वस्तूंमध्ये खरंच सुख आहे का?

 
Vastumadhye-kharach-sukh-aahe-ka, वस्तूमध्ये खरंच सुख आहे का
Vastumadhye-kharach-sukh-aahe-ka

 लेकाला स्मार्टवॉच हवं होतं. दुकानात गेलो, तर हा म्हणाला, "मला मित्रापेक्षा भारी घ्यायचंय!" किंमत बदलली की, आपण वस्तूचा हलके भारीपणा ठरवतो. मग सुख वस्तूमध्ये आहे की, भारी वस्तूमध्ये आहे? वास्तविक सुख वस्तू देत नाही. सुख त्यामागच्या मालकीच्या भावनेत आहे. घड्याळात सुख असतं तर, ते कोणत्याही घड्याळाने मिळायला हवं. त्यासाठी अमूकच हवं आहे, असा आग्रह कशासाठी? गाडीचा उपयोग हा फिरण्यासाठीच असतो. तरीही एखाद्याकडे अमूक ब्रॅंडची गाडी असली की, त्याची चाल बदलते. तो स्वत:ला इतरांपेक्षा भारी वगैरे समजायला लागतो.
 आमच्या ओळखीतल्या एक बाई आहेत. त्या पूर्वी कुडाच्या घरात राहायच्या. कर्मधर्मसंयोगाने मुलं नोकरीला लागली. बर्यापैकी छान कॉंक्रीटचं घर बांधलं. आता दिसेल त्याच्याशी, तुमच्या घरापेक्षा माझा बंगला कसा छान आहे, अशी तुलना करीत असतात. सुख घरात आहे का? माझ्या घरापेक्षा चांगलं घर कोणाचं नाही, ही भावना सुख देते. माणूस जितका मानसिकदृष्ट्या खुजा असतो, तितका तो भौतिक गोष्टींवरून दुसर्यांचा मोठेपणा मोजतो. बुध्दीची परिपक्वता वाढली की, त्याला गाडी, बंगला,संपत्ती, सत्ता, प्रतिष्ठा याचं काहीही वाटत नाही. त्याचं सुख त्याच्या आंतरिक शांतीतून येतं. त्यासाठी त्या बाहेरच्या उपचारांची आवश्यकता नसते.
 आर्य चाणक्य म्हणतात, आयुः कर्म च वित्तं च विद्या निधनमेव च । पञ्चैतानि हि सृज्यन्ते गर्भस्थस्यैव देहिनः ॥ तुमचं आयुष्य, कर्म, संपत्ती, विद्या आणि मृत्यू या पाच गोष्टी तुमच्या जन्मापूर्वीच निश्चित झालेल्या असतात. त्या मिळवण्याचा प्रयत्न निश्चितपणे करावा, पण मिळाल्या म्हणून तोरा मिरवत बसू नये. नाहीच मिळाल्या, तर निराश होण्याचंही कारण नाही. दरवर्षी लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देतात, त्यातले मोजकेच यशस्वी होतात. म्हणून अपयशी होणार्यांनी रडू नये आणि यशस्वी झालेल्यांनी चढू नये. जीवनात आपल्याला अमूक मिळालं आणि समोरच्याला ते मिळालं नाही, ही भावना व्यक्तीला सुख देते. पण ते खरं सुख नाही. जे काही मिळेल ते देवाचा प्रसाद समजून ग्रहण करण्यात खरं सुख आहे. तुम्हाला आयुष्यात सुख मिळो वा दु:ख, तो देवाचा प्रसाद असतो. प्रसाद वाईट कसा असेल? औषध कडू असलं, तरीही हिताचंच असतं. माऊली म्हणतात, गोमटें कांही पावे । तेणे संतोषें तेणें नाभिभवे ।जो ओखटेनि नागवे । विषादासी
रमेश वाघ, नाशिक
  संपर्क - 9921816183
वस्तूमध्ये खरंच सुख आहे का? Is happiness in material things
Vastumadhye-kharach-sukh-aahe-ka


टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या