्या आहेत. गीता भेददृष्टीचा नाश करते. गीता हा वैश्विक मानवधर्माचा पाया आहे. म्हणूनच Gita is scripture of future religion of the world असं थोर ब्रिटीश तत्वचिंतक एच. जी. वेल्स यांनी म्हटलेलं आहे. जर प्रत्येक वस्तू भगवंताची असेल तर मग द्वेष कोणाचा करायचा? द्वेष एकदा निमाला की अवघेचि त्रेलोक्य आनंदाचे आता। संत साहित्य अत्यंत शास्त्रीय आहे. फक्त ते समजण्यासाठी मन आणि बुध्दीची तयारी हवी. ती चिंतनाने होईल. समाजमाध्यमांवरील प्रचारकी कॉपीपेस्ट मेसेजेसने नाही.

            गीतेचा सर्वोत्तम श्रृंगार म्हणजे ज्ञानेश्वरी. माऊलींनी भक्तीयोग नावाच्या बाराव्या अध्यायात  भक्तांची छत्तीस लक्षणे सांगितलेली आहे. त्यामध्ये अद्वेष्टा हे पहिलंच लक्षण आहे. द्वेषरहीत होणं हा भक्तीचा पाया आहे. एक संप्रदाय दुसर्या संप्रदायाचा, एक धर्म दुसर्या धर्माचा द्वेष करतो, तरीही आपण त्यांना भक्त समजतो, हीच अंधश्रध्दा. सर्वव्यापी चैतन्याला ज्याप्रमाणे आपला व परकेपणाचा भाव नसतो, त्याप्रमाणे भक्ताला लोकांविषयी परकेपणा नसल्याने, तो कोणत्याही प्राण्याचा द्वेष करत नाही. उत्तमाचा स्वीकार करावा, आणि नीचाचा त्याग करावा हे पृथ्वी जाणत नाही. राजाला प्राण पुरवावा व दरिद्री पुरुषाचा देह टाळावा असं वायू कधीही म्हणत नाही. गाईची तहान भागवू व वाघाला विष होऊन मारू असं पाण्याला वाटत नाही. आत्मबोधामुळे संपूर्ण प्राणिमात्राशी भक्ताची मैत्री असते. तो द्वेषरहीत असल्याने कृपेचा निर्झर बनतो. माऊली म्हणतात,

तैसी आघवियांचि भूतमात्रीं । एकपणें जया मैत्री । कृपेशीं धात्री । आपणचि जो ॥

रमेश वाघ,

नासिक, संपर्क-  ९९२१८१६१८३

द्वेष कसा घालवावा, how to stop hating
How to stop hating 

आमच्या व्हाट्सअप समूहात सामील होण्यासाठी येथे क्लिक करा. 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या