कायम सजग कसं राहावं?

 

कोजागरीची रात्र होती. आम्ही मित्र किल्ले चौल्हेरचा ट्रेक संपवून घरी येत होतो. गाडी नांदुरी गावाजवळ आली. पाहतो तर प्रचंड ट्राफिक. गाडी पार्किंगच्या मैदानाजवळ आली आणि रस्ता सगळा जाम. कोणालाही हलता येईना. थोडीशी फट मिळाली की, पार्किंगमधल्याने बाहेर यायचे की रस्त्याने जाणाराने आगोदर पुढे जायचे यावरून दोन गटांत जुंपली. तू-तू मै-मै चे रूपांतर आता मारामारीत होणार, तितक्यात एकाला समोरच्या गटातल्या एकाची ओळख पटली. तो म्हणाला, "अरे थांबा. हे तर आपले पाहूणे आहेत." उगारलेले हात खाली आले. शिव्या तोंडातल्या तोंडात दिल्या गेल्या असतील कदाचित, पण बाहेर आल्या नाहीत. दोन मिनिटांपूर्वी एकमेकाना बुकलून काढण्याची भाषा करणारे एकमेकांना स्माईल देत, शेकहॅंड करत पांगले. नेमका काय बदल झाला? भांडणाचं रूपांतर प्रेमात कसंकाय झालं? ओळख पटली म्हणून.

            ओळख पटली की, तंटा खलास होतो. माणूस ओळख विसरला की, प्रॉब्लेम्स् उभे राहतात. एकवेळ आपली जगात कोणाशी ओळख नसली, तरी परवडेल, पण आपली आपल्याशी ओळख असायला हवी. जो स्वत:ला ओळखतो तो विश्वाला ओळखू शकतो. 'जे पिंडी ते ब्रह्मांडी' म्हणतात ते यासाठीच. जगाला ओळखलं की, त्याला अंकीत करणं सोपं जातं. व्यवहारातही आपण म्हणतो ना की, ज्याला मार्केटची नस कळते, तोच व्यवसायात यशस्वी होतो. हे व्यावहारीक जीवनात खरे असेलही, पण अध्यात्मिक जीवनात मात्र आयुष्य सरतं, पण नस सापडत नाही. कितीही ब्रॅंडेड सेलिब्रिटी गुरू शोधा, जोपर्यंत ओळख पटत नाही तोपर्यंत सगळं व्यर्थ.

            मी कोण? या प्रश्नाच्या शोधातूनच सर्व तत्वज्ञानाचा उगम झाला आहे. मी कोण हे कळलं की, समोरचा कोण, हे कळणं सोपं होतं. मी कोणाचा? मी कोणासाठी? माझा जन्म कशासासाठी? या प्रश्नांची उकल झाली की कायम उन्मनी अवस्था येते. कल्पनेची लहरी नाही। मन निमग्न चैतन्य डोही। स्वरूपावचूनी नाठवे काही। तेच उन्मनी।। अशी स्थिती म्हणजे उन्मनी. उद् + मनस् म्हणजे उन्मन. मनाचे उन्नतीकरण. ज्याचे मन उन्नत झाले त्याला जागृत राहण्यासाठी कोणत्याही बाह्य सोपस्काराची आवश्यकता नसते. तो स्वयमेव मृगेंद्र होतो. मग ते याज्ञवल्क्य असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील. त्यांचे मन आपल्या ध्येयावरून कधीही विचलित होत नाही.

