सगळं चांगलंच असतं!

all-is-well, सगळं चांगलंच असतं!
all-is-well

             ज्या गोष्टी आज दुःख देतात , भविष्यात त्यांच्याच आठवणी सुख देतात. माझे एक वयस्कर मित्र होते. ते सांगायचे, पासष्टच्या युद्धात आम्ही आठ-आठ दिवसाच्या शिळ्या भाकरी खाल्ल्या. वाळवंटात दिशा कळत नसत. आम्ही एखादं झाड पाहून भाकरी पुरून ठेवायचो.  त्याच 'पुरून-पुरून' खायचो. असे  प्रसंग सांगताना त्यांचा चेहरा आभिमानाने उजळून निघायचा. वडील म्हणायचे, दुष्काळाच्या साली आम्ही कोंड्याच्या भाकरी खाल्ल्या. कच्च्या पपया, कण्या खाऊन दिवस काढले. या आठवणी सांगताना त्यांच्या मुखावर एक वेगळाच आनंद दिसतो. आता या दोन्ही प्रसंगात जे भोगावं लागलं, ते घडताना प्रचंड वेदनादायी होतं. पण आज त्याच आठवणींच्या जखमा सन्मानचिन्हांसारख्या वाटतात. याचा अर्थ जीवनात काहीही टाकाऊ नसतं.

         आयुष्य म्हणजे सुख आणि दुःखाच्या काळ्या पांढऱ्या धाग्यांनी विणलेले वस्त्र आहे. वस्त्रामध्ये कोणताही रंग अनावश्यक किंवा वाईट नसतो. प्रत्येक रंगाची आपली ठराविक जागा असते. कापडातून तेवढ्याच रंगाचा तुकडा  कापून काढायचा म्हटलं, तर सगळंच कापड निकामी होतं. जीवनाचंही तसंच आहे. वाईट आणि दुःखद वाटणाऱ्या गोष्टी वजा करायच्या म्हटलं, तर आयुष्याची चवच निघून जाईल. एखाद्याला नुसते गुलाबजाम खायला दिले, तर काही काळाने तो चटणीभाकर मागेल. ज्याला फक्त चटणीच मिळते, तो पक्वांनांची आशा करतो. वास्तविक सुखाची किंमत दुःखामुळेच आहे. दुःख नसेल तर सुखही टोचतं. दिवाळी आपणा सर्वांसाठी आनंदाचा सण असतो. राजाला मात्र तो आनंद कळत नाही. दिवाळीचे लाडू त्याच्याघरी रोजच असतात, त्यामुळेच राजाला दिवाळी माहीत नसते, अशी म्हण तयार झाली.

              अभावात्मक परिस्थितीत एखादी गोष्ट हवीहवीशी वाटते. मिळाल्यावर मात्र हळूहळू तिचा विट येऊ लागतो. जीवापाड प्रेम करणारे दोन जीव एकत्र आले, तरीही वाद होतातच. अभावातच भाव निर्माण होतो.  गरिबीत एक तीळ सात जण वाटून खातील. श्रीमंती आली की, कोणी कोणाची विचारपूस करीत नाही. चांगलं किंवा वाईट काहीही नसतं. शुभ अशुभाचा त्याग करून ज्याला जीवनाचा आनंद घेता येतो, तोच मस्त जीवन जगतो. रात्र असो की दिवस सूर्याला फरक पडत नसतो. तसं जीवनात सुखं आणि दुःखं सहज पचवता यायला हवीत. माऊली म्हणतात, वोखटें कां गोमटें । हें काहींचि तया नुमटे । रात्रिदिवस न घटे । सूर्यासि जेवीं ॥ 

रमेश वाघ, नाशिक.

संपर्क - ९९२१८१६१८३

सगळं चांगलंच असतं, all is well
सगळं चांगलंच असतं 




टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

  1. व्वा माऊली... खूपच अप्रतिम लिहलंय!

    उत्तर द्याहटवा
  2. हे अगदी खार आहे. सुखाची किंमत दुःख भोगल्या शिवाय काळात नाही..

    उत्तर द्याहटवा
  3. हे अगदी खरं आहे. सुखाची किंमत दुःख भोगल्या शिवाय काळत नाही... प्रथम दुःखाचा अनुभव आला की तो नकोसा होती आणि त्यातून सुख प्राप्त करण्याची इच्छा निर्माण होते.
    भविष्यात ही असेच लेख लिहत रहा... धन्यवाद

    उत्तर द्याहटवा