त्याग कशाचा करावा?

  
त्याग कशाचा करावा?, What to sacrifice?
त्याग कशाचा करावा

        जे देण्याची  तुमची क्षमता आहे, ते देणं म्हणजे त्याग. जे तुमच्या मालकीचं आहे, ते  तुम्ही कोणत्याही अपेक्षेविना सोडून देत असाल, तर तो खरा त्याग.  त्याग करण्यासाठी ती गोष्ट प्रथम तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जे मुळात तुमच्याकडे नाही,  ते तुम्ही दुसऱ्याला देतो म्हणाल, तर लोक तुम्हाला वेड्यात काढतील. रघुवंशं मध्ये कालिदासाने रघुवंशी राजांचे वर्णन  'त्यागाय संभृतर्थानां' असं  केलेलं आहे. सर्वकाही मिळवायचं, पण त्याचा त्याग करताना मनात त्याविषयीची आसक्ती ठेवायची नाही. मिळवायचं तेच त्यागासाठी. 

             मी अमूक गोष्ट सोडली, याचाच अनेकांना आभिमान असतो. वास्तविक कर्माचा त्याग म्हणजे त्याग नव्हे, तर कर्माच्या फळविषयीच्या आसक्तीचा त्याग करणे म्हणजे खरा त्याग. भोग भोगताना त्यामागील अहंकाराची भावना काढली, तर तर तो भोगही त्यागात परिवर्तित होतो. अहंकार आला की, त्यागाचाही भोग होतो. अहंकार गेला की, छप्पन भोगही त्यागासमानाच. आपल्या असमर्थपणाला त्यागाचे नाव देऊ नये. ज्याला डॉक्टरने चहा प्यायला मनाई केली, त्याने मी चहा सोडला असा धांडोरा पिटू नये. ज्याला बायको मिळाली नाही, त्याने आपण बालब्रह्मचारी आहोत असा तोरा मिरवू नये. ज्याला पैसाच कमावता येत नाही, त्याने धन आणि धनवंताला नावे ठेऊ नयेत.

      ज्ञानेश्रवरीमध्ये त्याग समजावताना माउलींनी दृष्टांतांची खाणच जणू उघड केली आहे. मातीचा त्याग केला की,  घटाचा आपोआपच नाश होतो. सुत गेलं की कापड संपतं.  वडाच्या बीजाचा त्याग केला की,  वटवृक्षच येणार नाही. भिंतींचाच त्याग केला, तर चित्रांचा त्याग वेगळा करावा लागत नाही.  झोप गेली की, नाना प्रकारच्या स्वप्नांच्या समुदायाचा त्याग होतो. पाण्याचा त्याग केला असता  लाटांचाही त्याग होतो.  वर्षाऋतूचा त्याग केल्यावर मेघांचाही त्याग होतो.  खिसा गरम नसला की, भोगांचा त्याग होणारच. या उदाहरणांप्रमाणे बुद्धिमान पुरुष देहाविषयीच्या  अहंतेचा त्याग करून सर्व संसाराचा  त्याग करतो.

         हे न कळता जर कोणी मी अमुक प्रकारचा त्याग केला आहे, असा डांगोरा पिटत असेल, तो त्यागी नव्हेच. अशा त्यागाचेच त्याला ओझे होते. असे दांभिक  समाजात खूप असतात. आपले जीवन समाजासाठीच आहे म्हणणारे, आपल्या स्वार्थासाठी  अख्खा समाज धुवून खातात. जो भणांगासारखा हिंडतो, तो म्हणजे त्यागी आणि जो राजमहालात राहतो तो म्हणजे भोगी, हा आपला विपरीत समज आहे. पाच वर्षे राष्ट्रपती भवनात देशाचा प्रथम नागरिक म्हणून वावरणारा सत्पुरुष, जेव्हा एक सुटकेस घेऊन आपलं निवासस्थान सोडतो, तेव्हा  तो आपल्या वर्तनाने त्याग सिद्ध करतो. हे त्यागाचं वर्म आहे. माऊली म्हणतात, चुकलिया त्यागाचें वेझें | केला सर्वत्यागुही होय वोझें | न देखती सर्वत्र दुजें | वीतराग ते ॥

रमेश वाघ, नाशिक
संपर्क - 9921816183
त्याग कशाचा करावा?, What to sacrifice?
त्याग कशाचा करावा?


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या