             ध्येय म्हणजे काय? ध्येय आणि महत्वाकांक्षा या शब्दांमध्ये नेहमीच लोक गडबड करतात. कार घेणे ही महत्वाकंक्षा असू शकते, ध्येय नाही. ध्येय म्हणजे ज्याचे आपल्याला  सतत ध्यान करावेसे वाटते ते. ज्याचे ध्यान केले की सर्व सांसारिक तापांची निवृत्ती होते त्याला ध्येय म्हणतात. असं ध्येय कोणतं असू शकतं? हरैरेनामैव केवलं। केवळ हरीचं नाव हेच ध्येय होऊ शकतं. त्याचा विसर न पडणं याला जागृती म्हणतात. आमचे तुकोबा देवाकडे हेच मागतात. हेचि दान देगा देवा। तुझा विसर न व्हावा।। विस्मृती हे काही बाबतीत वरदान आहे. काही बाबतीत मात्र विस्मृती होता कामाची नाही. एखाद्याला एखादी धोका देऊन गेली असेल, तर तो जितका लवकर विसरेल तितके चांगले. त्याला दुसरं आयुष्य उभं करता येईल. नाही विसरला तर तो आपल्या माता पित्यांची स्वप्नं दारूच्या बाटलीत बुडवील हे मात्र नक्की. आपल्या जीवनाचा हेतू लक्षात आला की, असं होत नाही. संकट आलं तरी, संकटांचं संकट वाटत नाही.

            ध्येयाचा ध्यास लागला की, मध्यरात्री पाऊण लाखाच्या फौजेत दोन हजार गडी घेऊन वैर्यावर घाला घालायची भीती वाटत नाही. साठ गडी घेऊन काळोख्या अंधारात भूतासारखं चढून, सैतानासारखं लढून किल्ला ताब्यात घ्यायला भय वाटत नाही. उसळत्या दर्यामध्ये बंदुकांच्या गोळ्यांच्या वर्षावात समुद्रात उडी घेऊन पोहत किनार्याला लागणं, सहज घडतं. हा पवित्र ध्येयाचा चमत्कार! ध्येयाचा विसर पडला की, बापाची करोडोंची इस्टेटही मातीमोल होते. एकदाच प्राप्त होणारा नरदेह टाईमपास करता करताच म्हातारा होतो. मरताना यमदूत समोर आल्यावर कळतं, अरेच्या! इतक्यात संपलं पण सगळं! थांबा थोडं! पण इथे सेकंड चान्स मिळत नाही. आणि आपल्या दुर्दैवाने की सुदैवाने आपला नंबर कधी येणार हे आपल्यापैकी कोणालाच माहित नाही.

            त्यासाठी आपण कोण? ही स्वरूपाची जाणीव कायम जागी राहणं आवश्यक आहे. परम पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांनी यावर एक अतिशय प्रॅक्टीकल उपाय सांगितला आहे. त्रिकालसंध्या. आपण रात्री झोपतो म्हणजे एक प्रकारे मरतो. झोपताना आपण आपली पत्नी, संसार, सर्व काही विसरतो. विसरलोच नाही तर झोप येणारच नाही. सकाळी उठल्यावर  मी अमूक आहे, हे बरोबर आठवतं. कोणामुळे? त्यामुळे सकाळी उठल्यावर करदर्शन करायचं आणि भगवंताला वंदन करायचं. जेवताना आपलं व्हेज-नॉनव्हेज पचवून जो शक्ती देतो, त्याचं स्मरण करायचं. झोपताना दिवसभर ज्या काही चुका झाल्या असतील त्यासाठी क्षमायाचना करायची.  हे दिवसातून तीनदा न चुकता करायचं. आता स्वरूपाचा आणि देवाचा विसर पडेल?

            माझ्या आणि जगन्नियंत्याच्या संबंधांचं ज्ञान होणं हेच खरं ज्ञान आहे. हे ज्ञान झालं की, जागृती येते. परंतु कालांतराने विस्मृती होते. कारण माणूस मुळातच विसराळू प्राणी आहे. तो विसर पडू नये म्हणून नियमित स्वाध्याय करावा, असा आमच्या शास्त्रकारांचा आग्रह आहे. नित्य हरिपाठ, अखंड हरिनाम सप्ताह,  त्यासाठीच. नुसतं जगायचं म्हणून जगणं महत्वाचं  नाही. आत्मज्ञानाच्या प्रकाशात परतत्वाच्या प्राप्तीसाठी ध्येयाचं जागरण व्हावं. माऊली म्हणतात, पैं ज्ञानाचिये प्रभेसवें । जयाची मती ज्ञेयीं पावे । तो हातधरणिया शिवे । परतत्त्वातें ॥

रमेश वाघ, नाशिक.

संपर्क- ९९२१८१६१८३

कायम सजग कसं राहावं, how to be alert all the time
कायम सजग कसं राहावं


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या