शेवटाचा विचार करा

         आपण जे काही करतो त्याच्यापासून  काहीतरी लाभ व्हावा असाच प्रत्येकाचा हेतू असतो. लाभाशिवाय कोणी पाऊलही उचलत नाही. पण खरचं लाभ होतो का? जर प्रत्येकाला लाभ झाला असता, तर जगात कोणीच रडका दिसला नसता. जगी सर्वसुखी असा कोण आहे? असा प्रश्न निर्माण होतो, त्या अर्थी गोष्टी मनाप्रमाणे घडत नाहीत. बर्याचदा आपण एखादी गोष्ट का करीत आहोत, याचे कारणच आपल्याकडे नसते. शेजार्याने कांदा लावला, म्हणून आपणही कांदा लावतो. त्यात त्याला लाभ होवो न होवो; पण आपला तोटा मात्र ठरलेला असतो. कारण  अनुकरणातून आपण ती कृती केलेली असते, त्यामागे कोणतंही तार्किक विश्लेषण नसतं. दहावीनंतर शाखा निवडताना मित्र वा मैत्रीण अमूक अभ्यासक्रमाला प्रवेश घेते, म्हणून मुलं प्रवेश घेतत. त्याचा परिणाम काय होतो ?

शेवटाचा विचार करा, start with keeping end in the mind
शेवटाचा विचार करा

‘सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टीव्ह पीपल’ या जगप्रसिध्द ग्रंथात शेवट मनात धरून सुरूवात करा अशी एक यशस्वी लोकांची सवय सांगितलेली आहे. कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी त्याचा शेवट कसा असणार आहे, याचं मानसचित्र यशस्वी लोकांच्या डोक्यात तयार असतं. आज आपण जे पाऊल उचलत आहोत, ते आपल्याला कोणत्या दिशेला नेऊन पोचवणार आहे, त्याचा  विचार पाऊल उचलण्यापूर्वीच केला तर नंतर पस्तावण्याची वेळ येत नाही. सुरूवातीला आनंद देणारं आणि नंतर पश्चातापाची वेळ आणणारं काम कितीही आकर्षक वाटलं तरी कधीच करू नये. गंमत म्हणून दारू, सिगारेटला हात लावला जातो, नंतर तीच गंमत तुम्हाला आयुष्यातून उठवते.

ज्याने यश आणि किर्ती मिळणार असते ते काम सुरूवातीला कठीण वाटतं, तरीही अंतिम यशावर नजर  ठेऊन तात्पुरते दु:ख आनंदाने सहन करायला हवे.  चंदन  हवे असेल, तर सर्पाचा सामना करावाच लागतो. स्वर्गातील चांगले भोग भोगायची इच्छा असेल, तर यज्ञरूपी संकटाची अडचण असते.  दिव्याचा प्रकाश हवा असेल, तर आधी धुराची पीडा सहन करावी लागते. औषध शेवटी हितकारक ठरणारं असलं, तरीही ते सेवन करताना जिभेला त्रास होतो. अमृताचा सागर मिळवायचा असेल, तर तात्पुरत्या संकटांकडे डोळेझाक करा. ज्ञानेश्वरीत याचे खूप गोड वर्णन आले आहे.  माऊली म्हणतात, ऐसा जया सुखाचा आरंभु । दावी काठिण्याचा क्षोभु । मग क्षीराब्धी लाभु । अमृताचा जैसा ॥ 

रमेश वाघ, नाशिक

संपर्क - ९९२१८१६१८३

शेवटचा विचार करा
शेवटचा विचार करा



टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या